Showing posts with label . Show all posts
Showing posts with label . Show all posts

प्रेमास्वरूप आई,Prema Swaroop Aai

प्रेमास्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?

नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.
चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.

ही भूक पोरक्याची होई न शांत आई
पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही
वाटे इथून जावे, तूझ्यापुढे निजावे
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !

वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके ,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ?
घे जन्म तू फिरूनी, येईन मीहि पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !

प्रेमाला उपमा नाही,Premala Upama Nahi

मी कशी ओळखू प्रीती, हे हृदय म्हणू की लेणे
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे

हिरवेपण पिउनी ओले
थेंबांचे मोती झाले
मी कशी फुलोरा शोधू, हे फूल म्हणू की पाने

किरणांची लेऊन लाली
हे मेघ उतरले खाली
मी कशी ओळखू जादू, हे परीस म्हणू की सोने

का नकळत डोळे मिटती
स्पर्शात शहारे उठती
मी कशी भावना बोलू, हे शब्द म्हणू की गाणे



प्रेमात तुझ्या मी पडले,Premat Tujhya Mi Padale

कळले नाही केव्हा घडले
प्रेमात तुझ्या मी पडले

भेट एकदा ती ओझरती
क्षण संभाषण ओळख नुसती

परी परतता पाऊल अडले

कुठेच माझे मन लागेना
तहान त्याची लव भागेना
अबोध काही वेडच जडले

उगा वाटते तुज भेटावे
तुझे मनोगत तुलाच ठावे
संभ्रमात मी अर्धी बुडले

प्रेमा तिच्या उपमा नोहे,Prema Tichya Upama Nohe

प्रेमा तिच्या उपमा नोहे । भूमीमाजी हेमाविना ॥

ते प्रेम साच चमके संकटि । अग्नित हेमहि तपताना ॥

प्रेमा काय देऊ तुला,Prema Kaay Deu Tula

प्रेमा, काय देऊ तुला ?
भाग्य दिले तू मला

प्रीतीच्या या पाखराचे रत्‍नकांचनी पंख देऊ का
देऊ तुला का हर्षगंध हा जीव फुलातून मोहरलेला

या हृदयीच्या जलवंतीची निळी ओढ ती तुला हवी का
रूप मोहिनी लावण्याची हवी तुझ्या का चंद्रकलेला

मोहक सुंदर जे जे दिसते, तूच तयांचा जन्मदाता
घेशील का रे माझ्याकरिता अधरीच्या या अमृताला

प्रेमसेवा शरण,Prem Seva Sharan sahaj jinki mala

प्रेमसेवा शरण, सहज जिंकी मला
मीच चुरीन चरण, दास मी हो तुला

मन तोडि रणबंध, लागे तुझा छंद

किर्ती हा मज चांद, तव पदी वाहिला

प्रेमवेडी राधा साद घाली,Premvedi Radha Saad Ghali mukunda

प्रेमवेडी राधा, साद घाली मुकुंदा
लपसि कोठे गोपाला, गोविंदा

तुझे निळेपण आभाळाचे
कालिंदीच्या गूढ जळाचे
प्रसन्न सुंदर वा कमळाचे
त्याची मज हो बाधा

तुला शोधिते मी दिनराती
तुजसि बोलते हरि एकांती
फिरते मानस तुझ्या सभोवति
छंद नसे हा साधा

तुझ्याविना रे मजसि गमेना
पळभर कोठे जीव रमेना
या जगतासि स्नेह जमेना
कोण जुळवि हा सांधा

प्रेमरंगी रंगता,Prem Rangi Rangata

प्रेमरंगी रंगता, आनंद पसरे दशदिशा
अमृताचा ओघ वाहे, जीवनी फुलते उषा

कमलपुष्पातील तंतु, तेवि नाजूक बंधने
जीव-जीवा भेटण्याला धावती त्या ओढीने
प्रेम देता लाभते साऱ्या सुखाची मंजुषा

प्रेमभावे जीव जगी या,Prem Bhave Jeev Jagi Ya natala

प्रेमभावे जीव जगी या नटला । एकचि रस प्याला ॥

नसती भिन्न रस हे, शृंगारराजा नवदल ल्याला ॥

सकला किरणरंगा दावी इंद्रधनुषी जननयनाला ॥

प्रेमपिसें भरलें अंगीं,Prem Pise Bharale

प्रेमपिसें भरलें अंगीं ।
गीतेसंगें नाचों रंगीं ॥१॥

कोणे वेळे काय गाणें ।
हे तों भगवंता मी नेंणे ॥२॥

वारा धावे भलतया ।
तैसें माझी रंग छाया ॥३॥

टाळमृदंग दक्षिणेकडे ।
आम्ही गातो पश्चिमेकडे ॥४॥

बोले बाळक बोबडे ।
तरी ते जननीये आवडे ॥५॥

नामा म्हणे गा केशवा ।
जन्मोजन्मीं देईं सेवा ॥६॥

प्रेमगीते आळविता,Premgeete Aalavita bhangato aalap ka

प्रेमगीते आळविता भंगतो आलाप का ?
प्रेमिकांच्या मीलनाला वेदनेचा शाप का ?

सोबती हसूनी रातरंगे भोवती
आज एकाकीपणाला चांदण्याचा ताप का ?

गंध नेला, रंग नेला, राहिले निर्माल्य हे
वाहिले सर्वस्व पायी तरी भरेना माप का ?

दो जीवांचे एक होणे का रूचेना ह्या जगी ?
पुण्यवंतांनो तुम्हाला प्रेम वाटे पाप का ?

प्रेम हे वंचिता,Prem He Vanchita

प्रेम हे वंचिता । मोह ना मज जीवनाचा !
द्या कुणि आणून द्या प्याला विषाचा !

प्रीतिचा फसवा पसारा,
भरली इथे नुसती भुते,
कोणि नाही जगि कुणाचा !

प्रेम हे माझे-तुझे,Prem He Majhe Tujhe bolayache nahi kadhi

प्रेम हे माझे-तुझे बोलायचे नाही कधी
भेटलो आता परि भेटायचे नाही कधी

तू उभी जवळी अशी, खुणवी जरी एकांत हा
कालच्या सलगीतुनी बिलगायचे नाही कधी

या जगी माझे-तुझे दुरुनीच नाते शोभते
त्या जुन्या स्मरुनी खुणा जागायचे नाही कधी

होतसे सारेच का अपुल्या पसंतीसारखे
यापुढे शहरात या बहरायचे नाही कधी

जाउ दे ही पालखी माझी तुझ्या दारातुनी
तू तुझे आयुष्य हे उधळायचे नाही कधी

प्रेम वरदान,Prem Vardan

प्रेम वरदान ।
स्मर सदा ।
असे भवा हेचि वरदान ॥

स्नेह सुगंधित करि संसारा
दाहि गरल वैर अभिमान ॥

प्रेम नच जाई तेथें,Prem Nach Jai Tethe

प्रेम नच जाई तेथें,
जिवासी जीव न जडे जेथें ।

अनुसरतांना जडतें नातें;
जीवा जीव एक कार्य भेटवितें ॥

प्रेम तुझ्यावर करिते मी,Prem Tujhyavar Karite Mi

प्रेम तुझ्यावर करिते मी रे,
सांगितल्याविण ओळख तू रे

चंद्र झळकता तुझिया नयनी,
या डोळ्यातील प्रीत-रोहिणी
ओढुन किंचीत निळी ओढणी,
हासत खुदुखुदु लाजत का रे ?

पल्लवतो बघ तनुलतिकेवर,
स्पर्श सुखाचा तो गुलमोहर
चैत्रप्रीतीच्या आम्रतरुवर,
बोलत कुहुकुहु कोकिळ का रे ?

तुझ्या दिशेला वळता मोहुन,
सुर्यफुलापरी फुलते यौवन
भ्रमर मनाचा हृदयी रंगुन,
गुंजत हितगुज तुझेच का रे ?

प्रेम कोणीही करीना,Prem Konihi Karina ka ashi firyad khoti

प्रेम कोणीही करीना, का अशी फिर्याद खोटी ?
प्रेम दे अन्यास आधी, ठेविशी का स्वार्थ पोटी ?

आपल्या या चारुतेशी विस्मरूनी जा सुकेशी,
भाळता कोणास देशी का न भक्तीची सचोटी ?

प्रेम का संगीन गुच्छी, प्रेम का रंगीन ओठी
प्रेम लाभे प्रेमळाला, त्याग ही त्याची कसोटी.

प्रेम केले काय हा,Prem Kele Kaay Ha

प्रेम केले, काय हा झाला गुन्हा ?
अंतरीची भावना सांगू कुणा ?

भोगिली शिक्षा पुरी मी प्रीतिची
साहवेना ती सुखाची वेदना

साक्ष द्याया बोलके झाले मुके
जीभ चावूनी टळे का वंचना

रंगवीतो चित्रलेखा प्रेमला
अनिरुद्ध स्वप्नी ये उषेच्या मीलना

बोलुनी केलीस ही जाहीर चोरी
हसशी का, रे गुन्हेगारा, पुन्हा

प्रेम करुन मी चुकले,Prem Karun Mi Chukale

मलाहि मुकले, तुलाहि मुकले
प्रेम करुन मी चुकले

मीच लाविल्या वेलीवरचे
मृदुल दलांचे मधुगंधाचे

फुलता फुलता मम प्रणयाचे
फूल अचानक सुकले

धार प्रवाही संगमी तुटली
उगमापासुन सरिता आटली

पाण्याविण ह्या डोहाभवती
मृगजळ घेरून बसले

दोन पाखरे मिळुनी रमता
एकावरती घाव बसता
सुखात दुसरे इतुके कळता
व्याकुळ लोचन हसले

प्रितीच्या चांदराती,Pritichya Chand Rati gheuni haat hati

प्रितीच्या चांदराती घेऊनी हात हाती
जोडू अमोल नाती, ये ना,
ये प्रिये !

फुलला हा कुंज सारा, हसली पाने फुले
रुसवा आता कशाला, अधरी प्रिती फुले
हासते.... चांदणे !

सरला आता दुरावा, मिटती का लोचने
सखये या मिलनाला, नुरले काही उणे
हात दे, साथ दे !