उडाला राजहंस गगनात
सांगितलेल्या कथा तयांच्या रुणझुणती कानात
अधीर पापण्या उंच उभारून
हंसामागे गेले लोचन
भर दिवसा ये जग अंधारून
जागेपणी मी फिरते बाई कोणा सुखस्वप्नात
राजकन्यके सखि दमयंती
बोलतेस तू कुणा संगती
सख्या मैत्रिणी कोणी न दिसती
कसली बाधा तुला झाली येथे उद्यानात
या बाधेचा बोध न झाला
अजुनी माझ्या तरूण मनाला
नकोस सांगू तूही कुणाला
प्रासादाची वाट विसरले ने मजसी सदनात
No comments:
Post a Comment