Showing posts with label . Show all posts
Showing posts with label . Show all posts

टिमक्याची चोली बाय Timakyachi Choli Baay

टिमक्याची चोली बाय रंगान्‌ फुलयली

तुझीमाझी जमली जोरी माझे वसयकरीन बाय गो




वसयकरीन बाय गो वसयकरीन बाय

म्हावऱ्याची टोपली तुझे माथ्यावर हाय गो




वसयकरीन बाय तू उभी बांदावर पदर तुझे खांद्यावर

फुलांचा गजरा डुले माथ्यावर नजर तुझी चांदावर

कोली नवरा बरा गे माय

म्हावरच्या टोपल्या घरा गे बाय




दोन पैसे दोन पैसे दे ग मला गोमू दे ग मला

खर्चाला पान सुपारीला

माहीमचा हलवा आणिन तुला

नाय खाल्लास तर मारीन तुला

मारशील मारशील कोणाला रे कोणाला

मी जाते गोमूचे लग्नाला

टाळ बोले चिपळीला Taal Bole Chipalila

टाळ बोले चिपळीला, नाच माझ्यासंग

देवाजीच्या दारी आज, रंगला अभंग




दरबारी आले, रंक आणि राव

सारे एकरूप, नाही भेदभाव

गाउ नाचु सारे, हो‍उनी निःसंग




जनसेवेपायी, काया झिजवावी

घाव सोसुनिया, मने रिझवावी

ताल देउनी हा, बोलतो मृदंग




ब्रम्हानंदी देह, बुडुनीया जाई

एक एक खांब, वारकरी होई

कैलासाचा नाथ, झाला पांडुरंग

टप टप टप थेंब वाजती Tap Tap Tap Themb Vajati

टप टप टप थेंब वाजती, गाणे गातो वारा

विसरा आता पाटी-पुस्तक, मजेत झेला धारा

पाऊस आला रे पाऊस आला




घराघरावर, कौलारावर, आले झिमझिम पाणी

गुणगुणती झाडांची पाने हिरवी-हिरवी गाणी

अवती-भवती भिजून माती, सुगंध भरला सारा




काळ्याभोर ढगांना झाली कोसळण्याची घाई

इवले इवले पंख फुलवुनी गाते ही चिऊताई

आनंदे हंबरती गाई समोर विसरून चारा



मला न कळता पहा कसे हे पाय लागले नाचू

फुलांसारखे थेंब उतरती किती फुले मी वेचू

ता थै ता थै मोर नाचती भिजला चिंब पिसारा

टप टप टप टाकित टापा Tap Tap Tap Takit Tapa

टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा

पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा !




उंच उभारी दोन्ही कान

ऐटित वळवी मान-कमान

मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा !




घोडा माझा फार हुशार

पाठीवर मी होता स्वार

नुसता त्याला पुरे इषारा, कशास चाबुक ओढा !




सात अरण्ये, समुद्र सात

ओलांडिल हा एक दमात

आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा !

टप्‌ टप्‌ पडती अंगावरती Tap Tap Padati Angavarati

टप्‌ टप्‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले

भिर्‌ भिर्‌ भिर्‌ भिर्‌ त्या तालावर गाणे अमुचे जुळे !




कुरणावरती, झाडांखाली

ऊन-सावली विणते जाळी

येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले !




दूर दूर हे सूर वाहती

उन्हात पिवळ्या पाहा नाहती

हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !




गाणे अमुचे झुळ-झुळ वारा

गाणे अमुचे लुक-लुक तारा

पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातुन फुले !




फुलांसारखे सर्व फुला रे

सुरात मिसळुनि सूर, चला रे

गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे !

टप्‌ टप्‌ टप्‌ काय बाहेर Tap Tap Tap Kaay Baher

टप टप टप काय बाहेर वाजतंय्‌ ते पाहू

चल्‌ ग आई, चल्‌ ग आई, पावसात जाऊ !




भिरभिरभिर अंगणात बघ वारे नाचतात !

गरगर गरगर त्यासंगे, चल गिरक्या घेऊ !




आकाशी गडगडते म्हातारी का दळते ?

गडड्‍गुडुम गडड्‍गुडुम ऐकत ते राहू !




ह्या गारा सटासटा आल्या चटाचटा

पट्‌ पट्‌ पट्‌ वेचुनिया ओंजळीत घेऊ !




फेर गुंगुनी धरू, भोवऱ्यापरी फिरू

"ये पावसा, घे पैसा", गीत गोड गाऊ !




पहा फुले, लता-तरू, चिमणी-गाय-वासरू

चिंब भिजती, मीच तरी, का घरात राहू ?

टक्‌टक्‌ नजर पडतोय्‌ Tak Tak Najar Padatoy

टक्‌टक्‌ नजर, पडतोय्‌ पदर

नार तोऱ्यात नखऱ्यात चालते

डाव्या डोळ्याची शीळ अशी घालते




रंगानं सावळा, दिसायला देखणा

मनात भरला वळखीचा पावणा

हसतोय्‌ गालात, करतोय्‌ खुणा

नजरेला नजर बाई ग, तुझी माझी जुळते




पदराचा पतंग व्हटात धरला

धुंदीचा वारा अंगात शिरला

मनाचा भवरा गरगर फिरला

मदनाच्या मिठीत ही ग, कमळण डुलते