ते दूध तुझ्या त्या घटातले
का अधिक गोड लागे, न कळे ?
साईहुनि मउमउ बोटे ती
झुरुमुरु झुरुमुरु धार काढिती
रुणुझुणु कंकण करिती गीती
का गान मनातिल त्यात मिळे ?
अंधुक श्यामल वेळ, टेकडी
झरा, शेत, तरु, मधे झोपडी
त्यांची देवी धारहि काढी
का स्वप्नभूमि बिंबुनि मिसळे ?
या दृष्याचा मोह अनावर
पाय ओढुनी आणी सत्वर
जादु येथची पसरे मजवर
का दूध गोडही त्याचमुळे ?
No comments:
Post a Comment