Showing posts with label L-राजा मंगळवेढेकर. Show all posts
Showing posts with label L-राजा मंगळवेढेकर. Show all posts

सती तू दिव्यरूप मैथिली,Sati Tu Divyaroop Maithili

दिव्यत्वाला चुकले नाही दिव्य सदा भाळी
सती तू दिव्यरूप मैथिली !

सुमनाहुनि तू कुसुम कोमला
रामप्रभू तुज पती लाभला
वनवासाची चौदा वर्षे पतिव्रते भोगिली !

विजनवासिही रामप्रभूचे
सुख न लाभले सहवासाचे
वनवासातही लंकेमाजी वनवासी राहिली !

शेवट झाला दुष्ट रिपूंचा
कलंक उरला तुज परघरचा
म्हणुनि शुद्धते शुद्धीसाठी अग्निचिता स्पर्शिली !

रामराज्य ये आयोध्येवर
भाग्य अडखळे उंबरठ्यावर
लोकराधनेसाठी प्रभुने तुजलाही त्यागिली !

रामायणी तुज दिगंत कीर्ती
सोशिलेस तू; पावन मूर्ती
भुमिसुता तू, दिव्यहि अंती, धरणीने रक्षिली !

कोणास ठाऊक कसा,Konas Thauk Kasa

कोणास ठाऊक कसा ? पण सिनेमात गेला ससा !
सशाने हलविले कान, घेतली सुंदर तान,
सा, नि, ध, प, म, ग, रे, सा, रे, ग, म, प
दिग्दर्शक म्हणाला, "वाहवा !", ससा म्हणाला, "चहा हवा !"

कोणास ठाऊक कसा पण सर्कशीत गेला ससा !
सशाने मारली उडी, भरभर चढला शिडी
विदुषक म्हणाला, "छान छान !", ससा म्हणाला, "काढ पान !"

कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा !
सशाने म्हंटले पाढे
(बे एकं बे, बे दुणे चार, बे त्रीक सहा, बे चोक आठ)घडघड वाचले धडे
गुरुजी म्हणाले, "शाब्बास !", ससा म्हणाला, "करा पास !"

उर्मिले त्रिवार वंदन तुला,Urmile Trivar Vandan Tula

उर्मिले, त्रिवार वंदन तुला !

त्यजुनि राजसुख जरी जानकी
वनात गेली प्रभु-सांगाती
राजमंदिरी तूच साहिल्या वियोगातल्या कळा !

सतत साउलीसम रामाला,
भ्राता लक्ष्मण कृतार्थ झाला
तुझ्या मनातिल मुक्या भावना, कधी न तो उमगला !

अंधारातिल तू ज्योतीसम
आयु वेचिले अपुले कण कण
सुख-तृप्तीचा कधि न तुला गे वाराही लाभला !

राम-जानकी वियोगातुनी
घडले रामायण हे भुवनी
तुझी तपस्या, तुझा त्याग परि नच लोकी ठसला !

थोरचरित तू, दूर राहुनी
सुगंध भरला तू रामायणि
उपेक्षाच परि तुझ्या कपाळी न्याय जगी आगळा !



असावा सुंदर चॉकलेटचा,Asava Sundar Chocolatecha

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
"हॅलो, हॅलो !" करायला छोटासा फोन !

बिस्कटांच्या गच्चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल

चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो

उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला

किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला