Showing posts with label L-प्रविण दवणे. Show all posts
Showing posts with label L-प्रविण दवणे. Show all posts

निघालो घेऊन दत्ताची,Nighalo Gheun Dattachi

दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा

निघालो घेऊन दत्ताची पालखी
आम्ही भाग्यवान आनंद निधान

झुलते हळूच दत्ताची पालखी

रत्नांची आरास साज मखमली
त्यावर सुगंधी फुले गोड ओली
झुळुक कोवळी चंदनासारखी

सातजन्मांची ही लाभली पुण्याई
म्हणून जाहलो पालखीचे भोई
शांत माया-मूर्ती पहाटेसारखी

वाट वळणाची जीवाला या ओढी
दिसते समोर नरसोबाची वाडी
डोळियांत गंगा जाहली बोलकी

दोन रात्रीतील आता संपला,Don Ratriteel Aata Sampala

दोन रात्रीतील आता संपला वेडेपणा
वेड पांघरण्यात होता वेगळा वेडेपणा

वाजली वेडी कडी अन्‌ दार हे शहाण्यापरी
मोगरा माळून आला देखणा वेडेपणा

उंबरा ओलांडताना धीट हे झाले धुके
ही धिटाई झेलताना लाजला वेडेपणा

अजून मजला कळत नाही वेड कोणी लाविले
वेड मज हा लावणारा कोणता वेडेपणा

दे साद दे हृदया,De Saad De Hridaya

दे साद दे, हृदया
जन्मांतरींचा ध्यास हो, हृदया

तृष्णेचा घट हा, धन हे माझे;
जळ हे भवती गमले ओझे
पैलतिरीचा मेघ हो हृदया

जन्मांचा पथ हा, जुळले धागे
छायेपरी ही नियती येई मागे
त्या संचिताचा सूर हो हृदया

जागली क्षणघनमाला
जन्मच अवघा बरसून आला
त्या चेतनेचा श्वास हो हृदया

तेजोमय नादब्रम्ह हे,Tejomay Nadabramha He

तेजोमय नादब्रम्ह हे

रुणझुणले काळजात, लखलखले लोचनात
अंबरात, अंतरात, एकरूप हे

सृष्टीचा देव्हारा, दरवळला गाभारा
सर्व दिशा कांचनमय, पवन मंद मंगलमय
आरतीत तेजाच्या विश्व दंग हे


कुसुमांच्या हृदयांतून, स्नेहमयी अमृतघन
चोहिकडे करूणा तव, बरसून ये स्वरलाघव
परमेशा साद घालि तुझे रूप हे

तनमनाच्या मंदिरी या,Tanmanachya Mandiri Ya

तनमनाच्या मंदिरी या जागवू या चेतना
अर्थ लाभो जीवनाला हीच अमुची प्रार्थना

चेतना माझ्यातही, याच्यातही, त्याच्यातही
पृथ्वी-जल-आकाश अन्‌ वायुतही, तेजातही
विश्वव्यापी या स्वरूपा नित्य माझी वंदना

एक आहे मागणे हातात या सामर्थ्य येवो
भीक-लाचारी-दयेचा स्पर्श ना आम्हांस होवो
कष्ट करु आयुष्य फुलवू मंत्र जप रे तू मना

घेतले व्रत आज आम्ही स्वप्न ते सत्यात येवो
दीन-दुर्बल-वंचितांचा विसर ना आम्हांस होवो
या जगी आनंद नांदो ही मनाची कामना

चल्‌ झेलूया गाणे,Chal Jheluya Gane

चल्‌ झेलूया गाणे, वासंतीक उखाणे;
कांचनआशा बहरुन आल्या, वयात आली राने !

गर्भरेशमी पाउलवाटा कशा सुगंधी झाल्या ?
जळथेंबाचा पाउस नसुनी दिठीदिठीतुन न्हाल्या
हे कुठले अमृतदेणे ? हे वासंतीक उखाणे;

कांचनआशा बहरुन आल्या, वयात आली राने !

पदराचा कापूर जाहला, हवेत उडतो बाई
डोळ्यांमधल्या स्वप्नांवरती, रंग शिंपुनी जाई
हे पंख नसुनी उडणे, हे वासंतीक उखणे;
कांचनआशा बहरुन आल्या, वयात आली राने !

मंदिर झाले या हृदयाचे, दिशाच झाल्या बाहू
ओंजळीतला ऋतू फुलांचा, कुठल्या चरणी वाहू ?

हे तुझेच अक्षय लेणे, हे वासंतीक उखाणे;
कांचनआशा बहरुन आल्या, वयात आली राने !