नववधू प्रिया मी,Nav Vadhu Priya Mi

नववधू प्रिया, मी बावरते;
लाजते, पुढे सरते, फिरते

कळे मला तू प्राण-सखा जरि,
कळे तूच आधार सुखा जरि
तुजवाचुनि संसार फुका जरि,
मन जवळ यावया गांगरते

मला येथला लागला लळा,

सासरि निघता दाटतो गळा,
बागबगीचा, येथला मळा,
सोडिता कसे मन चरचरते !

जीव मनीचा मनी तळमळे
वाटे, बंधन करुनि मोकळे
पळत निघावे तुजजवळ पळे
परि काय करू ? उरि भरभरते


चित्र तुझे घेऊनि उरावरि
हारतुरे घालिते परोपरि,
छायेवरि संतोष खुळी करि,
तू बोलविता परि थरथरते


अता तूच भय-लाज हरी रे !
धीर देउनी ने नवरी रे :
भरोत भरतिल नेत्र जरी रे !
कळ पळभर मात्र ! खरे घर ते !

1 comment:

  1. ही रचना खूप आवडली. आज धनश्री लेले यांचा भारावलेले हा कार्यक्रम कला व या गाण्यामागचा गूढ अर्थ कळला. म्हणून दोन अर्थवाली ही रचना जास्तच आवडली.

    ReplyDelete