झुंजता रणभूवरी तू, अमर होशी रे, सुता
भाग्य माझे थोर म्हणुनी जाहलो तव मी पिता
हे खुळे वात्सल्य माझे ढाळिते अश्रू जरी
ताठ माझी मान गर्वे, धन्यता दाटे उरी
आजवर आशीष दिधले, वंदना घे ही अता
ऐकतो मी जनमुखाने विक्रमाची तव कथा
गळुन जाते आसवांसह हृदयिची दुबळी व्यथा
मायही तव दुःख विसरे ऐकुनी तव वीरता
आपुल्या वंशावरी तू दिव्य कीर्तीची ध्वजा
यातुनी घेतील स्फूर्ती कोटी वीरांच्या प्रजा
मरण कैसे हे म्हणू मी ? मूर्त ही चिरंजीवता
पोचशी तू दिव्यलोकी सूर्यमंडळ भेदुनी
चंद्र, तारे धन्य तुजला आरती ओवाळुनी
गौरवाचा ग्रंथ लाभे जीवनी तव, भारता
तू पुन्हा दिसणार नाहिस, दुःख केवळ हे मनी
वाहते अभिमान-सरिता मात्र त्या दुःखांतुनी
ती व्यथा घृत, वर्तिका मन, ज्योत जळते अस्मिता
No comments:
Post a Comment