Showing posts with label L-संत चोखामेळा. Show all posts
Showing posts with label L-संत चोखामेळा. Show all posts

सुखाचें हें नाम आवडीनें,Sukhache He Naam

सुखाचें हें नाम आवडीनें गावें ।
वाचे आळवावें विठोबासी ॥१॥

संसार सुखाचा होईल निर्धार
नामाचा गजर सर्वकाळ ॥२॥

कामक्रोधांचें न चलेचि कांही ।
आशा मनशा पाहीं दूर होती ॥३॥

आवडी धरोनी वाचें म्हणे हरिहरि ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥

सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं,Sukhache Je Sukha

सुखाचें जें सुख चंद्रभागेतटीं ।
पुंडलीकापाठीं उभें ठाकें ॥१॥

साजिरें गोजिरें समचरणीं उभें ।
भक्ताचिया लोभें विटेवरी ॥२॥

कर दोनीं कटीं श्रीमुख चांगले ।
शंख चक्र मिरवले गदापद्म ॥३॥

चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी ।
चंदनाची उटी सर्व अंगी ॥४॥

सुख अनुपम संतांचे,Sukha Anupam Santanche

सुख अनुपम संतांचे चरणीं ।
प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे ॥१॥

तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली ।
जेणें निगमावली प्रगट केली ॥२॥

संसारी आसक्त माया मोह रस ।
ऐसे जे पतीत तारावया ॥३॥

चोखा म्हणें तेच ज्ञानदेवी ग्रंथ ।
वाचिता सनाथ जीव होती ॥४॥

पंढरीचे सुख नाहीं,Pandhariche Sukha Nahi

पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं ।
प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे ॥१॥

त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ ।
दक्षिण मुख वाहात चंद्रभागा ॥२॥

सकळ संतांचा मुगुटमणी देखा ।
पुंडलीक सखा आहे जेथें ॥३॥

चोखा म्हणे तेथें सुखाची मिराशी ।
भोळ्या भाविकांसी अखंडित ॥४॥

जोहार मायबाप जोहार,Johar Maybap Johar

जोहार मायबाप जोहार ।
तुमच्या महाराचा मी महार ॥१॥

बहु भुकेला झालो ।
तुमच्या उष्ट्यासाठी आलो ॥२॥

बहु केली आस ।
तुमच्या दासाचा मी दास ॥३॥

चोखा म्हणे पाटी ।
आणिली तुमच्या उष्ट्यासाठी ॥४॥

अबीर गुलाल उधळीत,Abir Gulal Udhalit




अबीर गुलाल उधळीत रंग ।
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ॥१॥

उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जाती हीन ।
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन ।
पायरीशी होऊ दंग गावूनी अभंग ॥२॥

वाळवंटी गावू आम्ही वाळवंटी नाचू ।
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ ।
विठ्ठलाचे नाम घेऊ हो‌उनी निःसंग ॥३॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती ।
चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग ॥४॥



आम्हां नकळे ज्ञान, Aamhi Nakale

आम्हां नकळे ज्ञान न कळे पुराण ।
वेदाचें वचन नकळे आम्हां ॥१॥

आगमाची आढी निगमाचा भेद ।

शास्त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥

योग याग तप अष्टांग साधन ।
नकळेची दान व्रत तप ॥३॥


चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा ।
गाईन केशवा नाम तुझें ॥४॥