Showing posts with label . Show all posts
Showing posts with label . Show all posts

ऊन पाऊस,Oon Paus

ऋतु सोबतीने सारी जुनी झाडे नवी होता
पाने फुले सांगतात ऊन-पावसाची कथा

सुख सोसावे उन्हाचे, दु:ख पावसाळी गावे
अशा सोसण्याला द्यावी किती नवी-जुनी नावे
अशा जगण्याची सय किती भावी होता होता
ऊन पावसाची कथा, ऊन पावसाची कथा

जसा वारा हेलावून सांगे वादळाची व्यथा
ऊन पावसाची कथा, ऊन पावसाची कथा

ऊठ शंकरा सोड समाधी,Utha Shankara Sod

ऊठ शंकरा सोड समाधी
वनात आला मदन पारधी

सुरंग आला सर्व उपवना
सुगंध येतो शीतल पवना

चालुनि आली वसंतसेना
शरणागती घे युद्धाआधी

पंचशरांनी भाता भरुनी
उभा रतिपती माझ्या नयनी
पुष्पधनुष्या करि सरसावुनी
अचुक तुझ्या तो हृदया वेधी

सप्तस्वरांची झडवित नौबत
मीनांकित ध्वज मिरवित मिरवित
जवळी ये रथ, आला मन्मथ
सख्य तयाशी सविनय साधी

ऊठ रे राघवा उघड,Utha Re Raghava Ughad

ऊठ रे राघवा, उघड लोचन अता

सूर्य क्षितिजावरी कांचनाच्या रथी
रत्‍नकण सांडले या सुनिर्मल पथी
देव प्राचीवरी उधळिती वैभवा

पाखरांचे गळे जाहले मोकळे
किरण पाण्यावरी उतरले कोवळे
उमलल्या पाकळ्या,जाग ये राजिवा

जाग रे राजसा, संपली ही निशा
गंध चोहीकडे, उजळल्या दशदिशा
तेज-आनंद रे तूच माझ्या जिवा

ऊठ राजसा घननीळा,Utha Rajasa Ghan Nila

ऊठ राजसा घननीळा, हासली रे वनराणी
उडे थवा पाखरांचा, गात गात मंजुळ गाणी

यमुनेचं गार गार,खळाळलं आता पाणी
ऊठ सख्या नीलमणी, साद घालिती गौळणी

नेत्रकमळे उघड बाळा, पुष्प सांगे डोलुनी
सांगतो रे ऊठ राजा, मंद वारा वाहुनी

जाग आली गोकुळाला, नाद छुम छुम पैंजणी
ऐकु येई धेनुची ही, हाक तुझिया अंगणी

ऊठ राजसा उठी राजीवा,Ootha Rajasa Uthi Rajiva

ऊठ राजसा, उठी राजीवा अरुणोदय झाला
तुझियासाठी पक्षीगणांचा वाजे घुंगुरवाळा

उषा हासरी येई नाचत, रुणुझुणु अपुले पैंजण घुमवित
विंझणवारा ताल देउनी नाचे रे घननीळा

जात्यावरती मंजुळ ओवी घराघरातुन ऐकु येई
सूर सनईचे मिठी घालुनी वाहती तुज वेल्हाळा

बाल रविचे किरण कोवळे, दुडुदुडु येतील धावत सगळे

करतील गालावरती तुझिया मोरपिसांचा चाळा

ऊठ मुकुंदा हे गोविंदा,Utha Mukunda He Govinda

ऊठ मुकुंदा, हे गोविंदा, मनरमनणा सत्वरी
सख्या दाटला तव स्नेहाचा पान्हा माते उरी

विहंग वर गगनात विहरती, गात तुला वागती
दंवबिंदूंनी नटुनी अवनी आनंदे हासती
शेवंती दरवळली रानी फुलला बघ केवडा

प्राजक्ताच्या मृदु पुष्पांचा पडला दारी सडा

धुंद वाहतो गंध, निवळले चंद्राचे चांदणे
रांगोळ्यांनी सजू लागली गोकुळिची अंगणे
गोपी यमुनाजळा चालल्या कुंभ सवे घेऊनी
वनी निघाल्या गोपालांचा श्रवणी पडतो ध्वनी


मंथन करिता द्विजननांची किणकिणती कंकणे
सडे शिंपिता व्रजबालांची रुणझुणती पैंजणे
तिष्ठती द्वारी तुझे सौंगडी वाट तुझी पाहती
हे घननिळा, हे गोपाला, तुजला आवाहती

ऊठ पांडुरंगा आता,Utha Panduranga Aata

विश्व माणसांनी भरले, तुला नाही जागा
ऊठ पांडुरंगा आता, ऊठ पांडुरंगा

रामकृष्ण दैवत होते इथे पुण्यवान
पंचकन्यकांनी दिधले सतीचेच वाण
त्याच दिव्य संस्काराचा तुटे आज धागा

पुरुष होय बाईलवेडा राज्य बायकांचे
पुत्र आणि कन्या यांना बंध ना कुणाचे
घरोघरी संसाराचा दिसे नाच नंगा

ऋषीमुनी झाले येथे साधुसंत झाले
देवधर्म नीती गेली कलियुग आले
कुणीतरी माणुसकीचा मंत्र एक सांगा

ऊठ पंढरीच्या राजा,Utha Pandharichya Raja

ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला
थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला

पूर्व दिशी उमटे भानु, घुमे वारियाचा वेणु
सूर सूर वेणुचा त्या सुगंधात न्हाला

कुक्षी घेऊनिया कुंभा, उभी ठाकी चंद्रभागा
मुख प्रक्षाळावे देवा गोविंदा गोपाला

पुंडलीक हाका देई उभ्या राही, रखुमाबाई
निरांजने घेऊन हाती सिद्ध आरतीला



ऊठ जानकी मंगल घटिका,Utha Janaki Mangal Ghatika

ऊठ जानकी, मंगल घटिका आली आनंदाची
सरली आता चौदा वर्षे अपुल्या वनवासाची

सरले आता इथे राहणे रानि-वनी अंधारी
तातांच्या वचनांची पूर्ती झाली आज अखेरी
ऊठ जानकी, मंगल घटिका आली आनंदाची


पर्णकूटिका सोडायाची वेळ आजला आली
पुन्हा जायचे आपण अपुल्या महालि वैभवशाली
वल्कल सोडुन राजवस्त्र ही फिरुनि तुज ल्यायाची

राजधानिला जायाचे चल फिरुनी आता त्वरे
दुरुनी दिसतिल चमचमणारी शिखरे अन्‌ मंदिरे
क्षणात होशिल फिरुनी आता राणी तू राजाची

ऊठ ऊठ पंढरीनाथा,Utha Utha Pandhari Natha

ऊठ ऊठ पंढरीनाथा ऊठ बा मुकुंदा
उठ पांडुरंगा देवा पुंडलिक वरदा

अस्त पातलासे चंद्रा, तारका विझाल्या

फुलत फुलत वेलीवरच्या कळ्या फुले झाल्या
जाग पाखरांना आली, जाग ये सुगंधा

पात्र पाणीयाचे हाती, उभी असे भीमा
दर्शनास आले तुझिया ज्ञानदेव, नामा
भक्तराज चोखामेळा दुरुनी देई सादा

देह-भाव मिळुनी केला काकडा मनाचा
निघून धूर गेला अवघ्या आस वासनांचा
ज्ञानज्योत चेतविली ही उजळण्या अवेदा