नयनकमल हे उघडीत हलके जागी हो जानकी
जागी हो जानकी
उठवाया तुज नभी येतसे हसत उषा प्रिय सखी
जागी हो जानकी
तृणपुष्पांच्या शय्येवरती स्वच्छंदे पहुडसी
वसुंधरेच्या कुशीत शिरुनी स्वप्नीही तरळसी
वृक्षावरती करिती पहाटे पक्षी किलबिल मुखी
जागी हो जानकी
मधुर स्वरांनी गाता सरिता हर्षे भूपाळी
वात्सल्ये तुज धरणीमाता प्रेमे कुरवाळी
येई द्यावया दूध मायेने नंदिनी बघ कौतुकी
जागी हो जानकी