Showing posts with label L-शंकर जांभळकर. Show all posts
Showing posts with label L-शंकर जांभळकर. Show all posts

दाटे ढगांचा पसारा..DATE DHAGANCH PASARA

नभ व्याकूळ राहीला, त्याला आसमंती आस
किती साद घाली जीवा तव चातकाची कास
कश्शा बेभान या दिशा, कस्सा बेभान हा वारा
सुटे पहाटेचा वारा, दाटे ढगांचा पसारा...

हाक पावसाची... बळी व्याकूळ व्याकूळ
निळया सावल्या ढगांच्या... मनी पांगूळ पांगूळ
रात ऊरासवे कुंद, तिज चांदणे कुंपण
लाली दाटली गं नभी, रंगे विराणी कोंदण
कश्शा बेभान या दिशा, कस्सा बेभान हा वारा
सुटे पहाटेचा वारा, दाटे ढगांचा पसारा

वाट परतीची... गायी चालल्या गं घरा
सरी पावसाच्या आर्त... कशा आल्या गं गतीला
गारा बरसल्या खाली, गंध दाटला मातीला
झाला पावन हा देह फिटे वैशाख वणवा
कश्शा बेभान या दिशा, कस्सा बेभान हा वारा
सुटे पहाटेचा वारा, दाटे ढगांचा पसारा
दाटे ढगांचा पसारा...

Lyrics -शंकर जांभळकर SHANKAR JAMBLAKAR
Music -सुरेश वाडकर SURESH WADAKAR
Singer -तेजस चव्हाण TEJAS CHAVHAN
Movie / Natak / Album -कण्हेरीची फुले (२०१२) KANHERACHI FULE

माझ्या मनातला गावं MAZYA MANATAL GAV

माझ्या मनातला गावं, सये वडाच्या वेशीत

दोन्ही बाजूंनी डोंगर, घर झाडाच्या कुशीत

आंब्या फणसाची झाडे, माझ्या घराचं कुंपण

दारी अबोली शेवंती, ताटवा फुलला छान

भाव भक्तीचे अंगण, मध्ये तुळशी वृंदावन

सदा सांजवेळी आम्ही तया करितो वंदन

सान पणती तेवते, ठाव काळोखाचा घेते

प्रेम आपुलकी नाते घराघरात नांदते

सगे सोबती बैसोनि गूज प्रेमाचे गाते

सये सांगू तुला कैसे, मन तेथेच रमते


Lyrics -शंकर जांभळकर SHANKAR JAMBHALAKAR
Music -तेजस चव्हाण, TEJAS CHAVHAN
Singer -प्रसेनजीत कोसंबी, PRASENJEET KOSAMBI
Movie / Natak / Album -कण्हेरीची फुले (२०१२ )KANHERACHI FULE

ही वाट वनातून जाते HI WAT VANATUN JATE

ही वाट वनातून जाते...
नीरव नितांत जेथे
चालायाचे मज एकाकी...
पथ एकाकी जेथे !

स्तब्ध शांतता असेल जेथे
भय कुणाचे नसेल तेथे
इहलोकीच्या सुखचैनीचा
मंद सुवास... मनमौजीचा
झिडकारूनी ते सर्व लयाचे,
आक्रंदण त्या क्रुध्द भयाचे ...
पथ तो पाहण्या असेल जेथे
चालायाचे मज एकाकी...
पथ एकाकी जेथे !

पाणंदीतला शीतल वारा
नसेल जेथे स्वार्थी कावा..
'मी' पणाला नसेल थारा
सत्य -शांतीचा असे पहारा !
शस्त्र दुधारी केवळ शब्द
नियती स्तब्ध स्थित प्रारब्ध !
पथ तो पाहण्या असेल जेथे
चालायाचे मज एकाकी...
पथ एकाकी जेथे !

ही वाट वनातून जाते...
नीरव नितांत जेथे
चालायाचे मज एकाकी...
पथ एकाकी जेथे !

Lyrics -शंकर जांभळकर SHANKAR JAMBHALKAR
Music -तेजस चव्हाण TEJAS CHAVHAN
Singer -बेला शेंडे BELA SHENDE
Movie / Natak / Album -कण्हेरीची फुले (२०१२) KANHERACHI FULE

समाधीवरील फुले SAMADHANAVARIL FULE

अडगळीच्या जागी... अगदी एकांतवासात...
त्या बुरुजाच्या पायथ्याशी... जिथे सूर्य अस्ताचलाला जातोय,
तिथेच... गडाच्या माचीवर,
शांत निवांत पहुडलेली एकुटवाणी समाधी आहे !

मी पांथस्त, जेव्हा त्या वाटेने जातो,
तेव्हा समाधीवरील फुले माझ्याकडे पाहून विस्मयानं हसतात
रानवेलीच्या वेढयाने,
जेव्हा समाधी झाकोळली जाते,
तेव्हा सायंप्रहरीचा वारा
ताटव्यातून त्या फुलांना स्पर्शून हलकेच
खाली खोल दरीत विसावतो

त्या वाऱ्याच्या अल्‌वार झुळकीसोबत
समाधीवरील फुलांची पखरण होते !
नजीकच डवरलेला हा सोनचाफा दिसतोय?
म्हणे त्याच्या बुंध्याशी आजही अगदी निश्चलपणे
तो समाधीतील महापुरूष विसावला आहे !
अनंत दिवसांच्या चिरनिद्रेत !!

पराक्रमाची जेव्हा शर्थ केली होती,
म्हणे रक्ताच्या सडयानेच इथली माती भिजली होती
आज त्याच रक्ताच्या थेंबाथेंबातून
इथे सोनचाफा बहरलाय !
आणि तोही किती इमानी !
नित्य बरसून विराणी गातोय ..
धुळीला मिळालेल्या इतिहासाची !

Lyrics -शंकर जांभळकर SHANKAR JAAMBHALKAR
Music -तेजस चव्हाण TEJAS CHAVHAN
Movie / Natak / Album -कण्हेरीची फुले (२०१२) KANHERACHI FULE

कण्हेरीची फुले KANHERICHI FULE

आता कुठे हवेत निस्तेजता जाणवू लागलीए !
जेव्हा हवेत उष्ण उन्हाच्या झळा जाणवतात,
तेव्हा परिसर कसा ओकाबोका वाटतो नाही...!

नदीच्या निळयाशार पाण्याचा
काळया पत्थराला जेव्हा स्पर्श होतो,
खळाळत्या पाण्यालाही अवखळ वाऱ्याची साथ लाभते,
हलके हलके नदीभोवती हिरव्याकंच वेलींचे कुंपण पडते,
त्या हिरव्या घनगर्द वनराईत भारून राहिलेला तोच अस्पर्शित गारवा...
माझ्या आसुसलेल्या मनाला,
पुन्हा एकवार तीच गारेगार भुरळ घालतो...

तसा एकाएकी हवेत मंद सुवास दाटतो !
नदीकपारीत लाल-गुलाबी ताटवे फुलारतात ...
उगवतीची कोवळी उन्हे पिऊन,
नदीच्या सुस्त घाट-शीळांवर नीरव विराण पठारांवर,
एकाएकी रंगांचीच उधळण होते !

तसं फारसं कुणी वाट बघत नाहीच त्यांची,
तरीही अचानक येण्यातली गंमत ती मात्र सवयीनं जपतात !

वाट बघणारा विरळाच असतो ... माझ्यासारखा...
त्याला अगदी सुखावून सोडतात ती... नुसत्या दर्शनानं...!

न मागताच जणु उभारी देतात मनाला,
माझ्यासाठीच आल्याच्या थाटात, माझीच होऊन जातात... अतिनाजूक... अगाधसुंदर
कण्हेरीची फुले !!


Lyrics -शंकर जांभळकर SHANKAR JAMBHALAKAR
Music - तेजस चव्हाण TEJAS CHAVHAN
Singer -प्राजक्ता गव्हाणे PRAJAKATA GAVHANE
Movie / Natak / Album -कण्हेरीची फुले (२०१२)  KANHERICHI  FULE (2012