उत्तुंग आमुची उत्तर सीमा,Uttung Aamuchi Uttar

उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू
अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू

परक्यांचा येता हल्ला, प्रत्येक घर बने किल्ला
हे कोटि कोटि भुजदंड, होतील इथे ध्वजदंड
छातीची करुनी ढाल, लाल त्या संगिनीस भिडवू

बलवंत उभा हिमवंत, करि हैवानाचा अंत
हा धवलगिरी हा नंगा, हा त्रिशूळ कांचनगंगा
जरि झुंड पुंड शत्रूंची आली, खिंड खिंड अडवू

जरि हजार अमुच्या जाती, संकटामध्ये विरघळती
परचक्र येतसे जेव्हा, चौदांची एकच जिव्हा
मग पक्ष, पंथ जरि लक्ष आमुचे, सागरात बुडवू

देशाचा दृढ निर्धार, करु प्राणपणे प्रतिकार
ह्या नसानसांतिल रक्त, जाळील आसुरी तख्त
आम्ही न कुणाचे दास, नवा इतिहास पुन्हा घडवू

अन्याय घडो शेजारी, की दुनियेच्या बाजारी
धावून तिथेही जाऊ, स्वातंत्र्य-मंत्र हा गाऊ
स्वातंत्र्य, बंधुता, समता यांचा घोष सदा घुमवू

No comments:

Post a Comment