Showing posts with label L-संजीवनी मराठे. Show all posts
Showing posts with label L-संजीवनी मराठे. Show all posts

सकल मिळुनि हसुनि SAKAL MILUNI HASUNI

सकल मिळुनि हसुनि खुलुनि गोफ गुंफु या ग
पदर पदर स्वकरि धरुनि नाच नाचु या ग

नाचताति पवनी फुले, डुलति सुमपराग खुळे
चपलचरणि त्यास खुडुनि आजि वेचु या ग

वर्ष-वर्षतात मेघ, जलधारा झरति सुभग
लपत छपत स्वकरि अमित, त्यासि वेचु या ग

मधुर गान गाउनिया प्रेमरंगि रंगुनिया
गोफ विणुनि सुजन-चरणि आजि वाहु या ग

Lyrics -संजीवनी मराठे SANJIVANI MARATHE
Music -श्रीनिवास खळे SHRINIWAS KHALE
Singer -सुमन कल्याणपूर SUMAN KALYANPURKAR

हसतिल मजला कबीर मीरा,Hasateel Majala Kabir Meera

हसतिल मजला कबीर मीरा
हसतिल तुलसीदास
हरि तुझा लागे छंद मनास !

कुठे मनीचा क्षुद्र काम तो, कोठे अमृत-आस ?
कुठे सरोवर, कोठे सागर, तुलना करू कशास ?

नक्षत्रांकित चंद्र कुठे तो, कुठे सानुली काच ?
कुठे स्वर्गिचा कल्पतरू अन्‌ कोठे मरवा-पाच ?

कबीर गाई, गाते मीरा, गाती तुलसीदास,
गीत भाबडे गाउ कुणा मी ? प्रभु घे तुझे तुलाच !

सोनियाचा पाळणा रेशमाचा,Soniyacha Palana

सोनियाचा पाळणा, रेशमाचा दोर ग
मधोमध विसावला माझा चित्तचोर ग

नीज नाहि डोळा, कसा टकमक बघतो
बाळमुठी वरखाली नाचवीत राहतो
याच्या चांदण्यांत माझे लोचन चकोर ग

याच्या दर्शनाने येई सुखाला फुलोरा
याच्या स्पर्शाने लाभे आशेला निवारा
याच्या प्रेमसूत्रे नाचे माझा मनमोर ग

कुणी गुणगुणा गाणे, कुणी हालवा हिंदोळ
झोपु द्या ग राजसाला, हीच विसाव्याची वेळ
शिरी कृपादृष्टी याच्या धरा सानथोर ग

सत्यात नाहि आले,Satyat Nahi Aale

सत्यात नाहि आले, स्वप्नात येउ का ?

विसरायचे तरीही स्मरणात साठलेले
ते रूप प्रेमवेडे पाहून जाउ का ?

हृदयात रंगलेले, लाजेत गुंतलेले
ओठांवरी उभे ते गाऊन जाउ का ?

हसता नभात तारा, हसता फुलात वारा
प्राणात हासते ते उधळून जाऊ का ?

तूझी म्हणून घ्यावे, स्वप्नीच हे घडावे
ही आस सानुलीशी पुरवून घेउ का ?

या गडे हासू या,Ya Gade Hasu Ya

या गडे हासू या, या गडे नाचू या
गाऊ या मंगल गान !

खेळू या फुगडी धरुनिया फेर
रचू या आरास चौरंगी चौफेर
देऊ या, घेऊ या, प्रेमाचा आहेर, मिळून थोर-लहान !

आपुली धरती, आपुले आकाश
आपुला सागर, आपुला प्रकाश
सुनील नभांत, गुंजते रंगात, खगांचि स्वच्छंद तान !

वादळाचे वारे घोंघावे जगात
शांतिचे चांदणे माझ्या माहेरात
मावेना आनंद, दृष्टीत, देहात, वाटते हरपे भान !

जीवाच्या जिवलगा नंदलाला,Jeevachya Jivalaga

जीवाच्या जिवलगा नंदलाला रे

यमुनेत तुझ्या-माझ्या बिंब मुखांचे
बासरीत तुझ्या-माझ्या गीत सुखाचे

स्मरणाने जीव माझा धुंद झाला रे

चांदण्यांची नित्य नवी रासलीला रे
पाखरांच्या गळा नवी गीतमाला रे

कमळदळांत नवा गंध आला रे

माझ्या कानी ओळखीचा साद आला रे
प्रभू तुझ्या पावलांचा नाद झाला रे

धावले मी तुझ्या पदवंदनाला रे

आळविते मी तुला विठ्ठला,Aalavite Mi Tula Vitthala

आळविते मी तुला विठ्ठला
देहमनाला व्यापुन उरला तव चरणांचा लळा

रोज पहाटे नयनापुढती
तुझी प्रगटते श्यामल मूर्ती
मनभावांच्या निर्मळ ज्योती घेते आरतीला

उपासनेची उटी लाविते
शुभनामांची माळ गुंफिते

निर्मोहाचा रेखुन देते तिलक तुझ्या भाळा

प्रेमघना रे कधि तू येशिल
ममजीवनवन फुलवुन जाशिल
रात्रंदिन मी हा मधुमंगल ध्यास मनी धरिला

आला स्वप्नांचा मधुमास, Aala Swapnacha Madhumas

आला स्वप्नांचा मधुमास
उमलवीत उरिचा उल्हास

निद्रेच्या भूमीवर फुलल्या
स्वप्न-सुमांच्या कळ्या कोवळ्या
मूक मनीषा अंतरातल्या उधळति स्वैर सुवास

ही नटवी प्रीतिची कलिका
घडिघडि दावी अनंतरूपा
धुंद करी अर्पुनि मनमधुपा अद्‍भुत प्रणयविलास

टवटवली मृदु शैशवसुमने
लेवुनि ते मधुमंगल लेणे
अनिर्बंध मन गुंगत गाणे, भोगी छंद-सुखास

जागृतीत जे जे वांछियले
ते ते या स्वर्भूमधि रुजले
रसरंगे अंतर्जग नटले नाचत जीवनरस