Showing posts with label . Show all posts
Showing posts with label . Show all posts

ब्रिजलाला गडे पुरवी,Brijala Gade Puravi

ब्रिजलाला गडे पुरवी हृदयिंची आस ॥

वाजिव श्रीहरी । मंजुळ बासरी ।
पाजिव शांति सुधा जीवास ॥

ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर,Bramha Vishnu Aani

ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले
मला हे दत्तगुरू दिसले

माय उभी ही गाय हो‍उनी, पुढे वासरू पाहे वळुनी
कृतज्ञतेचे श्वान बिचारे पायावर झुकले

चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे
घुमटामधुनी हृदयपाखरू स्वानंदे फिरले

तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ झाली माझी काया
तुमच्या हाती माझ्या भवती औदुंबर वसले



बिंबाधरा मधुरा,Bimbadhara Madhura

बिंबाधरा, मधुरा विनयादिगुणीं मनोहरा मधुरा ॥

ती सुंदरा । विगुणा वरा ।
घटिता विधि पी काय सुरा ॥

बांधले मी बांधले इंद्राचे तोरण,Bandhale Mi Bandhalle

बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले
शिंपण घातले चाफ्याचे शिंपण घातले

उन्हाचे पाटव नेसले टाकले
वाऱ्याचे पैंजण घातले फेकले
डोळ्यांत काजळ, केवडा, अत्तर
लावले, पुसले

हर्षाचे हिंदोळे सोडले बांधले
मयूर मनाचे रुसले हासले
हिंदोळे हर्षाचे मयूर मनाचे
हासले, नाचले

दिसला लपला चकोर मनाचा
फुलला ढळला बहर चंद्राचा
लामण सूर्याचा श्रावण नेत्राचा
विझले, तेवले

बंधन,Bandhan

नात्यांना ठाउक असते हे चालत जाणे रस्ते
वळणावर येता थांबून मग हळूच वळणे नुसते

घरट्याशी येता सारी वळणे ही जाती संपून
मातीशी जुळते नाते वर आकाशाचे बंधन

बंदिनी स्त्री ही बंदिनी,Bandini Stri Hi Bandini

बंदिनी स्त्री ही बंदिनी
हृदयी पान्हा नयनी पाणी
जन्मोजन्मीची कहाणी

रूप बहिणीचे माया देई
वात्सल्य मूर्त आई होई
माहेरा सोडून येई
सासरी सर्वस्व देई

कधी सीता कधी होई कुंती
सावित्रीची दिव्य शक्ति
शकुंतला तूच होसी
मीरा ही प्रीत दिवाणी

युगेयुगे भावनांचे धागे
जपावया मन तुझे जागे
बंधने ही रेशमाची
सांभाळी स्त्रीच मानिनी

बंद ओठांनी निघाला,Band Othani Nighala

बंद ओठांनी निघाला पेटलेला एकला
दाटलेल्या अंतरिचा सूर झाला मोकळा

का दुभंगु का नये हा क्षितिज पडदा एकदा
फक्त कानी येत त्याच्या येथ दिडदा सर्वदा
कोण होता देही आता आठवे ना त्याजला
दाटलेल्या अंतरिचा सूर झाला मोकळा

लोळ आला अन्‌ विजेचा रान सारे पेटले
भूत जन्मापूर्वीचे त्या तेथ त्याला भेटले
वादळापूर्वीच झाला तो निनावी एकला
दाटलेल्या अंतरिचा सूर झाला मोकळा

बोले स्वर बासरिचा,Bole Swar Basaricha

बोले स्वर बासरिचा
राधेला छंद तुझा

तरु-वेली-फुलांतुनी
गोकुळ हसऱ्या नयनी
यमुनातटि कुंजवनी
उधळी गंध मनीचा

कुणिहि किती हसु दे तिज
खंत न त्याचा कसला
भरदिवसा घेउन हरि
शिंपि सडा प्रीतीचा

राधेची कृष्णावर
ओढ कुणा न कळली
प्रभुचरणी गौळण ही
गुंफि भाव अंतरिचा

बोलून प्रेमबोल तू लाविलास,Bolun Prembol Tu Lavilas

बोलून प्रेमबोल, तू लाविलास छंद
लावून छंद वेडा, केलेस विश्व धुंद

धुंदित त्या क्षणांच्या युग एक हे बुडाले
घरटे करोनि चिमणे मन-पाखरू उडाले
वाऱ्यावरी वरात, पथ हा तया अरुंद

प्रीतीत रंगलेली विरली उषा प्रभाती
छंदात हरवल्या त्या मधुपुनव-चांदराती
निशिगंध मात्र देई मन-भाबडा सुगंध

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल,Bolava Vitthal Pahava Vitthal

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।
करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥

येणें सोसें मन जालें हांवभरी ।
परती माघारीं घेत नाहीं ॥२॥

बंधनापासूनि उकलल्या गांठी ।
देतां आली मिठी सावकाशें ॥३॥

तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें ।
कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥



बोला अमृत बोला,Bola Amrut Bola

बोला । अमृत बोला ।
शुभसमयाला, गोड गोड ॥

दिपले पाहुनिया । देवही हर्ष भरे ।
ढाळुनीया सुमने वदती, धन्य धन्य धन्य ॥



बोलले इतुके मज श्रीराम,Bolale Ituke Maj Shri Ram

शेवटीं करितां नम्र प्रणाम
बोलले इतुके मज श्रीराम-

"अयोध्येस तूं परत सुमंता,
कुशल आमुचें कथुनी तांतां
पदवंदन करि माझ्याकरिंता
तातचरण ते वंदनीय रे, शततीर्थांचें धाम

"अंतःपुरिं त्या दोघी माता
अतीव दुःखी असतिल सूता,
धीर देई त्या धरुन शांतता
सौख्य आमुचे सांगुन त्यांच्या शोका देई विराम

"सांग माउली कौसल्येसी
सुखांत सीता सुत वनवासी
पूजित जा तूं नित्य अग्निशीं
तुझिया श्रवणीं सदा असावा मुनिवर्घोषित साम

"वडिलपणाची जाणिव सोडुनि
सवतींशीं करि वर्तन जननी
मग्न पतीच्या रहा पूजनीं
तव हृदयाविन त्या जीवासी अन्य नसे विश्राम

"राजधर्म तूं आठव आई
अभिषिक्तातें गुण वय नाहीं
दे भरतासी मान प्रत्यहीं
पढव सुमंता, विनयाने हें, सांगुन माझे नाम

"सांग जाउनी कुमार भरता
हो युवराजा, स्वीकार सत्ता
प्रजाजनांवर ठेवी ममता
भोग सुखाचा अखंड घेई, मनिं राही निष्काम

"छत्र शिरावर तुझ्या पित्याचें
पाळच वत्सा, वचन तयांचें
सार्थक कर त्या वृद्धपणाचें
राज्य नीतिनें करुन वाढवी रघुवंशाचें नाम

"काय सांगणे तुज धीमंता,
उदारधी तूं सर्व जाणता
पुत्रवियोगिनि माझी माता
तुझ्या वर्तनें तिला भासवी भरत तोच श्रीराम"

बोलत बोलत ते गहिंवरले
कमलनयनिं त्या आसूं भरलें
करुण दृश्य तें अजुन न सरले -
गंगातीरीं-सौमित्रीसह-उभे जानकी-राम

बोलत नाही वीणा,Bolat Nahi Veena

बोलत नाही वीणा
दुर्दैवाने मुकी जाहली, अमृतवाही रसना

कुठले वादन तुटता तारा, कुठले सुस्वर काना
कुठले कूजन सोडून जाता, कोकीळ हिरव्या राना

काष्ठाच्या कायेत अचेतन, सूर ओतिती प्राणा
त्या प्राणांचे सूर शोषणे, व्यसन लागले मरणा

तारा जुळता, स्वरांत मिळता, दुःखासही ये करुणा
जीवाला संगीत पोचवी, चिरंतनाच्या चरणा

बोल हांसरे बोल प्यारे,Bol Hasare Bol Pyare

बोल हांसरे । बोल प्यारे
बुलबुला । हा विषाद का रे ?

भावना भंगून जाता
जीव मेला ह्या जगाला
मोह-माया-पाश आतां
तोडिले भवबंध सारे

दैव दुष्ट सदैव छळतां
आज होत अखेर ही

चालले टाकून तुजला
राजसा, निरोप दे रे

बोल होईल फोल अनुभवानें,Bol Hoil Phol Anubhavane

बोल होईल फोल, अनुभवानें ॥

यदु गेला अजि निज द्वारकेला,
करि बंधु सिंधु विलोल ॥

बोल बोलना साजणा,Bol Bolna Sajana

बोल बोलना साजणा, का अबोला ?

सूरपंचम हा विळखा घाली
ओढी तुजला हृदया जवळी
जिवलगा रंग भरेना
बोल बोलना, जिवलगा रंग भरेना

मोहक सुंदर यौवनाचे
फूल पहिले चंपकाचे
का फुलेना, हसेना
बोल बोलना, का फुलेना हसेना ?

बोल ग मैने बोल,Bol Ga Maine Bol

बोल ग मैने बोल
फांदी फांदी आज लहडली, वासंतीक हिंदोल !

तुझा लाडका राजस रावा
तुज सौख्याच्या आणी गावा
हिरव्या पानी नवखे घरकूल हलके घेई डोल

नयन तेच पण नवीन दृष्टी
पंख तेच पण नवीन सृष्टी
तोच गळा पण आज नव्याने साद आपुला खोल !

छेड स्वरांचा मंजूळ पावा
भार सुखाने नवखा रावा
आज प्रीतिसंगे साजणी दुनिया अवघी तोल !

बोल कन्हैय्या का रुसला,Bol Kanhaiyya Ka Rusala

बोल कन्हैय्या, का रुसला, राधेवरी ?

तू अनुरागा भारी चंचल
जैसे वाहे यमुनेचे जल
का रे धरिसी लटक्या रागा ?

तुझ्यामुळे बदनामी झाली
नेत्र-पापण्या झुकल्या खाली
सोडी ना रे अपुला त्रागा ?



बैल तुझे हरणावाणी,Bail Tujhe Haranavani

बैल तुझे हरणावाणी गाडीवान दादा
तरूण माणसाच्या मनीचा जाण तू इरादा

वाट नागमोडी वेडी, तुझी फुलोऱ्याची जोडी
ऊन सावल्यांचा झाला आगळा कशिदा

समोरून येतो वारा, शिनभाग जातो सारा
दिठीपुढे येतो जातो गाव तो दहादा

गाव साजनीचा दूर, शहारून येता उर
सूर तिच्या लावण्याचे घालतात सादा

परत साद देण्यासाठी, शीळ येऊ पाहे ओठी
पलीकडे खेड्यामाजी, वसे एक राधा

स्वप्न भारल्या एकांति, तिचा हात यावा हाती
जनी भेटवी रे मित्रा, राधिका मुकुंदा



बेधुंद या आसमंतात,Bedhund Ya Aasamantat

बेधुंद या आसमंतात झाले बेधुंद सारे तराणे
सजणा तुझ्यासवे !
ही रात प्रीत मोहरून गीत ये नवे,
गीत ये नवे !

बेहोश वारा असा हा, गंधीत झाल्या दिशा
किती आठवणी मनी साठवूनी, आली शृंगारवेडी नीशा
या अंबरात तेज न्हात तेवती दिवे
तेवती दिवे !

लाटांवरी चांदण्याचा दाटून आला थवा
झुले पाण्यावरी फुलवेडी परी
प्रीतरंगात ही रंगलेली
पानांत वाट शोधितात धुंद काजवे
धुंद काजवे !