Showing posts with label L-रवींद्र भट. Show all posts
Showing posts with label L-रवींद्र भट. Show all posts

येणार तू येणार तू,Yenar Tu Yenar Tu

तुझिया स्वागता उभी समोरी, पाहुनी हसणार तू -
येणार तू, येणार तू !

अंगणात या फुले मोगरा
तुज आवडतो ज्याचा गजरा
आठवता मी लाज लाजते, उगा तयातून येणार तू -
येणार तू, येणार तू !

साडी ल्याले आज अबोली
तुझी आठवण जागी झाली
वसंत फुलला शिषिराकाळी, मुकेपणी वदणार तू -
येणार तू, येणार तू !

दर्पणात या तुला पाहते
तुझीच प्रतिमा हृदयी ठसते
तुझ्या संगती गाली हसते, मला कधी मिळणार तू ?
येणार तू, येणार तू !

दिव्या-दिव्यांची ज्योत सांगते,Divya Divyanchi Jyot

तबकामध्ये इथे तेवती निरांजनाच्या वाती
दिव्या-दिव्यांची ज्योत सांगते, तुझी न माझी प्रिती

समईसंगे आज उजळल्या या नयनांच्या वाती
आकाशातील नक्षत्रांच्या लक्ष लागल्या ज्योती
सुवासिनी मी वाट पाहते घेऊन पूजा हाती

आज उगवला दिन सोन्याचा हितगूज येई ओठी
पतिदेवाला पूजायाला भावफुलांची दाटी
दिवाळीत या मंगलसूत्रा शोभा येईल कंठी

तुझियासाठी देवापुढती तबक सजविले राया
पाट चंदनी समोर मांडून तुझीच होईन छाया
तुझ्या पूजनी सार्थ वाटती युगायुगांची नाती

श्रमिक हो घ्या इथे Shramik Ho Ghya Ithe

मानवतेचे मंदिर माझे, आत लाविल्या ज्ञानज्योती


श्रमिक हो, घ्या इथे विश्रांती !





बंधुत्वाची येथ सावली, अनाथ अमुचे मायमाउली


कधी दिसे का ईश राउळी ? देव ते अंतरात नांदती !





आम्ही लाडके विठुरायाचे, लेणे जरिही दारिद्र्याचे


अभंग ओठी मानवतेचे, मृदुंगी वेदनेस विस्मृती !





दार घराचे सदैव उघडे, भागवताची ध्वजा फडफडे


भावभक्तीचे आम्हा साकडे, पथिक हे परंपरा सांगती !

उठि श्रीरामा पहाट झाली,Uthi Shri Rama Pahat Jhali

उठि श्रीरामा, पहाट झाली; पूर्व दिशा उमलली
उभी घेउनी कलश दुधाचा, कौसल्या माउली

होमगृही या ऋषीमुनींचे सामवेद रंगले
गोशाळेतुन कालवडींचे, दुग्धपान संपले
मंदिरातले भाट चालले, गाऊन भूपाळी


काल दर्पणी चंद्र दावुनी सुमंत गेले गृहा
त्याच दर्पणी आज राघवा, सूर्योदय हा पहा
वसिष्ठ मुनिवर घेउन गेले पुजापात्र राउळी

राजमंदरी दासी आल्या रत्‍नदीप विझविण्या
ऊठ राजसा, पूर्वदिशेचा स्वर्ण-यज्ञ पाहण्या
चराचराला जिंकुन घेण्या अरुणप्रभा उजळली

उठा राष्ट्रवीर हो,Utha Rashtra Veer Ho

उठा राष्ट्रवीर हो
सुसज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला
उठा राष्ट्रवीर हो

युद्ध आज पेटले, जवान चालले पुढे
मिळुनी सर्व शत्रूला क्षणात चारुया खडे
एकसंघ होऊनी लढू चला, लढू चला
उठा उठा, चला चला

वायुपुत्र होऊनी धरु मुठीत भास्करा
होऊनी अगस्तिही पिऊनी टाकू सागरा
रामकृष्ण होऊ या, समर्थ होऊ या चला
उठा उठा, चला चला

चंद्रगुप्त वीर तो फिरुनी आज आठवू
शूरता शिवाजीची नसानसात साठवू
दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला
उठा उठा, चला चला

यज्ञकुंड पेटले प्रचंड हे सभोवती
दुष्ट शत्रू मारुनी तयात देऊ आहुती
देवभूमी ही अजिंक्य दाखवू जगा चला
उठा उठा, चला चला