वळण वाटातल्या झाडीत,Valan Vatatalya

वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद
वाहत्या निर्झरांचे गुंतले भवबंध

अशीच बांधलेली जन्माची नातीगोती
स्वातीच्या नक्षत्रांनी भिजली काळी माती
मातीचा गंध ओला, दरवळ रानभरी
पीकात वेचताना पाऊस ओल्या पोरी

तुरीच्या हारी गच्च, गर्भार ओटीपोटी
ज्वारीच्या ताटव्यांशी बोलती कानगोष्टी
डाळिंबी लालेलाल, रानाला डोळे मोडी
मेंदीच्या पावलांशी लागट लाडीगोडी

कौलारू घरट्यांशी तुळशीवृंदावन
ऊसाच्या सावल्यांशी पांघरू येत मन
आकाश पांघरुनी निर्मळ गाणं गावं
पक्षांच्या पंखांवर माहेरी रोज यावं

No comments:

Post a Comment