Showing posts with label L-आरती प्रभू. Show all posts
Showing posts with label L-आरती प्रभू. Show all posts

समईच्या शुभ्र कळ्या,Samaichya Shubhra Kalya

समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते
केसातच फुललेली जाई पायांशी पडते.

भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे
मागे मागे राहिलेले माझे माहेरे बापुडे.

साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची
आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची.

थोडी फुले माळू नये, डोळा पाणी लावू नये
पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन ग ये.

हसशील, हास मला, मला हसूही सोसेना
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा !

विश्रब्ध मनाच्या कातरवेळी,Vishrabdha Manachya

विश्रब्ध मनाच्या कातरवेळी
एखाद्या प्राणाची दिवेलागण

सरत्या नभाची सूर्यास्तछाया
एखाद्या प्राणांत बुडून पूर्ण

एखाद्या प्राणाच्या दर्पणी खोल
विलग पंखांचे मिटत मन

एखाद्या प्राणाचे विजनपण
एखाद्या फुलाचे फेडीत ऋण

गीतांत न्हालेल्या निर्मळ ओठां
प्राजक्त चुंबन एखादा प्राण

तुडुंब जन्मांचे सावळेपण
एखाद्या प्राणाची मल्हारधून

एखाद्या प्राणाचे सनईसूर
एखाद्या मनाचे कोवळे ऊन

निर्जन प्राणाचा व्रतस्थ दिवा
एखाद्या सरणा अहेवपण

लवलव करी पात,Lavlav Kari Paat

लवलव करी पात डोळं नाही थाऱ्याला
एकटक पाहु कसं लुक-लूक ताऱ्याला

चवचव गेली सारी जोर नाही वाऱ्याला
सुटं-सूटं झालं मन धरू कसं पाऱ्याला

कुणी कुणी नाही आलं फडफड राव्याची
रूणझूण हवा का ही गाय उभी दाव्याची

तटतट करी चोळी तुटतुट गाठीची
उंबऱ्याशी जागी आहे पारूबाई साठीची

ये रे घना ये रे घना,Ye Re Ghana

ये रे घना, ये रे घना
न्हाउ घाल माझ्या मना

फुले माझि अळुमाळु, वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना

टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार
नको नको म्हणताना, मनमोर भर राना

नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना



मीच मला पाहते आजच,Meech Mala Pahate Aajach

मीच मला पाहते, पाहते आजच का ?

असा मुलायम असा
देह तरी हा कसा ?
माझा म्हणू तरी कसा ?
हा डोह जणू की कृष्ण सावळा, मी त्याची राधिका !

काठावरले तरू
हळूच पाहते धरू
मोरपिशी पाखरू, पाखरू, पाखरू
मज आज गवसली माझ्या मधली, सोन्याची द्वारका !

पदर असा फडफडे
नजर फिरे चहुकडे
नवल देखणे घडे
हा तरंग मागे-पुढे जळावर, हलतो का सारखा ?



बंद ओठांनी निघाला,Band Othani Nighala

बंद ओठांनी निघाला पेटलेला एकला
दाटलेल्या अंतरिचा सूर झाला मोकळा

का दुभंगु का नये हा क्षितिज पडदा एकदा
फक्त कानी येत त्याच्या येथ दिडदा सर्वदा
कोण होता देही आता आठवे ना त्याजला
दाटलेल्या अंतरिचा सूर झाला मोकळा

लोळ आला अन्‌ विजेचा रान सारे पेटले
भूत जन्मापूर्वीचे त्या तेथ त्याला भेटले
वादळापूर्वीच झाला तो निनावी एकला
दाटलेल्या अंतरिचा सूर झाला मोकळा

नाही कशी म्हणू तुला,Nahi Kashi Mhanu Tula

नाही कशी म्हणू तुला, म्हणते रे गीत
परि सारे हलक्याने: आड येते रीत.

नाही कशी म्हणू तुला... येते जरा थांब
परि हिरव्या वळणांनी जायचे न लांब.

नाही कशी म्हणू तुला, माळ मला वेणी
परि नीट, ओघळेल, हासतील कोणी.

नाही कशी म्हणू तुला, घेते तुझे नाव
परि नको अधरांचा मोडू सुमडाव.


नाही कशी म्हणू तुला, जरा लपूछपू
परि पाया खडेकाटे लागतात खुपू.

नाही कशी म्हणू तुला, विडा रे दुपारी
परि थोरांच्या समोर घ्यायची सुपारी.

दुःख ना आनंदही,Dukha Na Aanandahi

दुःख ना आनंदही, अंत ना आरंभही
नाव आहे चाललेली, कालही अन्‌ आजही

मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा
मी नव्हे की बिंब माझे ! मी न माझा आरसा

याद नाही, साद नाही ना सखी वा सोबती

नाद आहे या घड्याला अन्‌ घड्याच्या भोवती

सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली दूरची हाले हवा

एकला मी नाही जैसा, नाही नाही मी दुणा
जीवनाला ऐल नाही, पैल तैसा, मध्य ना

तो एक राजपुत्र मी,To Ek Rajputra Mi

तो एक राजपुत्र, मी मी एक रानफूल
घालीन मी, मी त्याला सहजिच रानभूल

केसात पानजाळी, कंठात रानवेल
तुझी रे तुझी नटून ताई, घालील त्यास माळ

भाऊ रे शूर अति, होईल सेनापति
भाऊ रे भाऊ करून स्वारी, दुष्टास चारील धूळ

होईल बाबा प्रधान, राखिल तो इमान
सुखी रे सुखी राज्य सारे, चुटकीत तो करील

तू तेंव्हा तशी,Tu Tevha Tashi

तू तेंव्हा तशी, तू तेंव्हा अशी
तू बहरांच्या बाहूंचीतू ऐल राधा,
 तू पैल संध्या
चाफेकळी प्रेमाची
तू काही पाने, तू काही दाणे
तू अनोळखी फुलांची
तू नवीजुनी,
 तू कधी कुणी
खारीच्या ग, डोळ्यांची
तू  हिर्वी-कच्ची,
तू पोक्त सच्ची
तू खट्टीमिठ्ठी ओठांची
तू कुणी पक्षी :
 पिसांवर नक्षीकवितेच्या ईश्वराची



तुम्ही रे दोन दोनच,Tumhi Re Don Donach

तुम्ही रे दोन, दोनच माणसं
माझी उभ्या अख्ख्या गावात
एक धाकुला, मनाचा किती किती मऊसा
जाईजुईहुन सुद्धा तर दुसरा मोठा मोठा, जणू काय खडक थोरला
त्यात सुद्धा मधाचा झरा गोडगोड
माया दोघांची नव्हे अशी तशी, सोनंच बावनकशी

एक लहान्या मंजूळपणे म्हणतो ताई
तर दुसरा मोठा आहे ना
तो तर देतो नुसता शिव्याच गो
पण कितीतरी, कितीतरी माया त्याची
बापासारखा आईसारखा
तुम्ही रक्ताची नसून सुद्धा
रक्ताहूनी सख्खी दोन

हा उभा गाव अख्खा गाव
म्हणतो मला पापी अवदसा
भाऊ रे भाऊ तूच सांग
रानातला झरा पापी असणार तरी कसा
गावाची नजर वाकडी वाकडी
त्यांना मी दिसणार तशी

ती येते आणिक जाते,Ti Yete Aanik Jate

ती येते आणिक जाते
येताना कधि कळ्या आणिते
अन्‌ जाताना फुले मागते

येणे-जाणे, देणे-घेणे

असते गाणे जे न कधी ती म्हणते.

येताना कधि अशी लाजते
तर जाताना ती लाजविते:
कळते काही उगीच तेही
नकळत पाही काहीबाही,
अर्थावाचुन असते 'नाही', 'हो', ही म्हणते.

येतानाची कसली रीत:

गुणगुणते ती संध्यागीत,
जाताना कधि फिरून येत,
जाण्यासाठिच दुरुन येत,
विचित्र येते, विरून जाते जी सलते.

गेले द्यायचे राहून,Gele Dyayache Rahun

गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे;
माझ्यापास आता कळ्या, आणि थोडी ओली पाने

आलो होतो हासत मी, काही श्वासांसाठी फक्त;
दिवसांचे ओझे आता, रात्र रात्र शोषी रक्त

आता मनाचा दगड, घेतो कण्हत उशाला;

होते कळ्यांचे निर्माल्य, आणि पानांचा पाचोळा

कुणाच्या खांद्यावर,Kunachya Khandyavar

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ?

कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून

जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे

दीप सारे जाती येथे विरुन विझून

वृक्ष जाती अंधारात गोठून झडून
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे


अंत झाला अस्ताआधी जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी
देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे



कसे ? कसे हासायाचे,Kase Kase Hasayache

कसे ? कसे हासायाचे ?
हासायाचे आहे मला

हासतच वेड्या जिवा
थोपटीत थोपटीत
फुंकायाचा आहे दिवा

हासायाचे
कुठे ? कुठे आणि केव्हा ?
कसे ? आणि कुणापास ?
इथे भोळ्या कळ्यांनाही

आसवांचा येतो वास