Showing posts with label L-आ. रा. देशपांडे 'अनिल'. Show all posts
Showing posts with label L-आ. रा. देशपांडे 'अनिल'. Show all posts

वेळ झाली भर माध्यान्ह,Vel Jhali Bhar Madhyanha

वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन
नको जाऊ कोमेजून, माझ्या प्रीतिच्या फुला

तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी
कसा तरी जीव धरी, माझ्या प्रीतिच्या फुला

वाहतात वारे जळते, पोळतात फुलत्या तनुते
चित्त इथे मम हळहळते, माझ्या प्रीतिच्या फुला

माझी छाया माझ्याखाली, तुजसाठी आसावली
कशी करू तुज सावली, माझ्या प्रीतिच्या फुला

दाटे दोन्ही डोळां पाणी, आटे नयनांतच सुकुनी
कसे घालु तुज आणुनी, माझ्या प्रीतीच्या फुला

मृगजळाच्या तरंगात, नभाच्या निळ्या रंगात
चल रंगू सारंगात, माझ्या प्रीतीच्या फुला

वाटेवर काटे वेचीत,Vatevar Kate Vechit

वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलांत चाललो

मिसळुनी मेळ्यात कधी, एक हात धरूनि कधी
आपुलीच साथ कधी करित चाललो

आधिचा प्रसाद घेत, पुढची ऐकीत साद
नादातच शीळ वाजवीत चाललो

चुकली तालात चाल, लागला जीवास बोल
ढळलेला तोल सावरीत चाललो

खांद्यावर बाळगिले ओझे सुखदुःखाचे
फेकून देऊन अता परत चाललो

बाई या पावसानं लावियली,Bai Ya Pavasane Laviyali

बाई या पावसानं, लावियली झीमझीम
भिजविलं माळरान, उदासलं मन
बाई या पावसानं !

दिनभर देई ठाणं, रात्रिस बरसून
सकाळिचं लोपविलं कोवळं ऊन छान
बाई या पावसानं !

फुलली ही जाई-जुई, बहरून वाया जाई
पारिजातकाची बाई, कशी केली दैन
मातीत पखरण
बाई या पावसानं !

नदीनाले एक झाले, पूर भरुनीया चाले
जिवलग कोठे बाई पडे अडकून
नच पडे चैन !
बाई या पावसानं !

थकले रे डोळे माझे Thakale Re Dole Majhe

थकले रे डोळे माझे

वाट तुझी पाहता

वाट तुझी पाहता रे

रात्रंदिन जागता




सुकला रे कंठ माझा

तुज आळविता

तुज आळविता रे

नाम तुझे जपता




आटले रे अश्रु माझे

वाहता वाहता

वाहता वाहता रे

आठवणी काढता




शिणला रे जीव माझा

तुजविण राहता

तुजविण राहता रे

तुज नच भेटता

गगनि उगवला सायंतारा,Gagani Ugavala Sayantara

गगनि उगवला सायंतारा
मंद सुशीतळ वाहत वारा

हाक तुझी मज स्पष्ट ऐकु ये
येइ सखे ये, बैस जवळि ये
गगनि उगवला सायंतारा

घाल गळा मम तव कर कोमल
पसरु दे श्वासाचा परिमल
घेई मम हृदयात निवारा
गगनि उगवला सायंतारा

बैस जवळि ये, बघ ही पश्चिम
कोमल रंगी फुलली अनुपम
ये नेत्री ते घेउ साठवुनि
गालावरती गाल ठेवुनी
गगनि उगवला सायंतारा

उदासीनता विसर जगाची
तुझाच मी, तू माझि सदाची
विरले हृदयांतरि, बघ अंतर
तू अणिक मी जवळ निरंतर !
गगनि उगवला सायंतारा

केळीचे सुकले बाग,Keliche Sukale Baag

केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी
कोमेजलि कवळी पाने, असुनि निगराणी

अशि कुठे लागली आग, जळति जसे वारे
कुठे तरी पेटला वणवा, भडके बन सारे

किती दूरचि लागे झळ, आंतल्या जीवा
गाभ्यातिल जीवनरस, सुकत ओलावा

किती जरी घातले पाणी, सावली केली
केळीचे सुकले प्राण, बघुनि भवताली

कुणि जाल का,Kuni Jaal Ka

कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा ?
रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको अपुला गळा

आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली
फार पूर्वीचा दिला तो श्वास साहुन वाळला
आताच आभाळातला काळोख मी कुरवाळिला

सांभाळुनी माझ्या जिवाला मी जरासे घेतले
इतक्यात येता वाजली हलकी निजेची पाउले
सांगाल का त्या कोकिळा, की झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी रात्र जागुन काढली

उघड दार उघड दार,Ughad Daar Ughad Daar

उघड दार उघड दार
प्रियकरास आपुल्या
उघड दार, उघड दार

मध्यरात्रिच्या नभात
शांत चांदणे खुले
पांघरूनी रश्मिजाल
गाढ झोपली फुले

अजुन हा निजे न भृंग
मरंद-गुंगिने भुलून
मंजु गुंजनात दंग
अधिर त्या नको सकाळ
त्या दिशाहि उजळल्या
मध्यरात्रिच्या निळ्यांत
उघड उघड पाकळ्यां

अजुनी रुसून आहे, Ajuni Rusun Aahe

अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना !

समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटे ना

धरिला असा अबोला, की बोल बोलवेना !

का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना
मिटवील अंतराला, ऐसी मिठि जुटे ना !

की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना !



आज अचानक गाठ पडे, Aaj Achanak Gatha Pade

आज अचानक गाठ पडे

भलत्या वेळी भलत्या मेळी
असता मन भलतीचकडे

नयन वळविता सहज कुठेतरि
एकाएकी तूच पुढे

नसता मनिमानसी अशी ही
अवचित दृष्टिस दृष्ट भिडे

दचकुनि जागत जीव नीजेतच
क्षणभर अंतरपट उघडे

गूढ खूण तव कळुन नाकळुन
भांबावुन मागे मुरडे

निसटुनि जाई संधीचा क्षण
सदा असा संकोच नडे