Showing posts with label वरदक्षिणा (१९६२). Show all posts
Showing posts with label वरदक्षिणा (१९६२). Show all posts

शोध शोधता तुला,Shodh Shodhata Tula

शोध शोधता तुला, शोधता तुला
प्रिये मी हरवून बसलो मला

असेन का मी तिथे प्रणयिनी
तुझ्याच स्मरणी अथवा नयनी
नसेन तेथे, तर मी सरलो
जन्मच गे हरवला

कितिदा वाटे स्वप्नी यावे
मुकेपणाने धुंडाळावे
उगा कुणाच्या मनी फिरण्याची
मला न ठावी कला

दोघांमधला कठिण दुरावा
दूर कसा गे कुणी करावा ?
पडछायेने कसे धरावे
धुंद वाहत्या जला

बाळ तुझे नवसाचे- यशोदे,Baal Tujhe Navasache

बाळ तुझे नवसाचे - यशोदे, बाळ तुझे नवसाचे
निळे सावळे रूप तयाचे, फूल जसे जवसाचे

लळा लागला मनोहराचा, विसर पडे मज संसाराचा
याच्यासंगे पळती पळासम प्रहर उभ्या दिवसाचे

दिवस संपला, दीप लागले, घरा परतले गोप भागले
जिवावरी पण येते माझ्या गेही परतायाचे

यास संगती कशि मी येऊ, घरात सासू, नणंद, जाऊ
सासुरवासी जिणे जाणिसी, माझे वनवासाचे

पात्रापरी नदीच्या रस्ता,Patrapari Nadichya Rasta

पात्रापरी नदीच्या, रस्ता भरून वाहे
मी एक थांबलेली, जग चाललेच आहे

व्यवहार संपवूनी, सारे घरा निघाले
कोणास भूक पोटी, कोणी मनी भुकेले
कोणा हवा निवारा, कोणास प्रीत बाहे
मी एक थांबलेली, जग चाललेच आहे

कोणा तरुण जीवा, अदृश्य ओढ लागे
वेगात तो निघाला नच पाहताच मागे
मनमोहिनी त्याची, कोण्या घरात राहे
मी एक थांबलेली, जग चाललेच आहे

चाले धिम्या गतीने, हाती धरून दीप

प्रीती प्रपंच सारे, ज्याच्या दिठीत पाप
तो चालला फकीर घुमवीत शांत दोहे
मी एक थांबलेली, जग चाललेच आहे

पाठ शिवा हो पाठ शिवा,Patha Shiva Ho Patha Shiva

पाठ शिवा हो, पाठ शिवा
तारुण्यातही बाळपणाचा खेळ वाटतो हवा हवा

बन केळीचे हरित सापळे, लपायास मज असे मोकळे
प्रणयांधाला काय साजणी शिवाशिवीचा खेळ नवा ?

नूपुर विरहित जरि तव पाऊल, अचुक मला पण लागे चाहुल
कानांनाही फुटते दृष्टी तुझ्या ऐकता पायरवा

उमटु न देइन साद पाउली, सटकन जाइन जशी सावली
सामावुन मज घेइल अलगद हा रंभांचा उभा थवा

सावली होशिल, परि कशाची ?
तुझ्या रूपाची, तुझ्या यशाची
पाठलाग मग कुठे संभवे ? दोन जीवांचा जडे दुवा

झाली ग बरसात फुलांची,Jhali Ga Barsat Phulanchi

झाली ग बरसात, फुलांची झाली ग बरसात
वसंतवेड्या लहरी भरल्या, उसळत सर्वांगात

मुक्या मनाला फुटली वाणी
मनोगतांची झाली गाणी
पालवल्या ग आशावेली, न्हाल्या नवरंगांत
धुंद सुखाचा सुटला दरवळ
अंगच अवघे झाले परिमळ
दवासारखे आनंदासु, कुसुमांसम नयनात

तळहातीच्या भाकित रेखा
जित्या जुईच्या झाल्या शाखा
दिसेल तेथे प्रफुल्ल झाले, फुलल्या उल्हासात

घन घन माला नभी,Ghan Ghan Mala Nabhi

घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा

कालिंदीच्या तटी श्रीहरी
तशात घुमवी धुंद बासरी
एक अनामिक सुगंध येतो, ओल्या अंधारा

वर्षाकालिन सायंकाळी

लुकलुक करिती दिवे गोकुळी
उगाच त्यांच्या पाठिस लागे भिरभिरता वारा

कृष्णविरहिणी कोणी गवळण

तिला अडविते कवाड, अंगण
अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा