Showing posts with label S-रचना खडीकर. Show all posts
Showing posts with label S-रचना खडीकर. Show all posts

सांग सांग भोलानाथ,Sang Sang Bholanath

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचुन, सुट्टी मिळेल काय ?

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा
आठवड्यातून रविवार, येतील का रे तीनदा ?

भोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?

भोलानाथ भोलानाथ चॉकलेट मिळेल काय ?
आकाशातून वेफर्सचा पाऊस पडेल काय ?

भोलानाथ जादूचा शंख मिळेल काय ?
भोलानाथ परीसारखे पंख देशील काय ?

ये रे ये रे पावसा रुसलास,Ye Re Ye Re Pavasa

ये रे ये रे पावसा, रुसलास का ?
माझ्याशी गट्टी फू केलिस का ?

झर झर झर तू येणार कधी ?
अंगणात पाण्याची होईल नदी
ढगांच्या मागे असा लपलास का ?

गार गार वाऱ्यांत नाचेन मी
खूप खूप पाण्यात भिजेन मी
विजेचि टाळि मला देतोस का ?

धड धड धुडुम कानात बसले दडे
काळ्या काळ्या मेघांचे डोंगरकडे
टप टप पडतील थेंबांचे सडे
पाणि, पाणि पाणीच मग सगळीकडे !

धुमधार पाण्यात रस्ता बुडेल
मग माझ्या शाळेला सुट्टी मिळेल
गड गड गड आता हसतोस का ?

पुस्तक नंतर वाचा,Pustak Nantar Vacha

पुस्तक नंतर वाचा, आता खेळा नाचा

मी बाई फुलराणी, गाईन सुंदर गाणी
फुले भरा भरा वेचा, आता खेळा नाचा

फूलपाखरू आले, मला हळूच म्हणाले
"तू राजा रानाचा !", आता खेळा नाचा

कानी सुंदर डूल, तसे डुलते फूल
झुले झुला पानाचा, आता खेळा नाचा

थेंब दवाचे करती, चमचम गवतावरती
नजराणा किरणांचा, आता खेळ नाचा

असावा सुंदर चॉकलेटचा,Asava Sundar Chocolatecha

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार

गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
"हॅलो, हॅलो !" करायला छोटासा फोन !

बिस्कटांच्या गच्चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल

चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो

उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला

किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला

आला आला पाउस आला, Aala Aala Paus Aala

आला आला पाउस आलाबघा बघा हो आला आला
पाउस आला ..... पाउस आला

काळ्या काळ्या मेघांमधुनी,
शुभ्र कशा या धारा झरती
अवतीभवती झुलू लागल्या जलधारांच्या माळा

हसली झाडे हसली पाने
फुले पाखरे गाती गाणे
ओल्या ओल्या मातीचाही श्वास सुगंधी झाला

धरणी दिसते प्रसन्न सारी
पागोळ्यांची नक्षी न्यारी
फांदीफांदीवरी थाटली थेंबांची ही शाळा

लेवुनिया थेंबांचे मोती
तरारली गवताची पाती
वसुंधरेने पांघरिला जणु हिरवा हिरवा शेला

आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो, Aamhi Kolyachi Por Hay Ho

वल्हव रे नाखवा, वल्हव रे नाखवा, वल्हव रे नाखवा, वल्हव

आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो, हाय्‌ हो, हाय्‌ हो
आम्हा दर्याची भीती नाय हो, नाय हो, नाय हो

वर आभाळ भरलंय्‌ हो
जाळं जोरात धरलंय्‌ हो

कोण करील अम्हा काय हो, काय हो, काय हो ?
आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो, हाय्‌ हो, हाय्‌ हो


लाटं जोसात येऊ द्या
झेप खुशाल घेऊ द्या
मागे घेणार न्हाई पाय हो, पाय हो, पाय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो, हाय्‌ हो, हाय्‌ हो

देव मल्हारी पावला हो
मासा जाळ्यात गावला हो
होडी मजेत पुढं जाय हो, जाय हो, जाय हो
आम्ही कोळ्यांची पोरं हाय्‌ हो, हाय्‌ हो, हाय्‌ हो