Showing posts with label S-मधुबाला जव्हेरी. Show all posts
Showing posts with label S-मधुबाला जव्हेरी. Show all posts

सांगा या वेडीला,Sanga Ya Vedila

सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला
हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला

तुला न्यावयाला ग घेऊन गाडी
आलो सर्व सोडून मी शेतवाडी
तू असताना जोडीला
या बुरख्याच्या गाडीला
नवा रंग येईल गुलाबी साडीला
सांगा या वेडीला !

अहो सांगा या वेड्याला, माझ्या घरधन्याला
कशी जाऊ सांगा मी सासुरवाडीला

ही गाडी कुणाची, शेतवाडी कुणाची
बढाई नका ठोकू मोठेपणाची
सांगा या खोपडीला, नाही काणा झोपडीला

कशी जाऊ सांगा मी सासुरवाडीला
सांगा या वेड्याला !

बरे नाही तुझे माहेरी रहाणे
तू गावात बदनाम होशील याने
तुझ्या वाडवडिलां, अन्‌ धर्मरुढिला
हे घातक होईल पुढच्या पिढीला
सांगा या वेडीला !

आहे थोरवी थोर माझ्या पिढीची
भली आज गावात इज्जत पित्याची
आहे मान त्याला अन्‌ त्याच्या पगडीला
अरे हसतील सारे तुझ्या रे परवडीला
सांगा या वेड्याला !

नको भांडू, भांडण विकोपास जाईल
तुझा-माझा तंटा मी पंचात नेईल
बसेन चावडीला, त्या पंचांच्या जोडीला
तुला मात्र नेईन मी याच घडीला
सांगा या वेडीला !

सप्रेम नमस्कार विनंती,Saprem Namaskar Vinanti

सप्रेम नमस्कार विनंती विशेष !
तुझ्यावाचुन मला कटवेना सखे ग परदेश

आठप्रहर तुम्हासंगती राहते राया
का शंका अशी जीवघेणी मनामधे वाया
सावलीपरी मी उभी बिलगुनी पाया
नको ठेवू मनाच्या ग मनी, राग लवलेश !

उणे अधीक बोलले, कधी विसरुनी जावे
रागाने रंगते प्रीत मला ते ठावे
जाणसी सखे तू, तुला काय सांगावे ?
एक मात्र सांगते, नारीचा नारी करी द्वेष

तुजवाचून दुजा नारीला उरी ना जागा
सांगेन जसे मी तसे यापुढे वागा
केतकीचा पुरे ग गंध झुलिवण्या नागा
दोन कुड्यांमध्ये जीव एक असा न आदेश

तुझ्या मनातले वाचले रे,
माझे थयथय मन नाचले
चंद्रलोकात मी पोचले
तूच एकला प्रीयकर माझा प्रीतीचा परमेश

मी आळविते जयजयवंती,Mi Aalavite Jayjayvanti

जिवलग माझे मज सांगाती
मी आळविते जयजयवंती !

चंद्र उगवला वर पुनवेचा
चांदण्यास ये गंध जुईचा
प्राणांमधुनी कंप सुखाचा
आलापांतून भाव रंगती
मी आळविते जयजयवंती !

या असल्या चंदेरी रात्री
बिंब तयांचे माझ्या नेत्री
रोमांचित मी अवघ्या गात्री
स्वरांतुनी दरवळते प्रीती
मी आळविते जयजयवंती !

धौम्य ऋषी सांगतसे,Dhaumya Rushi Sangatase

धौम्य ऋषी सांगतसे रामकथा पांडवा

रामा संगे जानकी नांदताना काननी
सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी
सीता म्हणे लाडकी, मारा त्यासी राघवा
कातड्याची कंचुकी त्याच्या मला लेववा

राम गेले धावुनी ग बाण भाता घेऊनी
सीता पाहे वाटुली ग दारी उभी राहुनी
साद आला दूरचा कोणी मला वाचवा
ओळखिला साद तो बावरली सुंदर
रामा मागे धाडिले लक्ष्मणा देवरा
काय झाले काय की ग चित्ती उठे कालवा

आश्रमाच्या अंगणी नार उरे एकली
रावणाने पाऊले तोच पुढे टाकली
बैराग वेषाने मागे तिला जोगवा
डोळ्यामधी आगळा भाव त्याच्या पेटला
जानकीचा धीर सारा हाती पायी गोठला
राक्षसाच्या हाती देह तिचा ओणवा

दूर आर्त सांग कुणी छेडली,Dur Aart Sang Kuni Chedili

दूर आर्त सांग कुणी छेडली आसावरी
पारिजातकुसुमे ही उधळिली मनावरी

एकाकीपण सरले
मी माझी नच उरले
भान असे हरले अन्‌ मी झाले बावरी

यमुनेचे हे पाणी
चकित होय मजवाणी
कानांनी प्राणांनी प्रशियली माधुरी

कुठुनी हे येति सूर ?
लावितात मज हुरहुर
फडफडतो तडफडतो प्राणविहग पंजरी


मी मजला विसरावे
बुडुनि सुरांतच जावे
बासरी न दूर सखे, ती माझ्या अंतरी

जीवाच्या जिवलगा नंदलाला,Jeevachya Jivalaga

जीवाच्या जिवलगा नंदलाला रे

यमुनेत तुझ्या-माझ्या बिंब मुखांचे
बासरीत तुझ्या-माझ्या गीत सुखाचे

स्मरणाने जीव माझा धुंद झाला रे

चांदण्यांची नित्य नवी रासलीला रे
पाखरांच्या गळा नवी गीतमाला रे

कमळदळांत नवा गंध आला रे

माझ्या कानी ओळखीचा साद आला रे
प्रभू तुझ्या पावलांचा नाद झाला रे

धावले मी तुझ्या पदवंदनाला रे

गगनी अर्धा चंद्र उगवला,Gagani Ardha Chandra

गगनी अर्धा चंद्र उगवला, मोहरले चांदणे
अडली वाणी, मिटे पापणी, मिटले ग लोचने
राहिले अर्ध्यावर बोलणे!

प्रथम बोलले तेच काहीसे
मला न सुचले उत्तर कैसे
भलत्यावेळी कसे बाई ग आठवले लाजणे ?

धीर धरून मी पुसता काही
अस्फुट त्याचे उत्तर येई
शब्दाहूनही अधिक बोलके झाले मग पाहणे !

एक हाक ये दुरुनी साधी
सिद्धीपुर्वी सुटे समाधी
पुन्हा न जमले कधी त्यापरी एकांती भेटणे !

काल रात सारी मजसी,Kaal Raat Sari Majasi

काल रात सारी मजसी झोप नाही आली
जीव झाला थोडा-थोडा, ऊर वरखाली !

पती दूरदेशी माझे
रूप माझे मजसी ओझे
मध्यान्हीच्या पारी दारी एक थाप आली !

कशी आत घेऊ चोरा ?
कशी उघडू मी दारा ?
पांचमाळ्यावरती माझी कोपऱ्यात खोली !

कोण आसुसला पापा
पुन्हा पुन्हा मारी थापा
कलंडले मंचकी मी मूर्च्छनाच आली !

काच कवाडाची होती
पतंगास कळली ना ती
भरारून तोची होता येत ग महाली !

काचेवरी त्याची झेप
तीच मला वाटे थाप
अशी तुझी मैत्रिण बाई पाखरास भ्याली !



आज मी आळविते केदार, Aaj Mi Aalavite Kedar

फुले स्वरांची उधळित भवती गीत होय साकार
आज मी आळविते केदार !

गोड काहि तरि मना वाटले
अबोध सुंदर भाव दाटले
मुखी मनोगत सहज उमटले कंपित होता तार

फिरत अंगुली वीणेवरती
मौनातुनी संवाद उमलती
स्वरास्वरांवर लहरत जाती भावफुले सुकुमार

जे शब्दांच्या अतीत उरते
स्वरांतुनी या ते पाझरते
एक अनामिक अर्थ घेतसे स्वरांतुनी आकार