Showing posts with label L-शाहीर रामजोशी. Show all posts
Showing posts with label L-शाहीर रामजोशी. Show all posts

हटातटाने पटा रंगवुनि,Hata-Tatane Pata

हटातटाने पटा रंगवुनि जटा धरिशि कां शिरी ।
मठाची उठाठेव कां तरी ॥

वनांत अथवा जनांत हो कां मनांत व्हावे परि ।
हरीचें नांव भवांबुधी तरी ॥

काय गळ्यांत घालुनि तुळशीची लांकडे ।
ही काय भवाला दूर करितिल माकडें ।
बाहेर मिरविशी आंत हरिशी वांकडे ।
अशा भक्तिच्या रसा-रहित तूं कसा म्हणविशी बुधा ।
हरिरस सांडुनि घेशी दुधा ॥

भला जन्म हा तुला लाधला खुलास ह्रदयीं बुधा ।
धरिसी तरि हरिचा सेवक सुधा ।
टिळा टोपिवर शिळा पडो या बिळांत करिसी जपा ।
तथापि न होय हरीची कृपा ।
दर्भ मुष्टिच्या गर्भि धरुनि निर्भर पशुची वपा ।
जाळिशी तिळा तांदुळा तुपा ॥

दंडकमंडलु बंड माजविशी मुंड मुंडिशी तपा ।
न सार्थक लटक्या सार्‍या गपा ॥
ही बारबार तलवार येईल काय पुन्हां ।
ह्या दुर्लभ नरदेहांत ठेविशी कुण्हा ।
भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा ।
वर्म कळेना धर्म घडेना कर्म चित्त न द्विधा ।
सदा हरि कविरायावर फिदा ॥

सुंदरा मनामध्ये भरली,Sundara Manamadhye

सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेलित शिरली मोत्याचा भांग ।
अरे गड्या हौस नाहीं पुरली म्हणोनि विरली पुन्हा नाहीं फिरलि कुणाची सांग ।
नारी ग ऽऽऽ , ग ग ग जी ।

जशि कळी सोनचाफ्याची न पडु पाप्याची दृष्टी सोप्याची नसंल ती नार ।
अति नाजुक तनु देखणी गुणाची खणी उभी नवखणी चढुन सुकुमार ।
नारी ग ऽऽऽ , ग ग ग जी ।

जशि मन्मथ रति धाकटी सिंहसमकटी उभी एकटी गळ्यामध्यें हार ।
अंगि तारुण्याचा बहर ज्वानिचा कहर मारिते लहर मदन तलवार ।
पायी पैंजण झुमकेदार कुणाची दार ? कोण सरदार हिचा भर्तार ?
नारी ग ऽऽऽ , ग ग ग जी ।

नाकामध्यें बुलाख सुरती चांदणी वरती चमकति परति हिच्यापुढे फार ।
किनकाप अंगिचा लाल हिजपुढे नको धनमाल ।
कविराज चमकतो हीर लोकशाहीर इतर शाहीर काजवा वांग ।
नारी ग ऽऽऽ , ग ग ग जी ।

सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेलित शिरली मोत्याचा भांग ।

महाराज गवरीनंदना,Maharaj Gavari Nandana

महाराज गवरीनंदना अमरवंदना दैत्यकंदना हे मंगलमूर्ती ।
ठेव कृपा दृष्टी एकदंत दीनावर पुरती ॥

हे स्वयंभू शुभदायका हे गणनायका गीतनायका अढळ दे स्फूर्ति ।
भवसमुद्र जेणेंकरून सहजगति तरती ।
महाराज गौरीनंदना हो महाराज गौरीनंदना ॥

म्हणऊन लागतो चरणी हे गजमुखा ।
दे देवा निरंतर स्मरणींच्या मज सुखा ।
दूर करी अंत:करणीच्या बा दु:खा ।
जय हेरंब लंबोदरा स्वरूपसुंदरा स्वामीसहोदरा हे विघ्ननिवारी ।
मज रक्षीं रक्षीं सहकुटुंब सहपरिवारीं ॥

तिन्ही त्रिकाळ गणगंधर्व न करितां गर्व साधुनी पर्व सर्व देवांनी ।
आळविली तुला गाऊन मधूर ही गाणी ।
महाराज गौरिनंदना हो महाराज गौरिनंदना ॥

हे प्राणी प्राण तव स्मरणाने जगवती ।
शशिसूर्य तुझ्या बळ भरणाने उगवती ।
हे धन्य धन्य अन्नपूर्णे श्री भगवती ।
कविराज असा हा दक्ष सेवेमध्ये लक्ष तयाचा पक्ष धरुन मज तारीं ।
महादेव प्रभाकर रक्षीं या अवतारीं ।
महाराज गौरिनंदना हो महाराज गौरिनंदना ॥