Showing posts with label L-अनंत फंदी. Show all posts
Showing posts with label L-अनंत फंदी. Show all posts

बिकट वाट वहिवाट नसावी,Bikat Vaat Vahivat Nasavi


बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको

चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरु नको

नास्तिकपणात शिरुन जनांचा बोल आपणा घेउ नको
भलीभलाई कर काही पण अधर्म मार्गी शिरू नको


मायबापावर रुसू नको
तू एकला बसू नको
व्यवहारामधे फसू नको
कधी रिकामा असू नको
परी उलाढली भलत्यासलत्या पोटासाठी करू नको
संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको

वर्म काढुनी शरमायाला उणे कुणाला बोलु नको
बुडवाया दुसऱ्याचा ठेवा, करुनी हेवा; झटु नको
मी मोठा शहाणा जगामधि गर्वभार हा वाहु नको
एकाहुनि एक चढि जगामधि थोरपणाला मिरवु नको

हिमायतीच्या बळे गरिबगुरिबाला तू गुरकावु नको
दो दिवसांची जाईल सत्ता, अपयश माथा घेउ नको
बहुत कर्जबाजारी हो‍उनी ओज आपुला दवडू नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर परंतु जामिन राहु नको

विडा पैजंचा उचलु नको
उणि तराजू तोलु नको
गहाण कुणाचे बुडवु नको
असल्यावर भिक मागू नको
नसल्यावर सांगणं कशाला, गाव तुझा; भिड धरु नको
कष्टाची बरि भाजिभाकरी तूपसाखरेची चोरी नको

दिली स्थिती देवानं तीतच मानी सुख, कधि विटु नको
आल्या अतिथ्या मुठभर द्याया मागं पुढती पाहु नको
उगिच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको
बरी खुशामत शाहण्याचि ही, मूर्खाची ती मैत्रि नको

आता तुज ही गोष्ट सांगतो, सत्कर्मा ओसरू नको
असल्या गाठी धनसंचय कर, सत्कार्यी व्यय हटु नको

सुविचारा कातरु नको
सत्संगत अंतरू नको
द्वैताला अनुसरू नको
हरिभजनविण मरू नको
गावयास अनंत फंदीचे फटके मागे करू नको

सत्किर्तीनं मतीचा डंका वाजे मग शंकाच नको