Showing posts with label M-दशरथ पुजारी. Show all posts
Showing posts with label M-दशरथ पुजारी. Show all posts

चरणिं तुझिया मज देई CHARANI TUZIYA NAJ DEI

चरणिं तुझिया मज देई, वास हरी

चरणतळी तव कमल विराजे
तेच करी मज देवा, कल्पवरी
कुणा संतती, कुणा राज्य दे
मजला हरिचे देई रे, चरण परि

कुणा स्वर्ग दे, कुणा मुक्ति दे
मजला परि चरणाचा, दास करी
मी घाली ना संकट तुजवरि
केवळ मज चरणाचे, रजच करी

चिकटुनि राहिन सदा पदाला
इतुकी मम पुरवावी रे, आस परि
मिरवीन वैभव हे त्रैलोक्यी
येइल तरि नृपतीला, काय सरी ?

Lyrics -भा. रा. तांबे BHA. RA, TAMBE
Music -दशरथ पुजारी DASHARATH PUJARI
Singer -माणिक वर्मा MANIK VARMA

वाहणारया आसवांची WAHANARYA AASAWANCHI

वाहणारया  आसवांची,जीवनी बरसात आहे
वेदनेला अंत नाही,ही आशी सुरवात आहे 

का मला जगता ना आले,शांत हे आयुष्य साधे 
दूर ते आयुष्य गेले,राहिलो पन मीच मागे 
सोडुनिया हाथ माझा,दिवस हे सरतात आहे 

आगळे अन वेगळे हे,गाव जेथे मी राहतो 
भेटतो जो या इथे तो,घेऊनी जखमाच जातो 
हे जीने जगने जणू,जाहले अपघात आहे  

जायचे होते कुठे,मी चाललो आहे कुठे 
ओळखीचा मीच मजला,राहिलो नाही इथे  
यात माझा आरशाचा,कोणता अपराध आहे  

Lyrics -सौमित्र
Music -दशरथ पुजारी
Singer -अरुण दाते
Movie / Natak / Album -

हा उनाड अवखळ वारा,Ha Unad Avakhal Vara

हा उनाड अवखळ वारा, या टपोर श्रावणधारा
फुलवून पिसारा सारा तू नाच आज रे मोरा

हे कुंतल-काळे मेघ डोळ्यांत नाचते वीज
अंगावर फुलुनी आली ही यौवनातली लाज
चालीतुन माझ्या भरला हरिणीचा नाजूक नखरा

हातावरी माझ्या रंगे कोवळ्या कळ्यांची मेंदी
सुमगंध सोडुनी भुंगे लागलेत माझ्या नादी
बांधिते अशी पदराशी गंधीत फुलांच्या नजरा

बहराच्या हिर्व्या रानी परदेशी आला रावा
भुलवून जीवाला बाई तो नेई दूरच्या गावा
मधुबोल तयाचे रुजवी अंगावरि गोड शहारा

सावळ्या विठ्ठला तुझ्या,Saavalya Vitthala Tujhya

सावळ्या विठ्ठला, तुझ्या दारी आले
विसरूनी गेले, देहभान

गोजिरे हे रूप, पाहुनिया डोळा
दाटला उमाळा, अंतरि माझ्या
तुकयाचा भाव, पाहुनी निःसंग
तारिले अभंग, तूच देवा

जगी कितीकांना, तारिलेस देवा
स्वीकारी ही सेवा, आता माझी
कृपाकटाक्षाचे, पाजवी अमृत
ठेव शिरी हात, पांडुरंगा

विटेवरच्या विठ्ठलाची,Vitevarachya Vitthalachi

लाखात लाभले भाग्य तुला ग बाई
विटेवरच्या विठ्ठलाची झालिस रखुमाई

मेघासम जो हसरा श्यामल
चंद्राहुनि तो अधिकहि शीतल
नाम जयाचे मुखात येता
रूप दिसे ठायी ठायी

भक्तांचा जो असे आसरा
ह्या विश्वाचा हरी मोहरा
क्षणात इकडे क्षणात तिकडे
हाकेला ग धाव घेई

वाऱ्यावरती घेत लकेरी,Varyavarati Ghet Lakeri

वाऱ्यावरती घेत लकेरी, गात चालल्या जल-लहरी !

चहू दिशांना प्रेमरसांकित
लकेर घुमवि सुरेल संगित
अन्‌ संध्येच्या गाली नकळत स्वप्न रंगवी निलांबरी !

ताल धरोनी हरित तृणाचे
मोहक पाते मुरडत नाचे
फूल हो‍उनी कुंदकळीचे, गंध उधळिते मोदभरी

भेदभाव हे विसरुन सगळे
आनंदाने गायिलले
सप्त स्वरांचे गीत रंगले सात वेगळ्या सरोवरी

रंगरेखा घेउनी मी,Rangrekha Gheuni Mi

रंगरेखा घेउनी मी भावरेखा रेखिते
सावळे ते रूप नाथा, लोचनी मी पाहते !

श्यामकांती पाहता ती, आसवे ती दाटती
उर्मिलेच्या भावऊर्मी, अंतरी हेलावती
अंतरीची आर्तता ती, आज गीते छेडिते !

आपुल्या हो संगती ते, राम आणि जानकी
प्रीतीने विरही परंतु, एकटी मी मंचकी
आसवांची मालिका मी, श्यामकंठी घालते !

आपुल्या मी दर्शनाला, आज झाले पारखी
भेट होता आपुली ती, जन्म होई सार्थकी
एक आशा मीलनाची, लोचनी या जागते !

रंग तुझा सावळा दे मला,Rang Tujha Savala De Mala

रंग तुझा सावळा
दे मला, गोविंदा घननिळा

तुझ्या रूपाचे नयनी काजळ
सूर मुरलीचे कानी कुंडल
मुग्ध मनाची करुनी ओंजळ करिते अर्पण तुला

तरूतळी या कुंजवनातुन
तू गोरा मी काळी हो‌उन
गोपी कृष्ण हा गोफ गुंफुन करु दे नर्तन मला

तुझिया चरणी क्षणि एकांती
धुंद जळी या यमुनाकाठी
माझी भक्ती हो‌उन मुक्ती करु दे मधुकर ताला

रे क्षणाच्या संगतीने,Re Kshanachya Sangatine

रे क्षणाच्या संगतीने मी अशी भारावले
वेड वेडे घेउनी मी मागुती तव धावले

ध्यास लागे सारखा आभास होती या जिवा
अंतरी तुजला स्मरावे छंद लागे हा नवा
या जगाच्या निंदकांचे मी हलाहल प्राशिले

संपदा लाभो करी वा दैन्य कोरांटीपरी
तृप्त मी होईन नाथा दो करांच्या कोटरी
आवरीता आवरेना झिंगलेली पाउले

ना भिती जन-नीतिची मज, तू उभा मागेपुढे
रे नको मज स्वर्ग जेथे लाभ देवाचा घडे
तारि आता तूच, माझ्या देहि भिनली वादळे

या लाडक्या मुलांनो,Ya Ladakya Mulano

या लाडक्या मुलांनो तुम्ही मला अधार
नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार

आईस देव माना, वंदा गुरूजनांना
जगि भावनेहुनी ते कर्तव्य थोर जाणा
गंगेपरी पवित्र ठेवा मनी विचार

शिवबापरी जगात दिलदार शूर व्हावे
टिळकांपरी सदैव ध्येयास त्या पुजावे
जे चांगले जगी या त्यांचा करा स्विकार

शाळेत रोज जाता, ते ज्ञानबिंदू मिळवा
हृदयात आपुल्या त्या देशाभिमान ठेवा
कुलशील छान राखा ठेवू नका विकार

या मीरेचे भाग्य उजळले,Ya Meereche Bhagya Ujalale

या मीरेचे भाग्य उजळले
गिरिधर माझ्या स्वप्नी आले

आळवीत मी होते भजनी
देखियले नव्हते नयनांनी
आज मला ते सौख्य लाभले

व्यथा मनाची आता सरली
जननिंदेची भीती नुरली
भवसागर मी तरले तरले

मीरेसंगे नाचे मोहन
तालहि धरिती पायी पैंजण
रात संपली केव्हा नकळे

या झोपल्या जगात,Ya Zopalya Jagat

या झोपल्या जगात, नाही कुणीच जागे
बिलगूनिया धरेला आकाश गूज सांगे

माळून हार डोई रानातल्या फुलांचा
ल्याली वसुंधरा ही अभिसार चांदण्याचा
मधुवंतीचा सुवास वाऱ्यावरी तरंगे

स्वप्नील लोचनांत झुकता हळूच चांद
देहातुनी सुरेल घुमला मधूर नाद
निःशब्द रात्र जाई गुंफीत प्रीतिधागे

आली फुलून काया कंपीत गात्र झाले
बेबंद बरसणारे मन मेघ मेघ झाले
होती भल्या पहाटे ती एकरूप दोघे

मृदुल करांनी छेडित तारा,Mrudul Karani Chedit Tara

मृदुल करांनी छेडित तारा
स्मरते रूप हरीचे मीरा

कमलदलापरि मिटल्या अधरी
नाम मनोहर खुलता श्रीहरि
हर्षभराने तनुलतिकेवरि
पडती अमृतधारा

कालिंदीच्या नीलजलापरि
हृदयी वाहे भक्ती हसरी
तन्मयतेच्या कुंजवनी तिरी
खुलवी प्रीत-फुलोरा

सालस भोळी थोर मनाची
मीरा दासी प्रभुचरणाची
मिटल्या नयनी धुंद मनाची
रंगवि हसरी मथुरा

मंत्र वंदे मातरम्‌ हा,Mantra Vande Mataram Ha

या कळ्यांनो या फुलांनो या मुलांनो या जरा
मंत्र वंदे मातरम्‌ हा घोष गर्जा अंबरा !

आणिले स्वातंत्र्य आम्ही झुंजूनि शत्रूसवे
हाती तुमच्या देतसे ते शुभ नव्या भाग्यासवे
रक्षणे स्वातंत्र्य आता कार्य हे इतुके करा
मंत्र वंदे मातरम्‌ !

राहू द्या बंदूक तुमची सज्ज त्या शत्रूवरी
लक्ष असू द्या आईसम या थोर त्या शेतावरी
मातीतून त्या मोती पिकवा येउ द्या लक्ष्मी घरा
मंत्र वंदे मातरम्‌ !

शिवप्रभूचा लाभला हा आज तुम्हा वारसा
टिळक गांधी शास्त्री यांचा जीवनाचा आरसा
नेहरू अन्‌ इंदिराही सांगती या सागरा
मंत्र वंदे मातरम्‌ !

मुरलीधर घनश्याम सुलोचन,Muralidhar Ghan Shyam

मुरलीधर घनश्याम सुलोचन
मी मीरा तू माझे जीवन

तुझ्या मूर्तिविन या डोळ्यांना
कृष्ण सख्या रे काहि दिसेना
एकतारिच्या सुरात माझ्या
तुझेच अवघे भरले चिंतन

श्यामल तनुचा तव देव्हारा
जीव-ज्योतिला माझ्या थारा
चिंतनात मी रमते तुझिया
सोबत करतालांची किणकिण

विषासही तू अमृत केले
या वेडीला जीवन दिधले
हे उरलेले जीवित माझे
तुला मुकुंदा, करिते अर्पण



मी नयन स्वप्नवेडा,Mi Nayan Swapna Veda

मी नयन स्वप्नवेडा, तू धार आसवांची
तुज ओढ तापण्याची, हृदयास जाळण्याची !

मी भावगंध रेखा तुजला किती कथाव्या
ना बोलता कहाण्या तुजशी किती वदाव्या
नजरेत अक्षरांच्या पुष्पांजली वहाव्या
माधुर्य मागतो मी; तुज आस संपण्याची !

शब्दांतुनी तुझ्या गे नाकार सर्व गाजे
जगणेही भासते हे आता अयोग्य ओझे
वैराण भावनांचे आकाश आज माझे
पाऊलवाट तव ती शिशिरातल्या जिण्याची !

तव कोवळ्या मनाला का अर्थ ना कळावा ?
अजुनी तुला कसा ना स्वर आर्त आकळावा
मी छेडिता तराणा का सूर ही ढळावा ?
वीणेस ओढ लागे का आज भैरवीची ?



मनात नसता तुझ्या गडे,Manat Nasata Tujhya Gade

मनात नसता तुझ्या गडे
नकळत का मग असे घडे

डोळ्यांतल्या किलबिलल्या
निळसर मैना इवलाल्या
गालावरी सरसरली कमलदलांची पखरण ही
नजर लावता तुझ्याकडे

खट्याळ वारा पिसाळला
मादक दर्या उफाळला
देहावरी थयथयुनी मणीमोत्यांचे कणकणही
दिव्य साज हा कसा चढे

विजय मिळवुनी तुझ्यावर
पदर चालला वाऱ्यावर
लज्जाभये फिरुनी सये, आवरसी मन अवखळ हे
मनात नसता प्रीत जडे

भाग्य उजळले तुझे,Bhagya Ujalale Tujhe

भाग्य उजळले
तुझे चरण पाहिले

लागुनिया तुझे चरण
घर झाले हे पावन
इडापिडा जाति टळुन
हृदय विकसले

करुणेचा तू ठेवा
केली कशितरि सेवा
गोड करुनि परि देवा
सकळ घेतले

आता परि करिसि गमन
पुनः पुनः दे दर्शन
हेचि विनवि शिर नमवुन
हात जोडिले



बरस रे घना,Baras Re Ghana

बरस रे घना
तूच आज शमवी तृषीत माझिया मना

पवन अति दाहक हा
छळी मजला तूच पहा

रात्र रात्र लोचनात नीज येईना

चिंब चिंब भिजव मला
झुलवीत तारुण्य झुला
तुजवाचून जाणी कोण सर्व वेदना

प्रीत ही डोळ्यांत माझ्या,Preet Hi Dolyat Majhya

प्रीत ही डोळ्यांत माझ्या गीत ते ओठांवरी
मी तुझ्या हृदयात आहे तू असावे अंतरी

भावना दाटून आल्या दाटुनी संवेदना
कल्पनांनी जाणुनी घे अंतरीच्या या खुणा
काय बोलावे सुचेना मूक झाली वैखरी

भरुनी आली का तुझी ती पावसाळी लोचने
का तुझ्या अश्रूत भिजले केशरी ते चांदणे
सोड वेडे हा अबोला वेल का तू लाजरी


मी फुलावे मी हसावे सांगते माझ्या मना
चंदनाच्या चांदण्यांनी गंध येतो जीवना
सप्तरंगी जीवनाचे गंध उधळू अंबरी