Showing posts with label S-भुपेंद्र. Show all posts
Showing posts with label S-भुपेंद्र. Show all posts

हसलीस एकदा भिजल्या,Hasalees Ekada Bhijalya

हसलीस एकदा भिजल्या शारद राती
बहरली फुलांनी निशीगंधाची नाती

लेऊन शुभ्रतर किरणांचे फूलपंख
चरणांतुन पेरीत प्रीत-पैंजणे लाख
उधळीत अशी तू आलीस भावूक स्वाती

तू हसून बोललीस, होऊन लज्जीत थोडी
उलगडली नयनी तुझ्या गुलाबी गोडी
नजरेतुन झरल्या प्रणयगंध बरसाती

हे युगायुगांचे प्रीतीचे अनुबंध
तेजातून उजळीत हृदयातील आनंद
येईल निशेच्या दारी सौख्य प्रभाती

आलीस सांजवेळी घेऊन,Aalis Sanjveli Gheun

आलीस सांजवेळी घेऊन स्वप्न माझे
तव अंतरी परंतु जाणीव मात्र लाजे

किती लालबुंद होशी, भित्रीच तू अखेर
ओठांतुनी फुटेना तरी शब्द तो अधीर
डोळ्यांत गंधवेडी मुग्धा तुझ्या विराजे

तळव्यांवरी तुझ्या ग रंगेल धुंद मेंदी
माझ्याही या करांना लावी खुशाल नादी
हृदयी चितारलेले ते चित्र आज साजे

स्वप्नांतल्या छटांना गिरवून सांजतारा
लागे सूरात गाऊ फुलवूनिया पिसारा
तेजात नाहती त्या, स्वर मी तुला दिले जे