Showing posts with label . Show all posts
Showing posts with label . Show all posts

उपवर झाली लेक लाडकी लग्नाला आली Upwar Zali lek ladki Lagnala ali

उपवर झाली लेक लाडकी लग्नाला आली
स्वयंवराची तिच्या घोषणा द्रुपदांनी केली

सुवर्णस्तंभावरी बसविली फिरती मत्स्याकृती
तेलामाजी बिंब पाहुनी छेदिल हो कोण ती ?
छेदिल त्याला विवाहमाला घालिल पांचाली

रतीहुनी ती अतीव सुंदर सुभगा गुणशालिनी
मऊ रेशमी अलकभार तर ख्यात स्वरूपाहुनी
धनुर्धरांच्या मनिंची आशा आव्हाना टपली

स्वयंवराचा भरला मंडप, गर्दी तरि ती किती !
देशोदेशचे जमले हो ते रणशार्दुल नृपती
भावासंगे तेजस्विनी ती सभागृही आली

हत्तीवरुनी जणू चमकली समूर्त सौदामिनी
सूतपुत्र अन्‌ कर्ण राहिला उभा त्वरे उठुनी
हीन कुळीचा म्हणुन तयाला संधी नच दिधली

इतुके होते तरिही कृष्णा कुणातरी न्याहळी
ब्राम्हणवेषें तोच निरखिला अर्जुन नृपमंडळी
जिवाशिवासम त्या दोघांची दृष्टभेट झाली

त्या नजरेने स्फुरले बाहू वीर सिद्ध झाला
अचुक लावुनी बाण तयाने मत्स्यभेद केला
धनंजयाच्या गळां धन्य ती वरमाळा पडली


Lyrics -  G D Madgulkar ग. दि. माडगूळकर
Music - M Krushnrao मा. कृष्णराव
Singer - Lata Mangeshkar लता मंगेशकर
Movie / Natak / Album - Kichakvadh किचकवध

एक झोका चुके काळजाचा,Ek Jhoka Chuke Kalajacha

एक झोका
चुके काळजाचा ठोका
एक झोका

उजवीकडे डावीकडे
डावीकडे उजवीकडे
जरा स्वतःलाच फेका

नाही कुठे थांबायचे
मागेपुढे झुलायचे
हाच धरायचा ठेका

जमिनीला ओढायचे
आकाशाला जोडायाचे
खूप मजा, थोडा धोका



उसळत तेज भरे,Usalat Tej Bhare

उसळत तेज भरे गगनात
उजळे मंदिर, शिखर विराजे, सोनेरी किरणांत !
गाभाऱ्यातील मूर्ति चिमुकली, न्हाली तव तेजात
प्रांगणातले तरु मोहरले पसरे गंध दिशांत

उत्साहाचे भरले वारे पवनाच्या हृदयांत
ओढ लागली त्या तेजाची मम जीवा विरहार्त

हृदय परी का अजुनी माझे, फिरते अंधारात?
उजळिल अंतर कधी निरंतर येउनि निजरुपात ?



उषःकाल होता होता,Ushakkal Hota Hota

उषःकाल होता होता काळरात्र झाली !
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !

आम्ही चार किरणांचीही आस का धरावी ?
जे कधीच नव्हते त्यांची वाट का पहावी ?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !

तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तोच दंश करिती आम्हा साप हे विषारी !
आम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली!

तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
आम्हावरी संसारची उडे धूळमाती !
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली !

अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी ?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दुःखाचीही चालली दलाली !

उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला!
कसे पुण्य दुर्दैवी अन्‌ पाप भाग्यशाली !

धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे !
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली !



उर्मिले त्रिवार वंदन तुला,Urmile Trivar Vandan Tula

उर्मिले, त्रिवार वंदन तुला !

त्यजुनि राजसुख जरी जानकी
वनात गेली प्रभु-सांगाती
राजमंदिरी तूच साहिल्या वियोगातल्या कळा !

सतत साउलीसम रामाला,
भ्राता लक्ष्मण कृतार्थ झाला
तुझ्या मनातिल मुक्या भावना, कधी न तो उमगला !

अंधारातिल तू ज्योतीसम
आयु वेचिले अपुले कण कण
सुख-तृप्तीचा कधि न तुला गे वाराही लाभला !

राम-जानकी वियोगातुनी
घडले रामायण हे भुवनी
तुझी तपस्या, तुझा त्याग परि नच लोकी ठसला !

थोरचरित तू, दूर राहुनी
सुगंध भरला तू रामायणि
उपेक्षाच परि तुझ्या कपाळी न्याय जगी आगळा !



उमा म्हणे यज्ञी माझे,Uma Mhane Yadni Majhe

मानभंग हाचि झाला मंडपी आहेर
उमा म्हणे, यज्ञी माझे जळाले माहेर

माहेरीच्या सोहळ्यात, नाहि निमंत्रिले जामात
चहू दिशी चालू होते संपदेचे थेर

लक्ष्मीचे जमले दास, पुसे कोण वैराग्यास
लेक पोटीचीही झाली कोपऱ्यात केर

आई-बाप, बंधु-बहिणी, दारिद्र्यात नसते कोणी
दीन दानतीचे सारे धनाचे कुबेर


दक्षसुता जळली मेली, नवे रूप आता ल्याली
पित्याघरी झाला ऐसा, दिव्य पाहुणेर

परत सासुऱ्याशी जाता, तोंड कसे दावू नाथा
बोल ईश्वराचे झाले सत्य की अखेर

प्राणनाथ करिती वास, स्वर्गतुल्य तो कैलास
नाचतात सिद्धी तेथे, धरूनिया फेर

असो स्मशानी की रानी, पतीगृही पत्नी राणी
महावस्त्र तेथे होते सतीचे जुनेर

उमलली एक नवी भावना,Umalali Ek Navi Bhavana

उमलली एक नवी भावना !
नसे वेगळी सखे तुझ्याहुन माझी संवेदना !

अघटित गेले अवचित हो‍उन

विसरुनी गेले मी माझेपण
रेशीमधागे गुंतविणाऱ्या प्रीतिच्या या खुणा !

वसुंधरेच्या कणाकणातून
आकाशाच्या अणुरेणुतून
एक आगळी रसरसलेली प्रगटे नवचेतना !

हात असावे असेच हाती
अचल ध्रुवापरि अपुली प्रीती
मुक्ती नको मज प्रीतिसाठी जन्म पाहिजे पुन्हा !

उभवू उंच निशाण,Ubhavu Uncha Nishan

उभवू उंच निशाण !
नव्या युगाचे नव्या जगाचे, दीन दीन जे, दलित दलित जे
त्या सर्वांना ध्वज हा देईल, सदैव छाया छान

अंध अमानुष रूढी घालिती अखंड जगी थैमान
त्या क्रुरांना हे क्रांतिचे मूर्तिमंत आव्हान

ताठ ठेविती मान झुंजुन भीमदेव धीमान
शूर शिपाई आम्ही त्यांचे व्यर्थ न ते बलिदान

ध्वज मिरवीत हा गौतम गेले टाकूनी राज्य महान
पुसुनी आसवे मानवतेचि होती बुद्ध महान
हे समतेचे हे ममतेचे गांधीजीचे गान
हरिजन धरुनि उरी स्वीकरी जे फकिरीचे वाण

उपवनिं गात कोकिळा,Upvani Gaat Kokila

उपवनिं गात कोकिळा
ऋतुराजा जीवाचा, दिसला तिज ॥

रसिकराज तिज दिसला
जीव जिवा सांपडला

फुलत चंद्र पाहुनियां कमलाजन ॥

उद्योगाचे घरी देवता,Udyogache Ghari Devata

उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी
जय श्रमदेवी, जय श्रमदेवी कृपा करी

दुर्दैवाचे पहाड फोडू
अमोल दौलत खणूनी काढू
मातीमधुनी सोने लपले धरणीच्या उदरी

उभ्या पिकाची हिरवी पाती
कणसामधले जपती मोती

खळ्यांत पडल्या डोंगरराशी, लुटूया दौलत खरी

दैव आमुचे आम्ही घडविले
भाग्यदान हे पदरी पडले
जगावेगळे वास्तुशिल्प हे, कृष्णाची नगरी

उद्धवा अजब तुझे सरकार,Uddhava Ajab Tujhe Sarkar

उद्धवा, अजब तुझे सरकार !
लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार !

इथे फुलांना मरण जन्मता,दगडाला पण चिरंजीविता
बोरी-बाभळी उगाच जगती, चंदनमाथि कुठार !

लबाड जोडिति इमले माड्या, गुणवंतांना मात्र झोपड्या
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार !

वाइट तितुके इथे पोसले, भलेपणाचे भाग्य नासले

या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार !



उदासीन का वाटती,Udaseen Ka Vatati

उदासीन का वाटती आज तारा ?
उदासीन का वाहतो आज वारा ?

जगुनी जगी काय जीवा मिळाले ?

तुझे पाखरा पंख सारे गळाले
तुझ्या कोटरी का तुझा कोंडमारा ?

नुरे आस का उंच झेपावण्याची ?
तुला वाटते लाज ऐशा जीण्याची !
कशासाठी हा चालला खेळ सारा ?

पडावे असे झाकुनी गच्च डोळे
स्वत:पासुनी दूर व्हावे निराळे
मुक्या अश्रुंनी का पुसावा पसारा

उत्तुंग आमुची उत्तर सीमा,Uttung Aamuchi Uttar

उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू

परक्यांचा येता हल्ला, प्रत्येक घर बने किल्ला
हे कोटि कोटि भुजदंड, होतील इथे ध्वजदंड
छातीची करुनी ढाल, लाल त्या संगिनीस भिडवू

बलवंत उभा हिमवंत, करि हैवानाचा अंत
हा धवलगिरी हा नंगा, हा त्रिशूळ कांचनगंगा
जरि झुंड पुंड शत्रूंची आली, खिंड खिंड अडवू

जरि हजार अमुच्या जाती, संकटामध्ये विरघळती
परचक्र येतसे जेव्हा, चौदांची एकच जिव्हा
मग पक्ष, पंथ जरि लक्ष आमुचे, सागरात बुडवू

देशाचा दृढ निर्धार, करु प्राणपणे प्रतिकार
ह्या नसानसांतिल रक्त, जाळील आसुरी तख्त
आम्ही न कुणाचे दास, नवा इतिहास पुन्हा घडवू

अन्याय घडो शेजारी, की दुनियेच्या बाजारी
धावून तिथेही जाऊ, स्वातंत्र्य-मंत्र हा गाऊ
स्वातंत्र्य, बंधुता, समता यांचा घोष सदा घुमवू

उतरली सांज ही धरेवरी,Utarali Sanj Hi Dharevari

उतरली सांज ही धरेवरी
मी उभी घेउनी कलश करी

सांज मनी दरवळे मनोहर
गात तरंगत जल लहरींवर
करीत व्याकुल माझे अंतर
मज साद घालतो परोपरी !

उरे शांतता या पथि निर्जन
प्रेमनदीला भरती येउन
उठती लहरी चंचल उसळून
ही वळति पाउले तटावरी

येईन का मी नाही परतुन ?
तिथेच कोणा राहिन बिलगुन ?
वीणा वाजवि कुणितरि मोहन
तो नाद अनोखा घुमे उरी

उतरला स्वर्ग इथे साक्षात,Utarala Swarga Ithe

संसारी या आनंदाची नित्य नवी बरसात
उतरला स्वर्ग इथे साक्षात

धरी घरावर चंदन छाया
फुले पसरती सुगंध-माया
सांज लाविते मांगल्याची सदनी या फुलवात

असे पित्याची पाखर मजवर
होऊन पावन नटले अंतर
मधु मायेचे दिव्य चांदणे फुलते अंधारात

हे जगदंबे मायमाऊली
असो शिरावर तुझी साउली
सुखसंसारी तारतील मज तुझेच आशिर्वाद

उडाला राजहंस गगनात,Udala Raj Hansa Gaganat

उडाला राजहंस गगनात
सांगितलेल्या कथा तयांच्या रुणझुणती कानात

अधीर पापण्या उंच उभारून

हंसामागे गेले लोचन
भर दिवसा ये जग अंधारून
जागेपणी मी फिरते बाई कोणा सुखस्वप्नात

राजकन्यके सखि दमयंती
बोलतेस तू कुणा संगती
सख्या मैत्रिणी कोणी न दिसती
कसली बाधा तुला झाली येथे उद्यानात


या बाधेचा बोध न झाला
अजुनी माझ्या तरूण मनाला
नकोस सांगू तूही कुणाला
प्रासादाची वाट विसरले ने मजसी सदनात

उठि श्रीरामा पहाट झाली,Uthi Shri Rama Pahat Jhali

उठि श्रीरामा, पहाट झाली; पूर्व दिशा उमलली
उभी घेउनी कलश दुधाचा, कौसल्या माउली

होमगृही या ऋषीमुनींचे सामवेद रंगले
गोशाळेतुन कालवडींचे, दुग्धपान संपले
मंदिरातले भाट चालले, गाऊन भूपाळी


काल दर्पणी चंद्र दावुनी सुमंत गेले गृहा
त्याच दर्पणी आज राघवा, सूर्योदय हा पहा
वसिष्ठ मुनिवर घेउन गेले पुजापात्र राउळी

राजमंदरी दासी आल्या रत्‍नदीप विझविण्या
ऊठ राजसा, पूर्वदिशेचा स्वर्ण-यज्ञ पाहण्या
चराचराला जिंकुन घेण्या अरुणप्रभा उजळली

उठि गोविंदा उठि गोपाला,Uthi Govinda Uthi Gopala

उषःकाल झाला, उठि गोविंदा, उठि गोपाला
हलके हलके उघड राजीवा, नील नेत्रकमला

तुझ्यापरी बघ जीवन-वारा, मिठी मारता प्राजक्ताला
धवल केशरी मृदुल सुमांचा, पाऊस अंगणी झिमझिमला

पर्ण पोपटी हिंदोळ्यावर, कंठ फुटतो आनंदाला
तुज भूपाळी आळवित सुंदर, चढली गगनी विहंगमाला

गोठ्यामधले मुके लेकरू, पीत झुरुझुरु कामधेनुला
किती आवरू भरला पान्हा, हासवि अरुणा तव आईला



उठि उठि गोपाला,Uthi Uthi Gopala

मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला
स्वीकारावी पूजा आता, उठि उठि गोपाला

पूर्व दिशेला गुलाल उधळुन ज्ञानदीप लाविला
गोरस अर्पुनि अवघे गोधन गेले यमुनेला
धूप दीप नैवेद्य असा हा सदुपचार चालला


रांगोळ्यांनी सडे सजविले रस्त्यारस्त्यातुन
सान पाउली वाजति पैंजण छुन छुनुन छुन छुन
कुठे मंदिरी ऐकू येते टाळांची किणकिण
एकतानता कुठे लाविते एकतारिची धून
निसर्ग मानव तुझ्या स्वागता असा सिद्ध जाहला


राजद्वारी झडे चौघडा शुभःकाल जाहला
सागरतीरी ऋषीमुनींचा वेदघोष चालला
वन वेळूंचे वाजवि मुरली, छान सूर लागला


तरुशिखरावर कोकिलकविने पंचम स्वर लाविला

उठा सकळ जन उठिले,Utha Sakal Jan Uthile

उठा सकळ जन उठिले नारायण ।
आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥

करा जयजयकार वाद्यांचा गजर ।
मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥२॥

जोडोनि दोन्ही कर मुख पाहा सादर ।
पायावरी शिर ठेवूनियां॥३॥


तुका म्हणे काय पढियंते तें मागा ।
आपुलालें सांगा सुख दुखे ॥४॥