घट तिचा रिकामा,Ghat Ticha Rikama

घट तिचा रिकामा झऱ्यावरी
त्या चुंबिती नाचुनी जललहरी

अशी कशी ही जादू घडली
बघता बघता कशी हरपली
त्या समजुनिया राणी अपुली
तिज उचलुनी नेई कुणी तरी

मिळत चालल्या तीन्ही सांजा
दिवसाचा हा धूसर राजा
चंद्रा सोपुनि आपुल्या काजा
घे निरोप कवळुनी जगा करी

पलिकडे त्या करुनि कापणी
बसल्या बाया हुश्श करोनि
विनोद करिती रमती हसुनी
जा पहा तिथे कुणी ही भ्रमरी

तिथे वडाच्या पाळीभवती
नवसास्तव मृगनयना जमती
कुजबुजुनी गुजगोष्टी करिती
रतिमंजिरी हेरा तिथे तरी


पलीकडे वेळुंची जाळी
तेथे वारा धुडगुस घाली
शीळ गोड ती कुठुनि निघाली
ही झुळुक हरपली लकेरिपरी


तांदुळ पदरी बिल्वदल करी
चरण घालुनी जवळ तळ्यावरी
जमति शिवालयि पोक्त सुंदरी
हिरकणी बघा ही त्यात तरी

No comments:

Post a Comment