काल रात सारी मजसी झोप नाही आली
जीव झाला थोडा-थोडा, ऊर वरखाली !
पती दूरदेशी माझे
रूप माझे मजसी ओझे
मध्यान्हीच्या पारी दारी एक थाप आली !
कशी आत घेऊ चोरा ?
कशी उघडू मी दारा ?
पांचमाळ्यावरती माझी कोपऱ्यात खोली !
कोण आसुसला पापा
पुन्हा पुन्हा मारी थापा
कलंडले मंचकी मी मूर्च्छनाच आली !
काच कवाडाची होती
पतंगास कळली ना ती
भरारून तोची होता येत ग महाली !
काचेवरी त्याची झेप
तीच मला वाटे थाप
अशी तुझी मैत्रिण बाई पाखरास भ्याली !
No comments:
Post a Comment