Showing posts with label L-मंगेश कुळकर्णी. Show all posts
Showing posts with label L-मंगेश कुळकर्णी. Show all posts

वादळवाट,Vadalvaat

थोडी सागर निळाई थोडे शंख नि शंपले
कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यांत वाचले
कधी उतरला चंद्र तुझ्यामाझ्या अंगणात
स्वप्नपाखरांचा थवा विसावला ओंजळीत

कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट
हुंकारला नदीकाठ कधी हरवली वाट
वाऱ्यापावसाची गाज काळे भास गच्च दाट
कधी धूसर धूसर एक वादळाची वाट

मंथन,Manthan

दिला नियतीने स्त्री जन्माला विपरीतसा हा शाप जुना
ठायी ठायी दैत्यपणाची प्रचिती येई पुन्हा पुन्हा
स्त्रीच्या भाळी सदाच लिहिले जहर तेच कडु चार
पचवून त्याला अमृत उधळी तीच माय हळुवार
माणसातल्या देवपणाचा होतो तेव्हा साक्षात्कार
हाती येते नवनीत जेव्हा मंथन होते अपरंपार

मानसी,Manasi

कशी वेल्हाळ वेल्हाळ त्यांना हवीशी हवीशी
साऱ्या सख्या सजणींचे मन मानसी मानसी

कुणी थोडी स्वप्नवेडी, कुणी कर्तव्य कठोर
कुणा आकाशाची ओढ, कुणा जमिनीचा घोर
कुणा जगण्याची धुंदी, तरी धुंदीतही भान
कुणी स्वत:मध्ये मग्न, तरी ढळते न ध्यान
अशा सख्या सजणींचे मन मानसी मानसी

आम्ही सारे खवैय्ये, Aamhi Sare Khavaiyye

आम्ही म्हणजे, तुम्ही म्हणजे, तुम्ही आम्ही सारे
ज्यांना पोट आहे, तोंड आहे, जीभ आहे,
सोस आहे चमचमीत खाण्याचं, ते-
आम्ही सारे खवैय्ये !

एकमेकां शिकवीत, नवे काही बनवावे
किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे
छान छान देशी-विदेशी पदार्थ जाणून घ्यावे
चुकता-चुकता करता-करता खावे अन् खिलवावे
आम्ही सारे खवैय्ये !



आभाळमाया, Aabhalmaya

जडतो तो जीव
लागते ती आस
बुडतो तो सूर्य
उरे तो आभास
कळे तोच अर्थ
उडे तोच रंग
ढळतो तो अश्रू
सुटतो तो संग
दाटते ती माया
सरे तोच काळ
ज्याला नाही ठाव
ते तर आभाळ
घननीळा डोह
पोटी गूढ माया
आभाळमाया......
आभाळमाया.......