कुणि कोडे माझे उकलिल का ?
हृदयिं तुझ्या सखि, दीप पाजळे,
प्रभा मुखावरी माझ्या उजळे;
नव रत्ने तू तुज भूषविले,
मन्मम खुलले आतिल का ?
रहस्य शास्त्री कोणी कळविल का ?
कुणी कोडे माझे उक्लील का ?
हृदयी माझ्या गुलाब फुलला,
रंग तुझ्या गालांवर खुलला;
काटा माझ्या पायी रुतला,
शूल तुझ्या उरि कोमल का ?
माझ्या शिरी ढग नीळा डवरला,
तव नयनि पाउस खळखळला;
शरदच्चंद्र या हृदयी उगवला,
प्रभा मुखी तव शीतल का ?
मद्याचा मी प्यालो प्याला,
प्रिये, तयाचा मद तुज आला;
जखडिले कुणि दोन जीवांला
मंत्र बंधनी केवळ? का ?
रहस्य शास्त्री कोणी कळविल का ?
कुणी कोडे माझे उकलील का ?
No comments:
Post a Comment