Showing posts with label L-ना. धों. महानोर. Show all posts
Showing posts with label L-ना. धों. महानोर. Show all posts

सूर्यनारायणा नित्‌ नेमाने,Suryanarayana Nit Nemane

सूर्यनारायणा नित्‌ नेमानं उगवा
अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा

ओंजळीनं भरू दे गा पाखरांच्या चोची
दु:खात पंखांना असो सावली मायेची

आबादानी होवो शेत भरू दे दाण्याचे
तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे

शब्दांचा हा खेळ मांडला,Shabdancha Ha Khel

शब्दांचा हा खेळ मांडला तुझ्या कृपेवर ईश्वरा
आम्हां शक्ती दे शब्द-शारदे गौरीतनया ईश्वरा

आम्ही जन्मभर भाट होऊनी शब्दांपाशी नांदतो
गंधर्वाच्या गोड गळ्याची आज प्रार्थना मागतो
तुझा शब्द दे आकाशाचा.. झांज डफावर, स्वर गहिरा

वळण वाटातल्या झाडीत,Valan Vatatalya

वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद
वाहत्या निर्झरांचे गुंतले भवबंध

अशीच बांधलेली जन्माची नातीगोती
स्वातीच्या नक्षत्रांनी भिजली काळी माती
मातीचा गंध ओला, दरवळ रानभरी
पीकात वेचताना पाऊस ओल्या पोरी

तुरीच्या हारी गच्च, गर्भार ओटीपोटी
ज्वारीच्या ताटव्यांशी बोलती कानगोष्टी
डाळिंबी लालेलाल, रानाला डोळे मोडी
मेंदीच्या पावलांशी लागट लाडीगोडी

कौलारू घरट्यांशी तुळशीवृंदावन
ऊसाच्या सावल्यांशी पांघरू येत मन
आकाश पांघरुनी निर्मळ गाणं गावं
पक्षांच्या पंखांवर माहेरी रोज यावं

लिंगोबाचा डोंगूर,Lingobacha Dongur

लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला
ठाकर गडी तिथे कधी नाही गेला

हाती घेई दोर ठाकराचा पोर
सुर्व्या देवा भर डोक्यावरी आला
नाग्याचा दोरा पुरा खाली-वर गेला
डोंगर चढायचा सराव चालला

लाल पैठणी रंग माझ्या,Laal Paithani Rang Majhya

लाल पैठणी रंग माझ्या चोळीला
तुमी यावं सजण रंग होळीला

उगा मस्करी करीन कशाला
तुमच्यासाठी सजला बंगला

अशी नार झुबेदार, हिचा कोण भरतार
हिरव्या चुड्याचा मनगटी झंकार
घट्ट नेसून हिंडते नौवार

गोऱ्या पायात पैंजण रुमझुमला
तुमी यावं सजण रंग होळीला

शपथ गळ्याची तुम्हा सांगते
सारा शिणगार घेऊन बसते

रूप हीचं रूपखनी, नाही हळू पाळी कुणी
कुंकू भरलं कपाळी भरदार
हिच्या अंगावर सोन्याची जरतार

माझ्या ओठीचा लाल इडा देते तुम्हाला
तुमी यावं सजण रंग होळीला

राजसा जवळी जरा बसा,Rajasa Javali Jara Basa

राजसा, जवळी जरा बसा
जीव हा पीसा, तुम्हांविण बाई
कोणता करू शिणगार सांगा तरी काही

त्या दिशी करुन दिला विडा
पिचला माझा चुडा कहर भलताच
भलताच रंगला काथ लाल ओठात

ह्या तुम्ही शिकविल्या खुणा
सख्या सजणा, देह सकवार
सोसता न येईल अशी दिली अंगार

मी ज्वार नवतीचा भार
अंग जरतार ऐन हुरड्यात
तुम्ही नका जाऊ साजणा हिवाळी रात



मी रात टाकली,Mi Raat Takali

मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली

हिरव्या पानांत, हिरव्या पानांत
चावंळ चावंळ चालती
भर ज्वानीतली नार
अंग मोडीत चालती

ह्या पंखांवरती, मी नभ पांघरती
मी मुक्त मोरनी बाई, चांदन्यात न्हाती

अंगात माझिया भिनलाय ढोलिया
मी भिंगरभिवरी त्याची गो माल्हन झाली
मी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली



मी गाताना गीत तुला,Mi Gatana Geet Tula

मी गाताना गीत तुला लडिवाळा
हा कंठ दाटुनी आला

मी दुःखाच्या बांधुन पदरी गाठी
जपले तुज ओटी-पोटी
कधी डोळ्यांना काजळ तूज भरताना
गल्बला जीव होताना

खोप्यात जिथे चिमणी रोज पिलांना
सांगते गोष्ट नीजताना
ते ऐकुनी का मन हे फडफड होई
पाळणा म्हणे अंगाई

आयुष्याला नको सावली काळी
ईश्वरा तूच सांभाळी
झुलता झोका जावो आकाशाला
धरतीचा टिळा भाळाला



भरलं आभाळ पावसाळी,Bharala Aabhal Pavasali

भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग
बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना

पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना
बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना

निळ्या डोळ्यांवरी मेघूटांच्यापरी
वाट पाहिली डोळां चळ थांबेना
श्रावणाचं ऊन मला झेपेना

श्रावणाच्या सरी पानभरी थर्थरी
हिर्व्या मोराची थुईथुई थांबेना
निळ्या मोराची थुईथुई थांबेना
बाई, श्रावणाचं ऊन मला झेपेना



भर तारुण्याचा मळा,Bhar Tarunyacha Mala

भर तारुण्याचा मळा, कमळिणी कळा, फुलांचा भार
डोळ्यांतून हलका पाऊस भिजला मोरनी झालंय भार

बहरलं केवड्याचं रान, दरवळे पान पान पान
जाळीमंदी लपल्या ग पोरी, गोरी त्या छान छान छान

अलवार फुलांची होरी राजस गोरी गहिनागौर
ह्या कळ्यां-फुलांच्या देठांमधले रंग सये गर्भार

देहाला डसले जहर तयाची लहर पेटते ओठी
हा बहर कहर अंगात विकावी रात पाखरासाठी

पौषात हिवाळी रात गळ्यामंदी हात गच्च गुंफावे
मोकळ्या खुळ्या देहाच्या विभवांवरी जाणते रावे

भर तारुण्याचा मळा कमळिणी कळा गगन घनदाट
डोळ्यांत लालसर गडद गर्दशी स्पर्श जांभळी रात

बाळगू कशाला व्यर्थ,Balagu Kashala Vyarth

बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भिती ग
बाई जडली आता दोन जीवांची प्रीति ग
बाई ग, बाई ग

काट्यांचे सरले दिसं आता मधुमास
ये सुगंध उधळीत नवी नवी बरसात
गुंफुन गळ्यामध्ये हात चांदण्या राती ग


रानात सांडले नीळे नीळे आभाळ
ह्या पिकात केसर गंध, तसा सहवास
घरकूल हेच पंखात पांघरू राती ग



पूरबी सूर्य उदेला जी,Purabi Surya Udela Ji

पूरबी सूर्य उदेला जी

उडती पंछी आकाशी, घागरी पाणोठ्यापाशी
दूर नदीवरी वेणू रुणझुण घुंगरुमाळा जी


प्राणांतून प्रार्थना कपाळी कुमकूम लावून जी
जात्यावर घरघर देवालय मृदुंग झाला जी

तुम्ही जाऊ नका हो रामा,Tumhi Jau Naka Ho Rama

तुम्ही जाऊ नका हो रामा, जीव तुम्हांवर जडला
नका सोडू अधांतरी सुना तुम्हाविण बंगला

साजण रुसला ग धरिला अबोला
तुझ्या सावलीशी हिचा पाय गुंतलेला

कुंतीच्या गावची दु:ख भरली कथा
दाट वेणीत काळ्या फुले माळता
तुम्हा कट्यामुट्यांच्या वाटेवरी हो कसे भेटला

तुम्ही पाणकळा माझा भरला मळा
तुमच्या सावलीच्या अंगावरती झळा
लळा लावून जाता आता सांगू कुणाला हा मामला

जांभुळपिकल्या झाडाखाली,Jambhul Pikalya Jhadakhali

जांभुळपिकल्या झाडाखाली, ढोल कुनाचा वाजं जी
येंधळ येडं पाय कुनाचं, झिम्मा फुगडी झालं जी

समिन्द्राचं भरलं गानं, उधानवारं आलं जी
येड्यापिस्या भगतासाठी पुरतं लागिरं झालं जी

मोडुन गेल्या जुनाट वाटा, हा बोभाटा झाला जी
चोचीमंदी चोच टाकुनी, दानं उष्टं झालं जी

जांभुळीच्या झाडाखाली, कोयडं बोल बोलं जी

जांभळीचं बन थोडं, पिकून पिवळं झालं जी

जाळीमंदी झोंबतोया,Jalimandi Jhombatoya

राधे, यमुनेच्या काठावर दोरवा
ग बाई बाई जाळीमंदी झोंबतोया गारवा

बाळपणीची रिमझिम गाणी, अंगावरती शिडकावा
झिम्मा-फुगडी खेळ खेळता, राधेला ग चंद्र हवा

शब्द ना बोलता बासरीचा गळा
तुझा अंबाडा बांधे कृष्ण सावळा

गोऱ्या अंगावरी मेंदी भरतो हरी
मोरपिसाचा रंग झाला झावळा

जाईजुईचा गंध,Jai Juicha Gandha

आषाढातल्या पाणकळा, सृष्टी लावण्याचा मळा
दु:ख भिरकावुनी येती शब्द माहेरपणाला
शब्द माहेरपणाला, नवा गांधार जिण्याला
मेघुटांच्या पालखीला, डोळे गेले आभाळाला

जाईजुईचा गंध मातीला
हिर्व्या झाडांचा छंद गीताला

पानावरती सांडले मोती
ओलं आभाळ आलं भेटीला

रूपदेखणी झाडीत कुणी
सर्व्या रानाचा जीव पांगला

आंबेराईत, डोळे मोडीत
कुणी डोळ्यांचा झुला बांधला

डोंगर काठाडी ठाकरवाडी Dongar Kathadi Thakarvadi

डोंगर काठाडी ठाकरवाडी

ठाकरवाडीला झोपड्या चारी



भगताचा नाग्या उंबर भारी

गर्दीत धावऱ्या हुल्लड होरी

डोंगरपारी जुनी पथारी

ठाकरवाडीच्या डोलती वरी




झिंगून कोनी झिंगून कोनी

झिंगून कोनी अंग झोकूनी

फाटक्या वस्तीला जल्माच्या खनी

भगताचा नाग्या हुल्लड होरी

जुन्याच गोष्टी देवाच्या पारी

ऐकत बसते ठाकरवाडी

ठाकरवाडीच्या झोपड्या चारी

चिंब पावसानं रानं झालं,Chimb Pavasane Raan Jhale

चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली, चांदणं गोंदणी

झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी
रूपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी

राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरूनी

तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी


अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता ना येई काही साजणा बोलांनी



घन ओथंबून येती,Ghan Othambun Yeti

घन ओथंबून येती, बनांत राघू ओगिरती
पंखावरती सर ओघळती, झाडांतून झडझडती

घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती
डोंगर लाटा वेढित वाटा, वेढित मजला नेती

घन ओथंबून आले, पिकांत केसर ओले

आडोशाला जरा बाजूला, साजण छैल छबिला
घन होऊन बिलगला

गडद जांभळं भरलं आभाळ,Gadad Jambhala Bharala

गडद जांभळं भरलं आभाळ
मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ

सांजेच्या मलूल धुळवड येळेला
भरल्या पदरानं झाकावी भूल
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ