Showing posts with label चिमण्यांची शाळा (१९६२). Show all posts
Showing posts with label चिमण्यांची शाळा (१९६२). Show all posts

लाकडाच्या वखारीत,Lakadachya Vakharit

लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना
खरं म्हणा, खोटं म्हणा, तिथं येती रोगी नाना
माकडाचा थाट, डोक्यावर हॅट
पायात विजार, तोंडात सिगार !

एक आली काळी बाई, तिचं नाव कोकिळाताई
तिचा बिघडला गळा, बारीक बारीक येती कळा
माकड म्हणालं, "धीर धरा, जरा थोडा ’आ’ करा."
कोकिळेनं केलं ’आ’, माकड म्हणालं, "वा!"
एक काजवा चिमटीत घेऊन
माकडानं चोच घेतली पाहून
"काय ?", म्हणाली कोकिळा
माकड म्हणालं, "गंडमाळा.
टॉनसिल्स बाई ! टॉनसिल्स !
चार महिने गाऊ नका,
उन्हातान्हात जाऊ नका.
अंब्याचा मोहोर खाऊ नका,
थोडा तरी विसावा घ्या, आणि बारा कैऱ्या आणून द्या"
भंभेरी भंभेरी भम्‌ !

मग आले भीत भीत, पिंपळावरचे दिवाभीत
माकड म्हणाले, "होतय्‌ काय ?"
"पोटी भूक जागत नाही, रात्री झोप लागत नाही."
माकड म्हणाले, "डोळे उघडा, जीभ थोडकी बाहेर काढा."
घुबड म्हणाले, "काय कारण ?" माकड म्हणाले, "जाग्रण, जाग्रण"
"दिवसा उगीच जागू नका, पावसा-पाण्यात भिजू नका,
अंधारातून हिंडू नका, फार विचार करू नका,
उगीचच्या उगीच मरू नका, अंड्याचे कवच घेऊन या
आपले औषध घेऊन जा."
भंभेरी भंभेरी भम्‌ !

बोक्याला झाला खोकला आणि तो चुलीपुढं ओकला
मनुताई भ्याल्या, दवाखान्यात आल्या.
माकड म्हणालं, "या ताई, बसा अशा शेजारी.
बोकोबा की पिल्लू टिल्लू, कोण आहे आजारी ?"
मनू म्हणाली, "वैद्यबुवा, यांच्यासाठी दवा हवा !"
"काय झालं बोकोबाला ?" मनु म्हणाली, "खोकला"
माकड म्हणालं ताईंना,
"सांगा तुमच्या यजमानांना, दूध दही पिऊ नका.
उंदीरबिंदीर खाऊ नका, अडगळीत जाऊ नका.
गोळ्या देतो, बडगा छाप,
तासातासांनी दोन घ्या."
भंभेरी, भंभेरी, भम्‌ !

मग आला मखाणवाला
त्या रोग्याला डॉक्टर भ्याला !
रोग्याने घेतली काठी, हाणली त्याच्या पाठी,
रोगी मारता राहीना, माकडाला उठता येइना
शेपटी बसली अडकून, मार खालला सडकून,
माकड झाले गप्प, तोंड सुजून भप्प,
आता औषध कुठलं, वैद्यालाच पिटलं
भंभेरी, भंभेरी, भम्‌ !

रंगुबाई गंगुबाई हात,Rangubai Gangubai Haat

का ग अशा थांबला आपसांत पांगला
दिवस आज चांगला, भांगला, भांगला

रंगुबाई, गंगुबाई, हात जरा चालू द्या
बिलवरांसी बांगड्यांना किण्ण किण्ण बोलू द्या

घरात सवत नाही ना खपत, तसंच गवत रानामंदी
धरून मुठीत, मुळात छाटीत, फेकत ऐटीत उन्हामंदी
रानातला रोग सारा बारा वाटा जाऊ द्या

शंभर खुरपी सरळ तिरपी चालवा सारखी जोसामंदी
वेग तो वाढवा आवाज चढवा भरा ग गोडवा उसामंदी
काजळाच्या खाणीवाणी वाफा वाफा होऊ द्या

मी आज पाहिला बाई,Mi Aaj Pahila Bai

मी आज पाहिला बाई,
आईबापांचा माझा जावई !

मला पाहून उभा राहून तो गालात हसला थोडा
त्याला पाहुन गेले मोहुन, जीव लाजेने वेडा
जुन्या ओळखीची नवनवलाई !

बाळपणात रानावनात जोडी-जोडीने फिरलो दोघे
शीळ भरीत खेळ करीत, दऱ्या-डोंगर केले जागे
धीर बोलाया आज का नाही ?

आज ओठांत अडतो बोल, उभ्याउभ्याच जातो तोल
एका झुळकीत फुलली जाई .....

महेशमूर्ती तुम्ही सभाजन,Mahesh Murti Tumhi

महेशमूर्ती तुम्ही सभाजन करा निवाडा हवा तसा
तुरेवाल्याच्या उरी उठविते मी कलगीचा पाय ठसा

मर्यादेने बोल जराशी धर श्रोत्यांची भीड जरा
बडबडीने का पडले खाली विद्वत्तेचे चिन्ह तुरा

विद्वत्तेची उडवीन पगडी मी जातीने नार तरी
सवालास दे जबाब माझ्या मग विद्वत्ता तुझी खरी

गाडाभरुनी ग्रंथ वाचले तुरा लाविला म्हणुनी शिरी
तू मातीची जिती बाहुली कर मुजरा अन्‌ परत घरी

एकच पुसते सवाल त्याचे उत्तर दे मग बोल पुढे
आभाळाहून काय थोरले काय धाकटे तिळापुढे

मन मनुजाचे विशाल होते आभाळाहुन कधी कधी
कधी आकसुन होते हलके जाऊन बसते तिळामधी

प्रश्नावरुनी कळते अक्कल आम्ही मापतो उंची ग
विद्वत्तेची शाल आम्हाला तुला मुलाची कुंची ग

सवाल कसला व्यर्थ पुसावा एक उखाणा पुरा तुला
सोडविण्याला अतिशय सोपा सुचेल उत्तर सहज तुला

घड्याएवढा जाड भोपळा वेल तयाचा बोटभरी
पाच पुरुष वर वाढे कवठी फळे तिची का मुठभरी

दोन दिसांचा देतो अवधी उत्तर शोधुन आण इथे
नाही गावले तर मग ठरले मस्तक बाई तुझे रिते

मायेने ही केली रचना तुझ्याचसाठी सर्व नरा
वृक्षवल्लरी तुझ्याचसाठी, तुझ्याचसाठी सर्व धरा

विसाव्यास जरी जाईल माणूस दमुनी-शिणुनी तरुतळी
उंच तरुला फळे चिमुकली म्हणुनी लागती धरातळी

कवठी जर असती पिकली घड्याएवढी अशी फळे
अपघाताने मेली असती रोज अचानक मनुज फळे

बिन भिंतीची उघडी शाळा,Bin Bhintichi Ughadi

बिन भिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरू
झाडे, वेली, पशु, पाखरे यांशी गोष्टी करू

बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकुया त्या भुंग्यांचा,
फुलाफुलांचे रंग दाखवील फिरते फुलपाखरू

हिंडू ओढे, धुंडू ओहळ, झाडावरचे काढू मोहळ,
चिडत्या, डसत्या मधमाश्यांशी, जरा सामना करू

हलवू झाडे चिटबोरांची, पिसे शोधुया वनि मोरांची,
माळावरची बिळे, चलारे काठीने पोखरू

सुग्रण बांधी उलटा वाडा, पाण्यावरती चाले घोडा
मासोळीसम बिन पायांचे बेडकिचे लेकरू

कसा जोंधळा रानी रुजतो, उंदीरमामा कोठे निजतो,
खबदाडातील खजिना त्याचा फस्त खाऊनी करू

भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, कड्या दुपारी पऱ्ह्यात पोहू,

मिळेल तेथून घेउन विद्या अखंड साठा करु

बसा मुलांनो बसा सांगतो,Basa Mulano Basa Sangato

बसा मुलांनो बसा, सांगतो कसा उपजला ससा

आई होती एक, तियेचा एक लाडका लेक
त्याने केली प्रीत, आगळी जगाहुनी विपरीत
कुणा मुलीचा ध्यास लागला त्याला रात्रंदिसा

त्या मुलगीचा बोल, तयाला पृथ्वीहुन अनमोल
तिने इच्छिले काय ? ..... मुलाने जिती चिरवी माय !
आणि तियेचे काळिज आणून तिचा भरावा पसा

आई म्हणाली, "बाळ, सखीचा शब्द आपुल्या पाळ.
तुला लाभते प्रीत, तियेस्तव मरेन मी निश्चिंत.
कट्यार घे अन्‌ चीर सुखाने उरोभाग तू कसा !"

काळिज असले थोर, तयाला कापून घेई पोर

लेकासाठी माय, सुखाने जिवंत मरुनी जाय
देवलोकी ते गेले काळिज, सांडित वत्सल रसा

देव म्हणाला, "यास धाडणे भाग नव्या जन्मास !
औक्ष राहिले अजुन, तरी हे आले आपणहून !"
ते आईचे काळिज घेऊन देवे घडिला ससा

हृदयासम कोवळा, सजीव हा आईचा कळवळा
आवडती या मुले, गोजिरी देवाघरची फुले

स्पर्शच याचा बघा आईच्या हातासम गोडसा

झाडावरती घडे लटकले,Jhadavarati Ghade Latakale

ओळखणार ना बरोबर, ओळखा हं !

झाडावरती घडे लटकले घड्यात होते पाणी
त्या पाण्याच्या वड्या कापूनी कुरुकुरु खातो कोणी
आता सांगा खिरापत, माझी सांगा खिरापत - खोबरं

उदारातील उदार भारी त्याच्या हाती मोती
त्या मोत्यांना उन्हांत सुकवून पोरे बाळे खाती
आता सांगा खिरापत, माझी सांगा खिरापत - मनुका


कोकणातला पिवळा बाळू फार लागला माजू
पकडूनी आणा भट्टीवरती काळिज त्याचे भाजू - काजू


चाललीतला पोर मारतो तिठ्ठयावरती थापा
सुरकुतलेली बोटे त्यांचा गोड लागतो पापा
आता सांगा खिरापत, माझी सांगा खिरापत - खारका

आधी होतीस काळी पिवळी नंतर झालीस गोरी ग
देवळातूनी का ग फिरसी वेळू गावच्या पोरी
आता सांगा खिरापत, माझी सांगा खिरापत - खडीसाखर

चट्टा मट्टा बाळंभटा, आता मागील त्याला रट्टा
पंजा साधीत निघेल गुपचुप तो वाघाचा पठ्ठा

आता झाली खिरापत