Showing posts with label L-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. Show all posts
Showing posts with label L-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. Show all posts

या भारतात बंधुभाव नित्य,Ya Bharatat Bandhu Bhav

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे

नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी
मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी
स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे
दे वरचि असा दे

सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना
हो सर्व स्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना
उद्योगी तरुण शीलवान येथ असू दे
दे वरचि असा दे

जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही
अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी
खलनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे
दे वरचि असा दे

सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीयापरी
ही नष्ट हो‍उ दे विपत्ती भीती बावरी
तुकड्यास सदा या सेवेमाजी वसू दे
दे वरचि असा दे

या झोपडीत माझ्या,Ya Zopadit Majhya

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भिती न यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥

महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥

पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥

’तुकड्या’ मती करावी, पायी तुझ्या नमावी
मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या ॥७॥

मनी नाही भाव म्हणे,Mani Nahi Bhav Mhane

मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव
देव अशानं भेटायचा नाही रे
देव बाजारचा भाजीपाला नाही रे

दगडाचा देव त्याला वडराचं भेव
लाकडाचा देव त्याला अग्निचं भेव
मातीचा देव त्याला पाण्याचं भेव
सोन्याचांदीचा देव त्याला चोरांचं भेव
देव बाजारचा भाजीपाला नाही रे

देवाचं देवत्व नाही दगडात
देवाचं देवत्व नाही लाकडात
सोन्याचांदीत नाही देवाची मात
देव बाजारचा भाजीपाला नाही रे

भाव तिथं देव ही संतांची वाणी
आचारावाचून पाहिला का कोणी
शब्दाच्या बोलांनं शांती नाही मनी
देव बाजारचा भाजीपाला नाही रे

देवाचं देवत्व आहे ठाई ठाई
मी-तू मेल्याविण अनुभव नाही
तुकड्या दास म्हणे ऐका ही द्वाही
देव बाजारचा भाजीपाला नाही रे