Showing posts with label L-भा. रा. तांबे. Show all posts
Showing posts with label L-भा. रा. तांबे. Show all posts

चरणिं तुझिया मज देई CHARANI TUZIYA NAJ DEI

चरणिं तुझिया मज देई, वास हरी

चरणतळी तव कमल विराजे
तेच करी मज देवा, कल्पवरी
कुणा संतती, कुणा राज्य दे
मजला हरिचे देई रे, चरण परि

कुणा स्वर्ग दे, कुणा मुक्ति दे
मजला परि चरणाचा, दास करी
मी घाली ना संकट तुजवरि
केवळ मज चरणाचे, रजच करी

चिकटुनि राहिन सदा पदाला
इतुकी मम पुरवावी रे, आस परि
मिरवीन वैभव हे त्रैलोक्यी
येइल तरि नृपतीला, काय सरी ?

Lyrics -भा. रा. तांबे BHA. RA, TAMBE
Music -दशरथ पुजारी DASHARATH PUJARI
Singer -माणिक वर्मा MANIK VARMA

रे हिंदबांधवा थांब,Re Hind Bandhava Thamb

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशिवाली

तांबेकुलवीरश्री ती, नेवाळकरांची किर्ती
हिंदभूध्वजा जणू जळती
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली !

घोड्यावर खंद्या स्वार, हातात नंगि तरवार
खणखणा करिती ती वार
गोऱ्यांची कोंडी फोडित, पाडित वीर इथे आली

कडकडा कडाडे बिजली, शत्रुंची लष्करे थिजली
मग कीर्तिरूप ती उरली
ती हिंदभूमिच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली

मिळतील इथे शाहीर, लववितील माना वीर
तरू, झरे ढाळतिल नीर
ह्या दगडां फुटतिल जिभा कथाया कथा सकळ काळी

या बाळांनो या रे या,Ya Balano Ya Re Ya

या बाळांनो, या रे या !
लवकर भरभर सारे या !

मजा करा रे मजा करा !
आज दिवस तुमचा समजा
स्वस्थ बसे तोचि फसे;
नवभूमी दाविन मी,
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया !

खळखळ मंजुळ गाति झरे,
गीत मधुर चहुबाजु भरे
जिकडे तिकडे फुले फळे,
सुवास पसरे, रसहि गळे.
पर ज्यांचे सोन्याचे
ते रावे, हेरावे.
तर मग कामे टाकुनिया
नवी बघा या ही दुनिया !

पंख पाचुचे मोरांना,
टिपति पाखरे मोत्यांना,
पंख फडकती घोड्यांना,
मौज दिसे ही थोड्यांना.
चपलगती हरिण किती !
देखावे, देखावे.
तर मग लवकर धावुनिया
नवी बघा या ही दुनिया !

मावळत्या दिनकरा,Mavalatya Dinkara

मावळत्या दिनकरा
अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करा !

जो तो वंदन करी उगवत्या,
जो तो पाठ फिरवि मावळत्या,
रीत जगाची ही रे सवित्या !
स्वार्थपरायणपरा

उपकाराची कुणा आठवण ?
'शिते तोवरी भूते' अशी म्हण;
जगात भरले तोंडपूजेपण,
धरी पाठिवर शरा !

आसक्त परि तू केलीस वणवण,
दिलेस जीवन, हे नारायण,
मनी न धरिले सानथोरपण,
समदर्शी तू खरा !

प्रभु-सचिवा विरही मुखधूसर
होति दयामृदु नयनिष्ठुर कर
टाकुनि कारभार चंद्रावर
चाललास तू खरा !

मधु मागसी माझ्या,Madhu Magasi Majhya

मधु मागसी माझ्या सख्या, परी
मधुघटचि रिकामे पडती घरी !

आजवरी कमळाच्या द्रोणी
मधु पाजिला तुला भरोनी,
सेवा ही पुर्विची स्मरोनी,
करी न रोष सख्या, दया करी.

नैवेद्याची एकच वाटी,
अता दुधाची माझ्या गाठी;
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणी कशी तरी.

तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज
वृक्षझऱ्यांचे गूढ मधुर गुज
संसाराचे मर्म हवे तुज
मधु पिळण्या परि बळ न करी !

ढळला रे ढळला दिन सखया !
संध्याछाया भिवविति हृदया,
आता मधुचे नाव कासया ?
लागले नेत्र हे पैलतिरी.



भाग्य उजळले तुझे,Bhagya Ujalale Tujhe

भाग्य उजळले
तुझे चरण पाहिले

लागुनिया तुझे चरण
घर झाले हे पावन
इडापिडा जाति टळुन
हृदय विकसले

करुणेचा तू ठेवा
केली कशितरि सेवा
गोड करुनि परि देवा
सकळ घेतले

आता परि करिसि गमन
पुनः पुनः दे दर्शन
हेचि विनवि शिर नमवुन
हात जोडिले



पिवळे तांबुस ऊन कोवळे,Pivale Tambus Oon Kovale

पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर

झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी
कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी

हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळीचे
झोके घेते कसे चहुकडे हिरवे गालीचे

सोनेरी मखमली रुपेरी पंख कितिकांचे
रंग किती वर तऱ्हेतऱ्हेचे इंद्रधनुष्याचे

अशी अचल फुलपाखरे फुले साळीस जणु फुलती
साळीवर झोपली जणु का पाळण्यात झुलती

झुळकन्‌ सुळकन्‌ इकडून तिकडे किती दुसरी उडती
हिरे माणके पाचू फुटुनी पंखची गरगरती

पहा पाखरे चरोनी होती झाडांवर गोळा
कुठे बुडाला पलिकडिल तो सोन्याचा गोळा

निजल्या तान्ह्यावरी माउली,Nijalya Tanhyavari Mauli

निजल्या तान्ह्यावरी
माउली दृष्टि सारखी धरी

तिचा कलीजा पदरी निजला
जिवापलिकडे जपे त्याजला
कुरवाळुनि चिमण्या राजाला
चुंबी वरचेवरी

सटवाई जोखाइ हसविती
खळी गोड गालावरि पडती
त्याची स्वप्ने बघुनि मधुर ती
कौतुक ते अंतरी

अशीच असशी त्रिभुवनजननी,
बघत झोपल्या मज का वरुनी ?
सुखदुःखांची स्वप्ने बघुनी
कौतुकशी का खरी ?

नववधू प्रिया मी,Nav Vadhu Priya Mi

नववधू प्रिया, मी बावरते;
लाजते, पुढे सरते, फिरते

कळे मला तू प्राण-सखा जरि,
कळे तूच आधार सुखा जरि
तुजवाचुनि संसार फुका जरि,
मन जवळ यावया गांगरते

मला येथला लागला लळा,

सासरि निघता दाटतो गळा,
बागबगीचा, येथला मळा,
सोडिता कसे मन चरचरते !

जीव मनीचा मनी तळमळे
वाटे, बंधन करुनि मोकळे
पळत निघावे तुजजवळ पळे
परि काय करू ? उरि भरभरते


चित्र तुझे घेऊनि उरावरि
हारतुरे घालिते परोपरि,
छायेवरि संतोष खुळी करि,
तू बोलविता परि थरथरते


अता तूच भय-लाज हरी रे !
धीर देउनी ने नवरी रे :
भरोत भरतिल नेत्र जरी रे !
कळ पळभर मात्र ! खरे घर ते !

ते दूध तुझ्या त्या,Te Dudha Tujhya Tya

ते दूध तुझ्या त्या घटातले
का अधिक गोड लागे, न कळे ?

साईहुनि म‍उम‍उ बोटे ती
झुरुमुरु झुरुमुरु धार काढिती
रुणुझुणु कंकण करिती गीती
का गान मनातिल त्यात मिळे ?

अंधुक श्यामल वेळ, टेकडी

झरा, शेत, तरु, मधे झोपडी
त्यांची देवी धारहि काढी
का स्वप्नभूमि बिंबुनि मिसळे ?

या दृष्याचा मोह अनावर
पाय ओढुनी आणी सत्वर
जादु येथची पसरे मजवर
का दूध गोडही त्याचमुळे ?

तुझ्या गळा माझ्या गळा,Tujhya Gala Majhya Gala

"तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा "
"ताई, आणखि कोणाला ?"
"चल रे दादा चहाटळा !"

"तुज कंठी, मज अंगठी !"
"आणखि गोफ कोणाला ?"
"वेड लागले दादाला !"
"मला कुणाचे ? ताईला !"

"तुज पगडी, मज चिरडी !"
"आणखि शेला कोणाला ?"
"दादा, सांगू बाबांला ?"
"सांग तिकडच्या स्वारीला !"

"खुसू खुसू, गालि हसू"
"वरवर अपुले रुसू रुसू "
"चल निघ, येथे नको बसू"
"घर तर माझे तसू तसू."

"कशी कशी, आज अशी"
"गंमत ताईची खाशी !"
"अता कट्टी फू दादाशी"
"तर मग गट्टी कोणाशी ?"

तिनी सांजा सखे मिळाल्या,Tini Sanja Sakhe

तिनी सांजा सखे, मिळाल्या, देई वचन तुला
आजपासुनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला

कनकगोल हा मरीचिमाली जोडी जो सुयशा
चक्रवाल हे पवित्र, ये जी शांत गभीर निशा
त्रिलोक गामी मारुत, तैशा निर्मल दाहि दिशा
साक्षी ऐसे अमर करुनि हे तव कर करि धरिला

नाद जसा वेणूत, रस जसा सुंदर कवनांत
गंध जसा सुमनांत, रस जसा बघ या द्राक्षात
पाणि जसे मोत्यांत, मनोहर वर्ण सुवर्णात
हृदयी मी साठवी तुज तसा जीवित जो मजला

जन पळभर म्हणतिल,Jan Palbhar Mhanatil

जन पळभर म्हणतिल 'हाय हाय' !
मी जाता राहिल कार्य काय ?

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल,

तारे अपुला क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल काहि का अंतराय ?

मेघ वर्षतिल, शेते पिकतिल,
गर्वाने या नद्या वाहतिल,
कुणा काळजी की न उमटतिल,
पुन्हा तटावर हेच पाय ?

सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपुल्या कामि लागतिल,
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल
मी जाता त्यांचे काय जाय ?

रामकृष्णही आले, गेले !
त्याविण जग का ओसचि पडले ?
कुणी सदोदित सूतक धरिले ?
मग काय अटकले मजशिवाय ?

अशा जगास्तव काय कुढावे !
मोहि कुणाच्या का गुंतावे ?
हरिदूता का विन्मुख व्हावे ?
का जिरवु नये शांतीत काय ?

डोळे हे जुलमि गडे Dole He Julmi Gade

डोळे हे जुलमि गडे

रोखुनि मज पाहु नका

जादुगिरी त्यात पुरी

येथ उभे राहु नका



घालु कशी कशिदा मी ?

होति किती सांगु चुका !


बोचे सुइ फिरफिरुनी

वेळ सख्या, जाय फुका



खळबळ किती होय मनी !

हसतील मज सर्वजणी

येतिल त्या संधि बघुनि

आग उगा लावु नका !

चरणि तुझिया मज देई,Charani Tujhiya Maj Dei

चरणि तुझिया मज देई, वास हरी

चरणतळी तव कमल विराजे,
तेच करी मज देवा, कल्पवरी
कुणा संतती, कुणा राज्य दे,
मजला हरिचे देई रे, चरण परी

कुणा स्वर्ग दे, कुणा मुक्ति दे,
मजला परि चरणाचा, दास करी
मी घाली ना संकट तुजवरि,
केवळ मज चरणाचे, रजच करी

चिकटुन राहिन सदा पदाला,
इतुकी मम पुरवावी रे, आस परी
मिरवीन वैभव हे त्रैलोक्यी
येइल तरि नृपतीला, काय सरी ?

घन तमीं शुक्र बघ,Ghan Tami Shukra Bagh

घन तमीं शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना, बघ जरा तरी !

ये बाहेरी अंडे फोडुनि
शुद्ध मोकळ्या वातावरणी
का गुदमरशी आतच कुढुनी ?
रे ! मार भरारी जरा वरी

प्रसवे अवस सुवर्णा अरुणा
उषा प्रसवते अनंत किरणा
पहा कशी ही वाहे करुणा
का बागुल तू रचितोस घरी ?

फूल हसे काट्यांत बघ कसे
काळ्या ढगि बघ तेज रसरसे
तीव्र हिमांतुनि वसंतहि हसे
रे, उघड नयन, कळ पळे दुरी

फूल गळे, फळ गोड जाहले
बीज नुरे, डौलात तरु डुले
तेल जळे, बघ ज्योत पाजळे
का मरणि अमरता ही न खरी ?

मना, वृथा का भिशी मरणा ?
दार सुखाचे ते हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना
पसरोनी बाहु कवळण्या उरी

घट तिचा रिकामा,Ghat Ticha Rikama

घट तिचा रिकामा झऱ्यावरी
त्या चुंबिती नाचुनी जललहरी

अशी कशी ही जादू घडली
बघता बघता कशी हरपली
त्या समजुनिया राणी अपुली
तिज उचलुनी नेई कुणी तरी

मिळत चालल्या तीन्ही सांजा
दिवसाचा हा धूसर राजा
चंद्रा सोपुनि आपुल्या काजा
घे निरोप कवळुनी जगा करी

पलिकडे त्या करुनि कापणी
बसल्या बाया हुश्श करोनि
विनोद करिती रमती हसुनी
जा पहा तिथे कुणी ही भ्रमरी

तिथे वडाच्या पाळीभवती
नवसास्तव मृगनयना जमती
कुजबुजुनी गुजगोष्टी करिती
रतिमंजिरी हेरा तिथे तरी


पलीकडे वेळुंची जाळी
तेथे वारा धुडगुस घाली
शीळ गोड ती कुठुनि निघाली
ही झुळुक हरपली लकेरिपरी


तांदुळ पदरी बिल्वदल करी
चरण घालुनी जवळ तळ्यावरी
जमति शिवालयि पोक्त सुंदरी
हिरकणी बघा ही त्यात तरी

कुणि कोडे माझे उकलिल,Kuni Kode Majhe Ukalil

कुणि कोडे माझे उकलिल का ?

हृदयिं तुझ्या सखि, दीप पाजळे,
प्रभा मुखावरी माझ्या उजळे;
नव रत्ने तू तुज भूषविले,
मन्मम खुलले आतिल का ?
रहस्य शास्त्री कोणी कळविल का ?
कुणी कोडे माझे उक्लील का ?

हृदयी माझ्या गुलाब फुलला,
रंग तुझ्या गालांवर खुलला;
काटा माझ्या पायी रुतला,
शूल तुझ्या उरि कोमल का ?
माझ्या शिरी ढग नीळा डवरला,
तव नयनि पाउस खळखळला;
शरदच्चंद्र या हृदयी उगवला,
प्रभा मुखी तव शीतल का ?
मद्याचा मी प्यालो प्याला,
प्रिये, तयाचा मद तुज आला;
जखडिले कुणि दोन जीवांला
मंत्र बंधनी केवळ? का ?
रहस्य शास्त्री कोणी कळविल का ?
कुणी कोडे माझे उकलील का ?

कळा ज्या लागल्या जीवा,Kala Jyaa Lagalya Jeeva

कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या !
कुणाला काय हो त्याचे ? कुणाला काय सांगाव्या ?


उरी या हात ठेवोनी, उरींचा शूल का जाई ?
समुद्री चौकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू !
हमामा गर्जनेचा हो, न नेत्री एकही बिंदू

नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा,
भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौकडे दावा

नदी लंघोनि जे गेले, तयांची हाक ये कानी
,इथे हे ओढती मागे, मला बांधोनि पाशांनी

कशी साहू पुढे मागे, जिवाला ओढ जी लागे ?
तटातट्‌ काळजाचे हे तुटाया लागती धागे

पुढे जाऊ ? वळू मागे ? करू मी काय रे देवा ?
खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करी हेवा !



कशी काळ नागिणी,Kashi Kaal Nagini

कशी काळ नागिणी, सखे ग, वैरिण झाली नदी !
प्राणविसावा पैलतिरी ग, अफाट वाहे मधी.

सुखी मीन हे तरति न गणुनी लाटा कोट्यावधी
सुखी पाखरे गात चालली पार वादळी सुधी

पैलतटि न का तृण मी झाले? तुडविता तरी पदी
पैलतटि न का कदंब फुलले? करिता माळा कधी

पापिण खिळले तिरा, विरह हा शस्त्राविण वधी
प्राणांचे घे मोल नाविका, लावि पार, ने अधी