Showing posts with label L-वंदना विटणकर. Show all posts
Showing posts with label L-वंदना विटणकर. Show all posts

स्वातंत्र्याची घुमे तुतारी,Swatantryachi Ghume Tutari

स्वातंत्र्याची घुमे तुतारी दुमदुमली धरती
हे शिवशंकर मुक्ती दायिनी जय जय जनशक्ती

कणकणातून जागृत झाला मंत्र तुझा बलशाली
सळसळणाऱ्या रक्तामधुनी फुलल्या लाख मशाली
दिशादिशातून तुझ्या यशाच्या लखलखती ज्योती

मुठी-मुठीतून तूच घडविली परक्रमाची गाथा
एकजुटीने भंगलास तू अन्यायाचा ताठा
मांडिलेस तू अपूर्व तांडव इथल्या जनतेसाठी

तव तेजाने उजळून उठली इतिहासाची पाने
कालचक्र हे अखंड गाईल तुझ्या किर्तीचे गाणे
पिढ्या-पिढ्यांना स्फूर्ती देईल धगधगती क्रांती

सांवरे श्याम श्रीहरी,Saware Shyam Shrihari

सांवरे श्याम श्रीहरी
मी झाले तुजविण बावरी

मंतरलेले सूर ऐकुनी भान मला नुरले
बंध जगाचे तोडुनि सारे धावत मी आले
ही छळते वैरिण बासरी

रतिरंगाची नवथर बाधा रे जडली मजला
धुंद नशेचा मोरपिसारा तनूमनी फुलला
मी विरले सुखसागरी

सजणा कशासी अबोला,Sajana Kashasi Abola

सजणा, कशासी अबोला ?
घडला, असा रे माझा काय गुन्हा ?

छळितो मजसी हा दुरावा
ध्यास तुझा जुलमी !
मोहरली वसुधा तरी का
सावन हा विरही ?
नवरंगी पुकारि माझि साद तुला
नवरंगी पुकारी साद तुला !

भास तुझा फुलवी सुखाचा
पारिजात हृदयी
आस मनी झुरते अनोखी
व्याकुळल्या समयी
रतिरंगि बुडालि अशि चंद्रकला
रतिरंगि बुडाली चंद्रकला !

शोधिसी मानवा राऊळी,Shodhisi Manava Rauli

शोधिसी मानवा, राऊळी मंदिरी
नांदतो देव हा, आपुल्या अंतरी

मेघ हे दाटती, कोठुनी अंबरी ?
सूर येती कसे, वाजते बासरी ?
रोमरोमी फुले, तीर्थ हे भूवरी
दूर इंद्रायणी, दूर ती पंढरी

गंध का हासतो, पाकळी सारुनी ?
वाहते निर्झरी, प्रेमसंजीवनी
भोवताली तुला, साद घाली कुणी
खूण घे जाणुनी, रूप हे ईश्वरी

भेटतो देव का, पूजनी अर्चनी ?
पुण्य का लाभते, दानधर्मातुनी ?
शोध रे दिव्यता, आपुल्या जीवनी
आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी ?

विरले गीत कसे,Virale Geet Kase

विरले गीत कसे ? झाली मनाची शकले
मी दिशाहीन अता, सारे सहारे मिटले !

गाइले गीत कधी, फुलवीत बसंती नाते
विझले सूर अता, नयनात खुळी आस जळे !

गहिरी याद तुझी, मोहरते खोल मनी
विसरू हाय कसे, ते इशारे सगळे !

नव्हता दोष तुझा, शापियले मीच मला
लोपल्या दाहि दिशा, दूर किनारे लपले !

राणी तुझ्या नजरेने,Rani Tujhya Najarene

राणी तुझ्या नजरेने नजरबंदी केली ग
ती जादू मनी प्रीतीला फुलवून गेली ग !

हसले तुझ्या नयनात कसे धुंद चांदणे
मदनाने ही किमया तुला दान केली ग !

झुरतात नभी तारका मुखचंद्र पाहुनी
रूपात तुझिया चंचल झलक रंगलेली ग !

खोट्या रुसव्यात तुझ्या, होकार खुषीचा नटला
माझ्यावरी इष्काने मेहेरबानी केली ग !

रसिका मी कैसे गाऊ,Rasika Mi Kaise Gau

रसिका, मी कैसे गाऊ गीत ?
दाटून आले घन आसवांचे
मिटलेल्या पापणीत

तुटल्या मनाच्या हळुवार तारा
गेला सुरांचा जळुनी फुलोरा
नाचे प्रलय लयीत !

मैफल सुखाची झाली विराणी
उरे वेदनांची जखमी कहाणी
रडते स्वप्न व्यथीत !

कशाला स्वरांची आरास आता
विझली अभागी अंगारगाथा
झाला जन्म पतीत !



ये रे ये रे पावसा रुसलास,Ye Re Ye Re Pavasa

ये रे ये रे पावसा, रुसलास का ?
माझ्याशी गट्टी फू केलिस का ?

झर झर झर तू येणार कधी ?
अंगणात पाण्याची होईल नदी
ढगांच्या मागे असा लपलास का ?

गार गार वाऱ्यांत नाचेन मी
खूप खूप पाण्यात भिजेन मी
विजेचि टाळि मला देतोस का ?

धड धड धुडुम कानात बसले दडे
काळ्या काळ्या मेघांचे डोंगरकडे
टप टप पडतील थेंबांचे सडे
पाणि, पाणि पाणीच मग सगळीकडे !

धुमधार पाण्यात रस्ता बुडेल
मग माझ्या शाळेला सुट्टी मिळेल
गड गड गड आता हसतोस का ?

ये ना सजली स्वप्ने नयनी,Ye Na Sajali Swapne Nayani

ये ना, सजली स्वप्ने नयनी !
येना ये ना, ये ना, ये ना

हसती लहरी चंद्र बघुनी
उमले कलिका भ्रमरा भुलुनी
झुरते मिलना हळवी रजनी
ये ना सजली स्वप्ने नयनी !

मेघामधुनी खुणवी बिजली
नवख्या हृदयी धुंदी भरली
घे ना जवळी अपुली म्हणुनी
ये ना सजली स्वप्ने नयनी !

कितिदा विनवू तुजला अजुनी?
जळते अधिरा विरही हरिणी
क रे छळिसी सारे कळुनी ?
ये ना सजली स्वप्ने नयनी !

मोहरले मस्त गगन,Moharale Mast Gagan

मोहरले मस्त गगन
सळसळतो धुंद पवन
प्रीतीचे गाइ कवन
भिरभिरते बावरी, देहाची भिंगरी !

मंथर अनोखे हे पुकारे
भोवताली दाटले
छंदी अनंगाचे इषारे
रोमरोमी नाचले
नजरेची कस्तुरी दरवळली अंतरी
थरथरली शर्वरी रे साजणा !

चंचल नशेचे हे उखाणे
लोचनांनी छेडिले
फंदी तरंगांचे पिसारे
अंतरंगी रंगले
श्वासांची मोहिनी लखलखली अंबरी
धुंदी ही वादळी रे साजणा !

भंगलेल्या त्या स्मृतींना,Bhangalelya Tya Smrutina

भंगलेल्या त्या स्मृतींना आळवीतो मी पुन्हा
हाच का माझा गुन्हा?

भाववेडी रम्य प्रीती स्वप्न अपुले ते बसंती
संपले सारे तरी मी आठवीतो त्या खुणा

रंग विरला भावनांचा बहर सरला जीवनाचा
घोळवीतो तीच गाथा गिळुनि साऱ्या वेदना

दु:ख माझे हे गुलाबी त्यातली धुंदी शराबी
शोधितो त्यातून विरल्या प्रीतिच्या संवेदना

भावविकल ओठांवर,BhavVikal Othavar

भावविकल ओठांवर शब्द मूक झाले
आर्त धुंद गीतांतिल सूर सूर संपले !

नवरंगी चित्र एक मोहरले लोचनात
आली बहरून रम्य प्रीतीची चांदरात
त्या फुलल्या पुनवेचे बिंब कुठे लोपले?

श्वासांनी रेखियली स्वप्नबावरी कथा
गंधाने थरथरली मुग्ध लाजरी लता
त्या गंधित बहराचे विश्व आज भंगले !

जळणाऱ्या हृदयाला समजावू सांग कसे?
मिटवू मी सांग सखे फुलले फूल कसे
अपुले ते गूज अता आसवांत साठले !

प्रीती तुझी मनमोहिनी,Priti Tujhi Manmohini

प्रीती तुझी मनमोहिनी
फुलवी मनी संजीवनी

पारिजात बहरुनी आला
धुंद तुझ्या स्पर्शामधुनी
प्रेमरंगी मोहरलेला
दीपराग नाचे नयनी
भारावल्या देहातुनी
झंकारली सौदामिनी

साद तुझी जादुभरी
फुले उरी बाधा कसली
लाट ही सुखाची माझ्या
जीवनात भरुनी उरली
तू राधिका की नंदिनी
हृदयातल्या या वृंदावनी

पिर पिर पिर पिर पावसाची,Pir Pir Pavasachi

पिर पिर पिर पिर पावसाची
त्रेधा-तिरपिट सगळ्यांची !

रस्त्यावर मोटारगाड्यांची
शर्यत लागली पोहायची
बाबांना ऑफिसची घाई फार
छत्रीला त्यांच्या लागली धार
फजिती झाली कपड्यांची !


ताईच्या साडीवर परीटघडी
चिखलाची सुंदर उठली खडी
दादाच्या रेनकोटचा भलताच थाट
पावसाने उसवली त्याची पाठ
भंबेरी उडली फॅशनची !

कुणितरी सांगा हो काही उपाय
गुरुजींचा चिखलात फसलाय पाय

शाळेला सुट्टी पडली उगाच
घरात बसायचा माझ्यामागे जाच
संधी हुकली भिजायची

परीकथेतिल राजकुमारा,Pari Kathetil Rajkumara

परीकथेतिल राजकुमारा
स्वप्नी माझ्या येशिल का ?
भाव दाटले मनी अनामिक
साद तयांना देशिल का ?

या डोळ्यांचे गूढ इषारे
शब्दांवाचुन जाणुन सारे
'राणी अपुली' मला म्हणोनी,
तुझियासंगे नेशिल का ?

मूर्त मनोरम मनी रेखिली
दिवसा रात्री नित्य देखिली
त्या रूपाची साक्ष जिवाला,
प्रत्यक्षातुन देशिल का ?

लाजुन डोळे लवविन खाली
नवख्या गाली येइल लाली
फुलापरी ही तनू कापरी
हृदयापाशी घेशील का ?

लाजबावरी मिटुन पापणी
साठवीन ते चित्र लोचनी
नवरंगी त्या चित्रामधले,
स्वप्नच माझे होशील का ?

नाते जुळले मनाशी,Nate Julale Manashi

नाते जुळले मनाशी मनाचे
फुले गीत ओठी, अनोख्या सुरांचे

कशी मूर्त केली खुळ्या लोचनांनी
तुझ्या अंतरीची अबोली कहाणी ?
ही अबोली कहाणी
कसे फूल झाले, दिवाण्या कळीचे ?

जुळे ही मिठी बावऱ्या लोचनांची
जशी भेट होते नदी-सागराची
नदी-सागराची
मनी नाचती हे, रंग अमृताचे

उरो ध्यास भवती नुरो भान काही
सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही
या दिशा धुंद दाही
क्षणी रूप दिसले, मला नंदनाचे

नयन तुजसाठी आतुरले,Nayan Tujsathi Aaturale

नयन तुजसाठी आतुरले
प्रेमदिवाणी झाले रे

तुझ्या प्रीतिच्या अमृतधारा
मनमोराचा फुले पिसारा
भानच हरपून गेले रे

जुळता नाते दोन मनांचे
बंध लोपले युगायुगांचे
मी नच माझी उरले रे

नको आरती की,Nako Aarati Ki

नको आरती की नको पुष्पमाला
प्रभू भोवताली असे व्यापलेला

खगांच्या मुखाने प्रभू गाइ गाणे
फुलांतून उधळी सुगंधी उखाणे
गगनांत फुलवी, नवरंग-लीला

सदासर्वकाळी दुज्यांसाठि झिजतो
पुण्यवान जगती खरा तोच जगतो
त्यागात मनुजा, उभा स्वर्ग भरला

प्रकाशात फुलतो अंधार काळा
उन्हापाठि पळतो कसा पावसाळा
बुडे प्रेमरंगी, कळे खेळ त्याला

ते स्वप्न भाववेडे,Te Swapna Bhav Vede

ते स्वप्न भाववेडे नयनी समूर्त होते
फुलते मनात माझ्या अपुले अबोल नाते

ती भेट पापण्यांची धुंदावल्या क्षणांची
कायाच जाहली रे जणु बासरी विजेची
त्या मूक गुंजनाच्या धुंदीत मी नाहते

माझ्याहुनी सखे ग झाली अधीर वाणी
शब्दास रूप येता ती लाजली कहाणी
परि ओढ अंतरीची खुलुनी असीम होते

जाणीव मीपणाची ध्यासामधे बुडाली
भासाविना नसे रे काहीच भोवताली
मग बावऱ्या स्मृतीला स्वप्नात जाग येते

पाऊल प्रीतिचे हे चाहूल मन्मथाची
काहूर गोड वाटे, ही खूण या पथाची
दाही दिशांत आता घुमती अनंग-गीते

तुझे रूप सखे गुलजार,Tujhe Roop Sakhe Guljar

तुझे रूप सखे गुलजार असे
काहूर मनी उठले भलते
दिनरात तुझा ग ध्यास जडे
हा छंद जिवाला लावि पिसे !

ती वीज तुझ्या नजरेमधली
गाली खुलते रंगेल खळी
ओठांत रसेली जादुगिरी
उरि हसति गुलाबी गेंद कसे !

नखऱ्यांत तुझ्या ग मदनपरी
ही धून शराबी दर्दभरी
हा झोक तुझा घायाळ करी
कैफात बुडाले भान असे !

ती धुंद मिठी, बेबंद नशा
श्वासांत सखे विरतात दिशा
बेहोश सुखाच्या या गगनी
मी आज मला हरवून बसे !