Showing posts with label M-कमलाकर भागवत. Show all posts
Showing posts with label M-कमलाकर भागवत. Show all posts

समाधी घेऊन जाई,Samadhi Gheun Jai

समाधी घेऊन जाई ज्ञानदेव
सोहळा अपूर्व जाहला गे माये

निवृत्तीनाथांनी चालविले हाती
पाहुन ती मूर्ती धन्य वाटे
आपण निर्गुण मागे परी दान
विश्वाचे कल्याण-निरूपण

सोपान मुक्ताई जाहली व्याकुळ
मायेचे हे बळ राया बोले
ब्रम्हाशी ही गाठ अमृताचे ताट
फुटली पहाट ब्रम्हज्ञान

नीर वाहे डोळां वैष्णव नाचतो
वैकुंठासी जातो ज्ञानराया
सोन्याचा पिंपळ झालासे निश्चळ
सज्जनाचे बळ समाधान

गुरू देई शिष्या समाधी आपण
देवा ऐसे मन का बा केले ?
पद्माचे आसन घालविले जाण
ओंकार ते पूर्ण पंचप्राण

पैलतिरी हाक आली आज कानी
करूनी निर्वाणी बोलविले
ज्ञानाचा पुतळा तेजी विसावला
कैवल्यचि झाला भक्तजन

शतकानंतर आज पाहिली,Shatakanantar Aaj Pahili

शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट

मेघ वितळले गगन निवळले
क्षितिजावर नव रंग उसळले
प्रतिबिंबित ते हो‍उनि उठले भारतभूमिललाट

आजवरीच्या अंधारात
अनंत झाले उल्कापात
एकवटोनी तेज तयांचे तिमिर सरे घनदाट

फकिरांनी शत यज्ञ मांडिले
वेदीवरती रक्त सांडले
त्या रक्ताची क्षितिजावर ये आरुण मंगल लाट

दीप पेटवुनि घरदारांचे
पूजन केले स्वातंत्र्याचे
त्या ज्योतींचे तेज मिसळुनी झाले आज विराट

पुरेत अश्रू, दुबळे क्रंदन
भावपूर्ण करु विनम्र वंदन
नव अरुणाचे होऊ आम्ही प्रतिभाशाली भाट

मायेविण बाळ क्षणभरी,Mayeveen Baal Kshanabhari

मायेंविण बाळ क्षणभरी न राहे ।
न देखतां होय कासावीस ॥१॥

आणिक उदंड बुझाविती तरी ।
छंद त्या अंतरीं माऊलीचा ॥२॥

नावडती तया बोल आणिकांचे ।
देखोनियां नाचे माय दृष्टी ॥३॥

तुका म्हणे माझी विठ्ठल माऊली ।
आणिकांचे बोलीं चाड नाहीं ॥४॥

बुडता आवरीं मज,Budata Aavari Maj

बुडतां आवरीं मज ।
भवाचे सागरीं ॥१॥

नको मानुं भार ।
पाहों दोषांचे डोंगर ॥२॥

आहे तें सांभाळी ।
तुझी कैसी ब्रीदावळी ॥३॥

तुका म्हणे दोषी ।
मी तो पातकांची राशी ॥४॥

नाम आहे आदी अंती,Naam Aahe Aadi Anti

नाम आहे आदी अंती नाम सर्व सार
आहे बुडत्याला नौका जीवनी आधार

नामे तरीले पतीत, तरीले पाषाण
नामे कोळीयासी दिधले मुनीपद जाण
नाम जाळी संचिताचा पूर्व बडिवार
आहे बुडत्याला नौका जीवनी आधार

नाममय झाला चोखा, ब्रम्ही लीन झाला
अजामेळ पापराशी, वैकुंठासी गेला
तेथे उभे पंढरीचे घेउनी आकार
आहे बुडत्याला नौका जीवनी आधार

नाम जपो वाचा नित्य, श्वासांतही नाम
नाममय होवो देवा माझे नित्य कर्म
नामाच्याचसंगे लाभो प्रेम रे अपार
आहे बुडत्याला नौका जीवनी आधार

देह शुद्ध करुनी,Deh Shuddha Karuni

देह शुद्ध करुनी भजनीं भजावे ।
आणिकांचे नाठवावे दोष-गुण ॥१॥

साधनें समाधी नको पां उपाधी ।

सर्व समबुद्धी करी मन ॥२॥

म्हणे जनार्दन घेई अनुताप ।
सांडी पां संकल्प एकनाथा ॥३॥

देह जावो अथवा राहो,Deh Javo Athava Raho

देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ॥१॥

चरण न सोडी सर्वथा । आण तुझी पंढरीनाथा ॥२॥

वदनीं तुझे मंगलनाम । हृदयी अखंडित प्रेम ॥३॥

नामा म्हणे केशवराजा । केला पण हा चालवी माझा ॥४॥

दीपका मांडिले तुला,Dipaka Mandile Tula

दीपका ! मांडिले तुला, सोनियाचे ताट
जडविला, घडविला, चंदनाचा पाट
घरदार प्रकाशाने भरी काठोकाठ

दारी आलेल्याची करू सोपी पायवाट

घातली ताईने तुला रंगांची रांगोळी
पित्याने रेखिल्या गोड भविष्याच्या ओळी
घाशिली समई मीही केली तेलवात
दह्यात हा कालविला जिरेसाळ भात

गा रे राघू, गा ग मैने, बाळाच्या या ओळी
मुखी तुमच्याही घालू दुधातली पोळी
कुतु-काऊ-चिऊ-भाऊ या रे सारे या रे
सांडलेली शिते गोड, उचलुनी घ्या रे

गुणी माझा बाळ कसा मटामटा जेवी
आयुष्याने थोर करी माये ! कुलदेवी !

दीनांचा कैवारी दु:खिता,Dinancha Kaivari Dukhita

दीनांचा कैवारी दु:खिता सोयरा
मुला माणसात माझा विठ्ठल साजिरा

वेदनेत जन्मे हरी, संकटात रांगे

दरिद्र्याच्या झोपडीत गीता नित्य सांगे
दलितांच्या माथा धरितो मायेचा पिसारा

शेतातल्या चिखलामध्ये उभा रे श्रीरंग
घाम साचला निढळी भिजे त्याचे अंग
ऊब देतो थंडीमाजी पिऊनी निखारा

देव नाही राऊळात, नाही त्या आकार
देव आहे तुमचा-आमुचा मानवी आचार
तापलेल्या पाऊलांना होई जो आसरा

चक्रवाक पक्षी वियोगें,Chakravak Pakshi Viyoge

चक्रवाक पक्षी वियोगें बहाती ।
झालें मजप्रति तैसें आतां ॥१॥

चुकलीया माय बालकें रडती ।
झालें मजप्रति तैसें आतां ॥२॥

वत्स न देखतां गाई हंबरती ॥
झालें मजप्रती तैसें आतां ॥३॥

जीवनावेगळे मत्स्य तळमळती ।
झालें मजप्रति तैसें आतां ॥४॥

नामा म्हणे मज ऐसें वाटे चित्तीं ।

करितसे खंती फार तूझी ॥५॥

घाल घाल पिंगा वाऱ्या,Ghal Ghal Pinga Varyaa

घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात
माहेरी जा, सुवासाची कर बरसात !

"सुखी आहे पोर"- सांग आईच्या कानात
"आई, भाऊसाठी परी मन खंतावतं !

विसरली का ग, भादव्यात वर्स झालं,
माहेरीच्या सुखाला ग, मन आचवलं.

फिरुन-फिरुन सय येई, जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग, शेव, ओलाचिंब होतो.काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार,
हुंगहुंगुनिया करी कशी ग, बेजार !

परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे ?

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय ...!"

आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला !

ॐकार प्रधान रूप Omkar Pradhan Roop

ॐकार प्रधान रूप गणेशाचे ।

हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ॥१॥



अकार तो ब्रम्हा, उकार तो विष्णु ।

मकार महेश जाणियेला ॥२॥



ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न ।


तो हा गजानन मायबाप ॥३॥



तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी ।

पहावी पुराणे व्यासाचिया ॥४॥



उठा उठा चिऊताई,Utha Utha Chiutai

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे कसे मिटलेले
अजूनही अजूनही !

सोनेरी हे दूत आले

घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही !

लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे !

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या !

बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई

भूर भूर भूर भूर !

आली बघ गाई गाई,Aali Bagha Gai Gai

आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात
फुललासे निशिगंध, घोटाळली ताटव्यांत

आली बघ गाई गाई, चांदण्यांचे पायी चाळ
लाविले का अवधान ऐकावया त्यांचा ताल ?

आली बघ गाई गाई, लावी करांगुली गाली

म्हणुन का हसलीस, उमटली गोड खळी

आली बघ गाई गाई, लोचनांचे घेई पापे
म्हणून का भारावले, डोळे माझ्या लाडकीचे ?

आली बघ गाई गाई कढितसे लांब झोका
दमलीस खेळूनिया, झाक मोतियांच्या शिंपा