कळा ज्या लागल्या जीवा,Kala Jyaa Lagalya Jeeva

कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या !
कुणाला काय हो त्याचे ? कुणाला काय सांगाव्या ?


उरी या हात ठेवोनी, उरींचा शूल का जाई ?
समुद्री चौकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू !
हमामा गर्जनेचा हो, न नेत्री एकही बिंदू

नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा,
भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौकडे दावा

नदी लंघोनि जे गेले, तयांची हाक ये कानी
,इथे हे ओढती मागे, मला बांधोनि पाशांनी

कशी साहू पुढे मागे, जिवाला ओढ जी लागे ?
तटातट्‌ काळजाचे हे तुटाया लागती धागे

पुढे जाऊ ? वळू मागे ? करू मी काय रे देवा ?
खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करी हेवा !



No comments:

Post a Comment