Showing posts with label . Show all posts
Showing posts with label . Show all posts

आश्रम की हरिचे हे,Aashram Ki Hariche He

आश्रम की हरिचे हे गोकुळ
भासतसे वनवासही मंगल

गोधन देई अमृतधारा
मुरली घुमवितो मंजुळवारा
दूर सावळी सरिता यमुना
आठवणींची छेडित वीणा
जीवन रम्य निरागस निर्मळ

नंदनंदना भाऊराया
तुझिच छाया दिसे वनी या
वाऱ्यांनो, जा द्वारावतीला
निरोप सांगा श्रीकृष्णाला
संभ्रमी रे तव भगिनी प्रेमळ

आळविते मी तुला विठ्ठला,Aalavite Mi Tula Vitthala

आळविते मी तुला विठ्ठला
देहमनाला व्यापुन उरला तव चरणांचा लळा

रोज पहाटे नयनापुढती
तुझी प्रगटते श्यामल मूर्ती
मनभावांच्या निर्मळ ज्योती घेते आरतीला

उपासनेची उटी लाविते
शुभनामांची माळ गुंफिते

निर्मोहाचा रेखुन देते तिलक तुझ्या भाळा

प्रेमघना रे कधि तू येशिल
ममजीवनवन फुलवुन जाशिल
रात्रंदिन मी हा मधुमंगल ध्यास मनी धरिला

आसावल्या मनाला माझाच,Aasavalya Manala Majhach

आसावल्या मनाला माझाच राग येतो
नाही कशी म्हणू मी येईलही पुन्हा तो

आमंत्राणाविना तो या जीवनात आला
आला तसाच गेला भुलवून भाबडीला
त्या दुष्ट आठवाने हृदयात दाह होतो

आता पराजितेला आधार कोण आहे ?
ह्या पांगळ्या कथेचे होणार काय आहे ?
शिशिरास सावराया म्हणती वसंत येतो

ताटातुटी टिकावी आता नकोत भेटी
तुटतात का परंतु ह्या घट्‌ट जन्मगाठी
माझे मला कळेना हा भास काय होतो

आस आहे अंतरी या,Aas Aahe Antari Yaa

आस आहे अंतरी या, आसरा हृदयात दे
साद देते मी तुला अन्‌ तू मला पडसाद दे

जुळविता तार विणेच्या, जुळविली आम्ही मने
प्रेमगीतांना प्रिया तू, आगळे संगीत दे

चांदवेडे हृदय माझे, ओढ घेई तुजकडे

विरहि जो अंगार आहे, गारवा तू त्यास दे

प्रीतिचे दोघे प्रवासी, मार्गि येथे भेटलो
यौवनाच्या मंदिरी या, चांदण्याचा स्पर्श दे

आवाज मुरलीचा आला,Avaj murlicha ala

आवाज मुरलीचा आला
हा बासरीवाला आला
आलापित गोड सूराला

मोहरुनि मनी लता विकसली

स्वरसुमने किती ती वरी फुलली
कशि भ्रांत पडे भ्रमराला

जळवंतीची मंजुळ गाणी
नादिति या खळखळातुनि
कशी येई लहर यमुनेला

नादब्रम्ही त्या भान हरपता
जिवा शिवाची एकरूपता
मग अंत न पार सुखाला

आवडसी तू एकच ध्यास,Aavadasi Tu Ekach Dhyas

आवडसी तू, आवडसी तू,
एकच ध्यास तुझा घेतला, आवडसी तू !

आवडतो तुजसी तसा वेष गडे घातला,
वेष गडे घातला, आवडसी तू !

आवडते तुजसी तसे रूप दिसे साजरे
आवडते तुजसी तसे हास्य फुले लाजरे
गीत नव्हे, ओठातून भाव फुटे आतला
आवडसी तू !

माझ्यावर मोहिनीचे मंत्र मीच फुंकिले

आगमनाआधी तुला पूर्णपणे जिंकिले
आवडिच्या मुशीत तुझ्या मी स्वभाव ओतला

तूच एक नाथ मला, मीच तुझी सहचरी
आधारा अधीर सख्या देहलता नाचरी
भेट ठरो जन्मागाठ शुभमुहूर्त साधला
आवडसी तू !

आवडती वस्तू लोभानें,Aavadati Vastu Lobhane

आवडती वस्तू लोभानें ।
पसरिला घ्यावयालागि हात किं यानें ॥

सकल करांगुलिंवर रेखा या दिसति ।

किं सविमल जालमिषानें ॥

कमल सकाळीं किंचित फुलतां
अविरलनवदलपरि मी मानें ॥

आवडती भारी मला माझे,Aavadati Bhari Mala Majhe

आवडती भारी मला माझे आजोबा

पाय त्यांचे थकलेले
गुडघ्यात वाकलेले
केस सारे पिकलेले
ओटीवर गीता गाती माझे आजोबा

नातवंडा बोलावून
घोगऱ्याशा आवाजानं
सांगती ग रामायण
मोबदला पापा घेती माझे आजोबा

रागेजता बाबा-आई
अजोबांना माया येई
जवळी ते घेती बाई
कुटलेला विडा देती माझे आजोबा

खोडी करी खोडकर
अजोबांची शिक्षा थोर
उन्हामध्ये त्यांचे घर
पोरांसंगे पोर होती माझे आजोबा

आल्या नाचत नाचत,Aalya Nachat Nachat

आल्या नाचत नाचत मेनका रंभा
आज अवतरली जशी इंद्रसभा

कानात पाचुची कर्णफुले
कंठात हि-यांची माळ रूळे
नवरत्न कटी वर चमचमले
जशी रवि-चंद्राची तेज:प्रभा

स्वर किन्नर गाती सप्त सूरा
दशदिशा उजळती रंग जरा
देहभान हरपले चराचरा
रसपान करीत नटराज उभा

आलो कुठून कोठे,Aalo Kothun Kothe

आलो कुठून कोठे तुडवीत पायवाट

काटे सरून गेले उरली फुले मनात



प्रत्येक पावलाचे होते नवे इशारे

साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत



आले वयात मी बाळपणाची,Aale Vayat Mi Balpanachi

आले वयात मी, बाळपणाची संगत सुटली
गोऱ्या गाली प्रीतिची लाली अवचित उठली !

निशिदिनी, बाइ, मी मनामध्ये तळमळते
ही नवखिच कसली हुरहुर मज जाळते
जिव होतो गोळा
झोप नाही डोळा
येतो दाटुन गळा
सख्यासोबतिणींची मला संगत नकोशी वाटली !

तू जिवलग माझा, बाळपणातिल मैत्र
बोल हसुन जरा, बघ, फुलांत नटला चैत्र
एका ठायी बसू
गालागालांत हसू
डोळा मोडून पुसू
चारी डोळे भेटता दोन मने एकवटली !

आलीस सांजवेळी घेऊन,Aalis Sanjveli Gheun

आलीस सांजवेळी घेऊन स्वप्न माझे
तव अंतरी परंतु जाणीव मात्र लाजे

किती लालबुंद होशी, भित्रीच तू अखेर
ओठांतुनी फुटेना तरी शब्द तो अधीर
डोळ्यांत गंधवेडी मुग्धा तुझ्या विराजे

तळव्यांवरी तुझ्या ग रंगेल धुंद मेंदी
माझ्याही या करांना लावी खुशाल नादी
हृदयी चितारलेले ते चित्र आज साजे

स्वप्नांतल्या छटांना गिरवून सांजतारा
लागे सूरात गाऊ फुलवूनिया पिसारा
तेजात नाहती त्या, स्वर मी तुला दिले जे

आली हासत पहिली रात,Aali Hasat Pahili Raat

आली हासत पहिली रात
उजळत प्राणांची फुलवात

प्रकाश पडता माझ्यावरती
फुलते बहरून माझे यौवन
हसली नवती चंचल होऊन
नयनांच्या महालात

मोहक सुंदर फूल जिवाचे
पतिचरणावर प्रीत अर्पिता
मीलनाचा स्पर्ष होता
विरली अर्धांगात

लाज बावरी मी सावरता
हर्षही माझा बघतो चोरून
भास तयाचा नेतो ओढून
स्वप्नाच्या हृदयात



आली सखी आली प्रियामीलना,Aali Sakhi Aali Priya

आली सखी आली, प्रियामीलना !

काय पाहती व्याकुळ लोचन ?
कानोसा घे मध्येच थबकुन
आतुर अंतरि, कंपित अधरी
थरथरते कामना
आली सखी आली, प्रियामीलना !

काजळकुंकुम रेखुन ल्याली
साडी जांभळी, हिरवी चोळी
घेइ तनुवरी शेला भर्जरि
लपवी यौवनखुणा
आली सखी आली, प्रियामीलना !


बकुळफुलांनी गुंफिलि वेणी
कर्णभुषणे झुलती कानी
रुणझुणु गाती कंकण हाती
गुपित सांगती जना
आली सखी, आली प्रियामीलना !

आली माझ्या घरी ही दिवाळी,Ali Majya Ghari Diwali

आली माझ्या घरी ही दिवाळी
सप्तरंगात न्हाऊन आली

मंद चांदणे धूंद श्वास हा, मी तर त्यात भिजावे

जन्मजन्म रे तुझ्या संगती एकरूप मी व्हावे
प्रीत नयनी वसे, लाज गाली हसे
कोर चंद्राची खुलते भाळी


पाऊल पडता घरी मुकुंदा, गोकुळ हरपून गेले
उटी लावता अंगी देवा, सुगंध बरसत आले
हर्ष दाटे उरी, नाथ आले घरी
सूर उधळीत आली भूपाळी

नक्षत्रांचा साज लेऊनी, रात्र अंगणी आली
दीप उजळले नयनी माझ्या ही तर दीपावली
संगे होता हरी, जाहले बावरी
मी अभिसारीका ही निराळी



आली बघ गाई गाई,Aali Bagha Gai Gai

आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात
फुललासे निशिगंध, घोटाळली ताटव्यांत

आली बघ गाई गाई, चांदण्यांचे पायी चाळ
लाविले का अवधान ऐकावया त्यांचा ताल ?

आली बघ गाई गाई, लावी करांगुली गाली

म्हणुन का हसलीस, उमटली गोड खळी

आली बघ गाई गाई, लोचनांचे घेई पापे
म्हणून का भारावले, डोळे माझ्या लाडकीचे ?

आली बघ गाई गाई कढितसे लांब झोका
दमलीस खेळूनिया, झाक मोतियांच्या शिंपा

आली बाई पंचिम रंगाची,Aali Bai Panchami Rangachi

संक्रांतीला भेटू ऐसी केली होती बोली
पुनव फाल्गुनी होऊन गेली तेव्हा स्वारी आली
अशा या वायदेभंगाची, आली बाई पंचिम रंगाची

आला तैसे जा परतून
फिरा नगरच्या पेठेतून
राया मजला चोळी आणा, आणा भिंगाची
आली बाई पंचिम रंगाची

लेईन चोळी सजेन खूप
उरी जिव्हारी तुमचे रूप
शमेल लाही अंगाची,ग बाई अंगाची
आली बाई पंचिम रंगाची

फाल्गुनातली राजस रात
भिजुनी जाईल प्रीतरसात
जोडी कमळण भृंगाची, ग बाई दोघांची
आली बाई पंचिम रंगाची

आली प्रणय-चंद्रिका करी,Aali Pranaya Chandrika Kari

आली प्रणय-चंद्रिका करी
सुंदरी, मदनाची मंजिरी

जशी झळकते चटकचांदणी
कामिनी राजहंसगामिनी !

नवती नवनीताच्या परी
मुलायम माषुक मख्खन-परी !

जिचिया उरोज-बहरावरी
कंचुकी तटतटली भरजरी !

रसीली नयनांची चातुरी
कोवळी अधरांची माधुरी

चेतवी मदनरंग-दीपिका
दिलाच्या रंग-महालांतरी !

आली दिवाळी मंगलदायी, Aali Diwali Mangaldaye

आली दिवाळी मंगलदायी
आनंद झाला घरोघरी

चला चला ग, जमुनि मैत्रिणी
गुंफु या विविध फुले मधुनी

रेखोनी रांगोळी अंगणि या
फुले चौफुले रंगी भरू या
स्वातंत्र्याची सजवू मूर्ती गोजिरी

चला चला त्वरा करा

अंजिरी दीप डुले गगनी
चंदेरी शालू तुला रमणी
सुंदर नटली लक्षुमी ही किति तरी !
चला चला पहातरी

हाती सोनियाची आरती
लखलखती माणिक-ज्योती
ओवाळुन घे प्राण तुझ्या पदरी,
आणा आणा निरांजना

आली दिवाळी दिवाळी, Aali Diwali Diwali

लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी ।
भाग्य घेऊनिया आली आज धनत्रयोदशी ॥

आली दिवाळी दिवाळी, पहाटेच्या त्या आंघोळी ।
घरोघरी जागविते माय मुले झोपलेली ॥

घरोघरी दीपज्योती वरसाचा मोठा सण ।
क्षणोक्षणी होते आई आज तुझी आठवण ॥

चार वरसांमागे होता हात तुझा अंगावरी ।

कधी नाही जाणवली हिवाळ्याची शिर्शीरी ॥

आज झोंबतो अंगाला पहाटेचा थंड वारा ।
कुठे मिळेल का आई तुझ्या मायेचा उबारा ॥

तुझ्यामागुती बाबांनी दुःख दाखविले नाही ।
त्यांच्या पंखात वाढलो तुझा भाऊ आणि ताई ॥

तुझ्याविना आई घर सुनेसुनेसे वाटते ।
आणि दिवाळीच्या दिशी तुझी आठवण येते ॥


सासरीच्या या संसारी माहेराची आठवण ।
आठवती बाबा भाऊ आणि दारीचे अंगण ॥

अंगणात पारिजात कोण देई त्याला पाणी ।
दारी घालते रांगोळी माझ्यावाचून का कोणी ॥

आई तुझ्या पायापाशी घोटाळते माझे मन ।
जिथे उभे अंगणात तुळशीचे वृंदावन ॥

दारापुढे लिंबावर साद घालतो कावळा ।

कोण येणार पाहुणा आतुरला जीव भोळा ॥

शेजारच्या घरातली दळणाची घरघर ।
अजूनही येती कानी आठवणीतून स्वर ॥

आमच्या ग दारावरनं घोड्यांच्या गाड्या गेल्या ।
भावांनी बहिणी नेल्या बीजेसाठी ॥