Showing posts with label L-गुरुनाथ शेणई. Show all posts
Showing posts with label L-गुरुनाथ शेणई. Show all posts

हरि ॐ प्रणव ओंकार,Hari Om Pranav Omkar

हरि ॐ हरि ॐ !
प्रणव ओंकार शिवा
हृदयांत उजळू दे सूर्यदेवा
हरि ॐ हरि ॐ !

स्वरचक्र उलगडे तानांचे
हे बोल खोल मम प्राणांचे
प्रतिभेचा हुंकार नवा
हरि ॐ हरि ॐ !

तिमिरांत सभोती गगनप्रभा
ज्योतीर्मय त्यातून दिव्य सभा
विलसू दे रुपेरी चंद्रथवा
हरि ॐ हरि ॐ !

लाजऱ्या कळीला भ्रमर,Lajarya Kalila Bhramar

लाजऱ्या कळीला भ्रमर सांगतो काही
मी लाज लाजुनी लालस झाले बाई

जे सांगू नये ते सांगितले पदराने
मी अमृत घेता तुझ्यातले अधराने
गात्रात अनामिक स्वर झंकारीत राही

तू वदलासी मज जवळ घेऊनी कानी
मी तुझाच आहे तू माझी फुलराणी
वाटते तुझ्यावीण अर्थ जीवना नाही

या विराट गगनाखाली मी,Ya Virat Gagana Khali Mi

या विराट गगनाखाली मी तृणात निजलो आहे
वर्षाव तुझ्या प्रेमाचा मी त्यातून भिजलो आहे

काजळी खोल डोहात, डहुळलो धुंद मोहात
वासनेत अन्‌ जळताना चांदण्यात विझलो आहे

स्वर सनई वन-वाऱ्याची, वर यात्रा शत ताऱ्यांची
मी प्रकाश पिऊनी आता प्राणातून सजलो आहे

तू अबोल हो‍उन जवळी मजला,Tu Abol Houn Javali Majala

तू अबोल हो‍उन जवळी मजला घ्यावे,
मी भान विसरुनी धुंद चांदणे प्यावे

ही विशाल अवघी मृदुल असावी धरती
चांदवा रेशमी गर्द जांभळा वरती
वर चंद्ररुपेरी झुंबर एक झुलावे

क्षितिजात झळकता मंद केशरी तारा
अंगावर घ्याव्या धवल दुधाच्या धारा
त्या धारांनी चिंब मला भिजवावे

कचबंध मोकळा तुझ्या करांनी व्हावा
मधुगंध, मंदसा बकुलफुलांनी द्यावा
तू चंद्रबनातिल स्वप्निल रंग टिपावे

सुकुमार साजरी झुळुक लाजरी यावी
हळू रातराणिचा बहर उधळुनी जावी
हे धुंद निरामय वैभव तू फुलवावे

तू अनश्वरातील अमरेश्वर,Tu Anashwarateel

तू अनश्वरातील अमरेश्वर अविनाशी
मज देशील का तू दर्शन दिव्य प्रकाशी

तू चिरंतनातील ईश्वर असशिल का रे
हे दोन घडीचे वैभव नश्वर सारे
बरसती तुझ्यावर नक्षत्रांच्या राशी

गाईली किती मी तव करुणामय गाणी
दाटला गळा मग नयनी उरले पाणी
तू मंगल प्रतिभा ब्रम्ह:तेज आकाशी

का तुला न यावी करुणा माझी देवा
तू केवळ माझ्या सर्वस्वाचा ठेवा
दे मला आसरा तुझिया चरणापाशी

कुंजात विहरतो सुगंध शिंपित,Kunjat Viharato Sugandha

कुंजात विहरतो सुगंध शिंपित वारा
दे प्रिया मला तू तुझ्या मिठीत निवारा !

हृदयात छेडती कोमल सूर सतारी
उमटले अनामिक स्वप्न मनाच्या दारी
मज आशय कळला तुझ्या प्रितीचा सारा
दे प्रिया मला तू तुझ्या मिठीत निवारा !

रंगात अबोली थरारता ओठात
राहु दे सुरंगी पाचुपंख बोटात
बिलगली पाखरे कळ्यांस देत इशारा
दे प्रिया मला तू तुझ्या मिठीत निवारा !

बहरात फुलांच्या कमान झुकली खाली
अंगात उमलुनी तिथे पौर्णिमा आली
बरसल्या अंतरी इथे सुखाच्या धारा
दे प्रिया मला तू तुझ्या मिठीत निवारा !

अंतरंगी तो प्रभाती,Antarangi Jo Prabhati

अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वरबासरी
नाम त्याचे श्रीहरी रे नाम त्याचे श्रीहरी

डोळियांच्या दोन ज्योती लाविती त्याला कुणी
पाहती देहांत कोणी थोर साधक उन्मनी
सानुल्या बिंदूपरि तो नांदतो संतांघरी
नाम त्याचे श्रीहरी रे नाम त्याचे श्रीहरी

भावना भिजल्या भरांनी अश्रु नयनी दाटले
अस्तिकाचे गीत गाता सार उमजे त्यातले

सर्वसाक्षी श्याम माझा राहतो हृदयांतरी
नाम त्याचे श्रीहरी रे नाम त्याचे श्रीहरी