Showing posts with label L-मनमोहन नातू. Show all posts
Showing posts with label L-मनमोहन नातू. Show all posts

हळू हळू बोल कृष्णा,Halu Halu Bol Krishna

हळू हळू बोल कृष्णा, हळू हळू बोल

सासू दळते पलीकडे, तिला लागेल कानोसा
नणंद बसली माजघरी, तिला लागेल कानोसा
येतिल केव्हा माडीवरी, नाही त्याचा भरोसा

अजून सूरज नाही मावळला
तोच आलास चोर पावला
आणि ढळता पदर माझा धरला; जीव माझा घाबरला

आभाळात चमकू दे चंद्राला
सगळ्यांचा लागल्यावरी डोळा
रिझवाया येइन तुला अलबेला, कृष्णा, वचन देते तुला

राधे तुझा सैल अंबाडा,Radhe Tujha Sail Ambada

कसा ग गडे झाला ? कुणी ग बाई केला ?
राधे, तुझा सैल अंबाडा !

पृथ्वीच्या पेल्यात गाळिली, रजनीच्या बागेतिल द्राक्षे
भुलवुनि तुजला वनात नेली, रसरसलेली रात्र रंगली
वाजविता बासरी,
कचपाशांचा नाग उलगडी फडा !

पहिल्या चंचल भेटीमधली, बाल्याची कबुतरे पळाली
वेणी तिपेडी कुरळी मृदुला, सुटली घालित गंध-सडा !

भ्रमर रंगी हा श्याम सापडे, नीलकमल कचपाशि तव गडे
अरुणोदय होताच उलगडे, पाकळी पाकळी होइ मोकळी
या कोड्याचा झाला उलगडा !

मैत्रिणिंनो सांगू नका,Maitrinino Sangu Naka

मैत्रिणिंनो, सांगू नका नाव घ्यायला

नका विचारू स्वारि कशी ?
दिसे कशी, अन्‌ हासे कशी ?
कसं पाडलं मला फशी ?
कशी जाहले राजिखुशी ?
नजीक येता मुहूर्तवेळा

नका विचारू गमतीजमती
काय बोललो पहिल्या भेटी ?
कसे रंगले स्वप्न पहाटी ?
कशी रंगली लाली ओठी ?
कसा जाहला जीव खुळा ?

अर्थ उलगडे समरसतेचा
सुटे उखाणा संसाराचा
छंद लागला मजला त्यांचा
धुंद बने बुल्बूल जिवाचा
घरी यायची झाली वेळा

Ti Paha Bapujinchi Pran, ती पहा बापुजींची प्राण

ती पहा, ती पहा, बापुजींची प्राणज्योती
तारकांच्या सुमनमाला देव त्यांना वाहती

झुंजला राजासवे हा, रंगला रंकासवे हा
पेटता देहेहि आता, दिव्यता दावून जाती

चंदनाचे खोड लाजे, हा झिजे त्याहूनही
आज कोटी लोचनींच्या अश्रुमाला सांडताती

पृथ्विच्या अक्षांशि लाली, पृथ्विच्या रेखांशि लाली
चार गोळ्या ज्या उडाल्या, दशदिशांना कापताती

नाव ज्याचे ऐकुनीया थरकली सिंहासने
ना जरी तलवार हाती, हा अहिंसेचा पुजारी


सत्य मानी देव आणि झुंजला खोट्यासवे हा
मृत्युच्या अंतीम वेळी, नाम रामाचे मुखी

सिंधु गंगा आणि यमुना, धन्य झाली अस्थिनी
राख तूझी भारताच्या, तिलक झाली रे ललाटी

आमुचे नाव आसू ग, Aamuche Nav Aasu G

आमुचे नाव आसू ग !
गहिऱ्या गालावरल्या गुलाबांच्या कलिकांनो,
ऐका ग बाई ऐका ग !


कन्या सासऱ्याशी जाते ग बाई, मागे परतुनी पहात ही आई
पापणिच्या पालखीतुनी मिरवित मिरवित नेते ग

नयनांच्या नीरांजनी आम्ही जळतो वाती ग

बुबुळांच्या बागेमधली ही फुलपाखरे निळी
श्रीकृष्णाच्या मुरलीवरली सात टिंबे आम्ही दिली
गवळणीच्या गळ्यांतले आम्ही हार झालो ग

बिंदुएवढ्या आम्हा मध्ये-
तरते जगही बुडते ग, बुडते जगही तरते ग
आमुचे नाव आसू !