Showing posts with label . Show all posts
Showing posts with label . Show all posts

झुंजुर-मुंजुर पाउस माऱ्यानं,Jhunjur Munjur Paus

झुंजुर-मुंजुर पाउस माऱ्यानं अंग माझं ओलं चिंब झालं रं
टिपुर टिपुर पाण्याची घुंगरं हिरव्या हिरव्या धरेवरी आली रं
बेगिन ये, साजणा !

ढगानं काळं निळं आभाळ आनंदलं
झाडाला, पानाला, थेंब थेंब पाणी डसलं रं
ही झर झर झर गार गार सर,
केसांच्या या जाळ्यामंदी आली रं
बेगिन ये, साजणा !

डोळं हे पाणावलं, काळीज आसावलं
पिरतीनं, धुंदीनं, अंग अंग माझं सजलं रं
मी पान्यात भिजुन इथं थिजुन
तुझ्यासाठी येडीपिशी झाले रं
बेगिन ये, साजणा !

झुंजुमुंजु झालं चकाकलं,JhunjuMunju Jhala

झुंजुमुंजु झालं, चकाकलं सम्दं रान
पगुन्‌ श्यान्‌ सोन्यावानी हरपतंया भान

घरट्यात चिवचिव करीती पाखरं
गव्हानीत चुळूबूळू करीती वासरं

आळुखपिळुख आता कशाचं ग रानी
उपसाया होवं आधी मोटंचं पानी

सुनं खळं बैलाविना चाऱ्याविना बैल
जशी ऱ्हाती रायाविना घरात बाईल

शिळंपाकं काहीतरी आन रातचं ग
न्याहारिला बिगीबिगी बसू संगसंग

नग झाकु पदरात कन्साचं दानं
नग दावु लई भाव घेईन हातानं

पिरतीचं पीक लई येई माळावर
राबुनशान खाऊ संगं सकाळ दुपार

चढू डोंगरांची माथी तुडवू ओहोळ
हातामंदी घालून हात फिरू रानोमाळ

झुंजता रणभूवरी तू,Jhunjata Ranabhuvari Tu

झुंजता रणभूवरी तू, अमर होशी रे, सुता
भाग्य माझे थोर म्हणुनी जाहलो तव मी पिता

हे खुळे वात्सल्य माझे ढाळिते अश्रू जरी
ताठ माझी मान गर्वे, धन्यता दाटे उरी
आजवर आशीष दिधले, वंदना घे ही अता


ऐकतो मी जनमुखाने विक्रमाची तव कथा
गळुन जाते आसवांसह हृदयिची दुबळी व्यथा
मायही तव दुःख विसरे ऐकुनी तव वीरता

आपुल्या वंशावरी तू दिव्य कीर्तीची ध्वजा
यातुनी घेतील स्फूर्ती कोटी वीरांच्या प्रजा

मरण कैसे हे म्हणू मी ? मूर्त ही चिरंजीवता

पोचशी तू दिव्यलोकी सूर्यमंडळ भेदुनी
चंद्र, तारे धन्य तुजला आरती ओवाळुनी
गौरवाचा ग्रंथ लाभे जीवनी तव, भारता

तू पुन्हा दिसणार नाहिस, दुःख केवळ हे मनी

वाहते अभिमान-सरिता मात्र त्या दुःखांतुनी
ती व्यथा घृत, वर्तिका मन, ज्योत जळते अस्मिता

झांजीबार झांजीबार,Jhanjibar Jhanjibar

दुनिया तुफान मेल
नहीं भैंया, दुनिया वेड्यांचा बाजार !

दुनिया वेड्यांचा बाजार
झांजीबार, झांजीबार, झांजीबार !

एका रात्री इथून पसार
दुसऱ्या रात्री दर्यापार
हुश्शार, भाईं हुश्शार !
झांजीबार, झांजीबार, झांजीबार !

बुडलो, मेलो, ठार अखेरीस
कुठे सुरैया, निम्मी, मीना, नर्गिस
लाख खर्चले, वसूल हजार
झांजीबार, झांजीबार, झांजीबार !

आली रे आली रसाळ आंबेवाली
आरे हड्‌ !
आली, आली नवी निवडणुक
पेरा पैका, मते आपसूक
मत चिठ्ठ्यांचे गळ्यात हार
झांजीबार, झांजीबार, झांजीबार !

झुळझुळे नदी ही बाई,Jhula Jhule Nadi Hi Bai

झुळझुळे नदी ही बाई
देहलतेला शीतल करुनी आनंदाने गाई

पान फुलांनी तरुवर फुलती
पाण्यावरती तरंग झुलती
सुरेल मुरली नादे घुमते ती अंब्याची राई

सुखात का ग खुपते काही ?
शाम सावळा भेटत नाही

राधेला का छळिती गोपी कळत कसे ग नाही

या पाण्यावर हृदय उमलते
हृदयातुनि का गुपित उकलते
नको गुपित ते उकलायाते अबोलीच मी राही

झुलतो बाई रास-झुला,Jhulato Bai Ras Jhula

झुलतो बाई, रास-झुला
नभ निळे, रात निळी, कान्हाही निळा

वाऱ्याची वेणू, फांद्यांच्या टिपऱ्या
गुंफतात गोफ, चांदण्यात छाया
आभाळाच्या भाळावरी, चंदेरी टिळा

प्राणहीन भासे, रासाचा रंग
रंगहीन सारे, नसता श्रीरंग
चोहीकडे मज दिसे, हरि सावळा

गुंतलास कोठे नंद-नंदना तू
राधेच्या रमणा, केव्हा येशील तू
घट झरे, रात सरे, ऋतू चालला

झुलतो झुला जाई आभाळा,Jhulato Jhula Jai Aabhala

झुलतो झुला, जाई आभाळा
झूल्यासंगे झुलताना खुलतो ग बाई गळा !

लिंबाच्या फांदीला ग
झूला मी बांधीला
रेशमाचे लाल गोंडे माझ्या झुल्याला !

खालती वरती ग
वाऱ्याला भरती
विमानाच्या वेगे माझा झुला चालला !

झूल्याच्या संगती
सूरही रंगती
वारा नेई माझे गाणे दूर देशाला !

झुक झुक झुक झुक अगीनगाडी,Jhuk Jhuk Jhuk Agin Gadi

झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेखा हवेत काढी
पळती झाडे पाहूया,
मामाच्या गावाला जाऊया


मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुनी घेऊया

मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया

मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया


मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊ या

झिमझिम झरती श्रावणधारा,Jhimjhim Jharati Shravan

झिमझिम झरती श्रावणधारा धरतीच्या कलशात
प्रियाविण उदास वाटे रात

बरस बरस तू मेघा रिमझिम, आज यायचे माझे प्रियतम
आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात

प्रासादी या जिवलग येता, कमळमिठीमधि भृंग भेटता
बरस असा की प्रिया न जाइल माघारी दारात

मेघा असशी तू आकाशी, वर्षातुन तू कधी वर्षसी

वर्षामागुन वर्षति नयने, करिती नित बरसात

झिणि झिणी वाजे बीन,Jhini Jhini Vaje Bin

झिणि झिणी वाजे बीन
सख्या रे, अनुदीन चीज नवीन

कधी अर्थावीण सुभग तराणा
कधी मंत्रांचा भास दिवाणा
सूर सुना कधी केविलवाणा, शरणागत अति लीन

कधी खटका, कधी रुसवा लटका
छेडी कधी प्राणांतिक घटका
कधी जीवाचा तोडून लचका, घेते फिरत कठीण

सौभाग्ये या सुरात तारा
त्यातून अचपळ खेळे पारा
अलख निरंजन वाजविणारा, सहजपणात प्रवीण

झाल्या तिनी सांजा करुन,Jhalya Tini Sanja Karun

झाल्या तिनी सांजा करुन शिणगार साजा
वाट पहाते मी ग येणार साजन माझा

प्रितीच्या दरबारीचं येणार सरदार
मायेच्या मिठीचा त्याच्या गळ्यात घालीन हार
दिलाच्या देव्हाऱ्यात बांधीन मी पूजा
वाट पहाते मी ग येणार साजन माझा

भेटीत रायाच्या सांगेन मी सारं
सोसवेना बाई मला यौवनाचा भार
तान्हेल्या हरणीला हळूच पाणी पाजा
वाट पहाते मी ग येणार साजन माझा

त्याच्याच ओठांचा ओठी रंग लाल
आठवणीने त्याच्या बाई रंगले हे गाल
धुंद व्हावी राणी रंगून जावा राजा
वाट पहाते मी ग येणार साजन माझा

वाटतं सख्याचं वाजलं पाऊल
खट्याळ मनाला लागे खोटीच चाहूल
घालू कशी मी साद होईल गाजावाजा
वाट पहाते मी ग येणार साजन माझा

इचारच पडला बिचाऱ्या मनाला
येळ का ग व्हावा बाई सख्या सजनाला
बिलगुन बसावी शंभूला सारजा
वाट पहाते मी ग येणार साजन माझा



झाले मोकळे आकाश,Jhale Mokale Aakash

दळ उमलत जाते एकेक
वर दवबिंदूंची थरथर
मन धुक्यात हरवत जाते
अंधार परतीच्या वाटेवर
लख्ख उजळून आले श्वास
झाले मोकळे आकाश

नाते सावरताना माझ्या अश्रूंचा प्रकाश
म्हणेल ओली माती; झाले मोकळे आकाश

झाले ग बाई संसाराचे,Jhale Ga Bai Sansarache

मिटून घेतले नेत्र तरी ते चित्र मनाला दिसे
झाले ग बाई संसाराचे हसे

मी वाट पाहते बसुनी तुमची घरी

तुम्ही रात जागता भलतीच्या मंदिरी
पडणेच कपाळी चुकल्यावर पायरी
तोल सोडुनी तुम्ही वागता तुम्हा सावरू कसे
झाले ग बाई संसाराचे हसे

कुणी म्हणे तुम्हाला शुद्धच नसते कधी
तीजसवे जेवता एका ताटामधी

कोठून शोधु या रोगावर औषधी
जीभा जगाच्या कानी ओतती जसे तापले शिसे
झाले ग बाई संसाराचे हसे


भाळला नाथ हो सौख्याला कोणाच्या
तुम्ही मांजर झाला ताटाखाली तीच्या
संपल्या कथा आता नीतीच्या प्रीतिच्या
नीतिहीनाची अनाथ बाईल कोण तीयेला पुसे
झाले ग बाई संसाराचे हसे

झाली भली पहाट,Jhali Bhali Pahat

दिली कोंबड्याने बांग
विझे चांदण्याची रांग
ये जाग पाखरांना, तो ऐक किलबिलाट
झाली भली पहाट !

रे ऊठ रानराजा, झाली भली पहाट

मुक्या लेकराची माय
हंबरते माझी गाय
घे ओढ वासरू ते, रुतली गळ्यात गाठ

उरी लेकराची आस
झरे माउलीची कास
त्या झेलताच धारा, आला भरून माठ

लागे दुडुदुडु करू
खुळे शेळीचे कोकरू
येताच माय चाटु, ते थांबले मुकाट

अंगे झिंझाडून सैल
उभे ठाकले रे बैल
गवतात झोपलेली न्हाली दवात वाट !



झाली पहाट झाली पहाट,Jhali Pahat Jhali Pahat

झाली पहाट, झाली पहाट

विरे काळोखाचा वेढा, चांद वळला वाकडा
वाजे राउळी चौघडा, डुले दारीचा केवडा
भवती जंगल दाट

साद घालितो कोंबडा, उठा नयन उघडा
पहा उजळल्या कडा, पडे प्राजक्ताचा सडा
खचली पाऊलवाट

घरघर घरोघरी, सूरमंजूळ लहरी
तरंगत वाऱ्यावरी, जाती पहिल्या प्रहरी
गाती सृष्टीचे भाट

जाता गुंजती गौळणी, मंद पैंजण पावली
कटि कुंभ आंदोलती, गानी गुंग भृंगावली
बोले पाणियाचा घाट

झोपडीत मायलेकी, दळताती सासूसूना
तुझे पाऊल पडू दे, अंगणात नारायणा
उजळीत पुढली वाट

झाली ग बरसात फुलांची,Jhali Ga Barsat Phulanchi

झाली ग बरसात, फुलांची झाली ग बरसात
वसंतवेड्या लहरी भरल्या, उसळत सर्वांगात

मुक्या मनाला फुटली वाणी
मनोगतांची झाली गाणी
पालवल्या ग आशावेली, न्हाल्या नवरंगांत
धुंद सुखाचा सुटला दरवळ
अंगच अवघे झाले परिमळ
दवासारखे आनंदासु, कुसुमांसम नयनात

तळहातीच्या भाकित रेखा
जित्या जुईच्या झाल्या शाखा
दिसेल तेथे प्रफुल्ल झाले, फुलल्या उल्हासात

झाला साखरपुडा ग बाई,Jhala Sakharpuda Ga Bai

झाला साखरपुडा ग बाई थाटाचा
रुणुझुणु चुडा हाती गाईल ग
शालू चमचम करील जरीकाठाचा

सांग माझ्या कानात नवरा कसा
शूर मर्द का भितरा ससा
रूप मदन का हुप्प्या जसा
बृहस्पती का येडापीसा


ऐक सांगते तिकडची स्वारी
रूप देखणं नजर करारी
मर्द मावळ्या मुलुखामधुनी
गर्जत जाई गरूडभरारी


नगं बाई ...... काय ग ?
दिमाग अशी दाऊ ग
स्वर्ग झाला तुला ग दोन बोटांचा
झाला साखरपुडा !

नाकाचा सांडगा, गालाचा पापड
दळुबाई-कांडुबाई म्हणत्यात तसा
केळीच्या पानाला तूप लावुनी

वाढल्या शेवाया खाईल कसा

शूर मराठा स्वार फाकडा
ऐट दावतो थाट रांगडा
ढाल पाठीवर हातात भाला
स्वारी जाते मुलुखगिरीला

नगं बानू ....... नगं बानू
रूपाला अशी भाळू नगं
कसा येईल फुलाला रंग देठाचा
झाला साखरपुडा ग बाई थाटाचा

झाला महार पंढरिनाथ,Jhala Mahar Pandharinath

झाला महार पंढरिनाथ
काय सांगू देवाचि मात !

नेसला मळिन चिंधोटी
घेतली हातामधी काठी

घोंगडी टाकिली पाठी
करी जोहार दरबारात !

मुंडाशात बांधिली चिठी
फेकतो दुरुन जगजेठी
'दामाजीनं विकलि जी कोठी
त्याचं घ्यावं दाम पदरात !'

खळखळा ओतिल्या मोहरा
'घ्या जी मोजून, पावती करा'
ढीग बघून चमकल्या नजरा
शहा घाली बोट तोंडात !

झाडावरती घडे लटकले,Jhadavarati Ghade Latakale

ओळखणार ना बरोबर, ओळखा हं !

झाडावरती घडे लटकले घड्यात होते पाणी
त्या पाण्याच्या वड्या कापूनी कुरुकुरु खातो कोणी
आता सांगा खिरापत, माझी सांगा खिरापत - खोबरं

उदारातील उदार भारी त्याच्या हाती मोती
त्या मोत्यांना उन्हांत सुकवून पोरे बाळे खाती
आता सांगा खिरापत, माझी सांगा खिरापत - मनुका


कोकणातला पिवळा बाळू फार लागला माजू
पकडूनी आणा भट्टीवरती काळिज त्याचे भाजू - काजू


चाललीतला पोर मारतो तिठ्ठयावरती थापा
सुरकुतलेली बोटे त्यांचा गोड लागतो पापा
आता सांगा खिरापत, माझी सांगा खिरापत - खारका

आधी होतीस काळी पिवळी नंतर झालीस गोरी ग
देवळातूनी का ग फिरसी वेळू गावच्या पोरी
आता सांगा खिरापत, माझी सांगा खिरापत - खडीसाखर

चट्टा मट्टा बाळंभटा, आता मागील त्याला रट्टा
पंजा साधीत निघेल गुपचुप तो वाघाचा पठ्ठा

आता झाली खिरापत

झर झर धार झरे,Zar Zar Dhar Zare

झर झर झर झर धार झरे
धार सुधेची कामधेनूची
भर भर भर भर कलश भरे

नंदनवन सम गमते गोकुळ
शान्तिसौख्यमय जीवन मंगल
वैभव-धन हे अमोल येथिल
धेनु, गोजिरी वासरे

हरीची मुरली वाजे मंजुळ
प्रमुदित करिते गोकुळ सारे