महेशमूर्ती तुम्ही सभाजन,Mahesh Murti Tumhi

महेशमूर्ती तुम्ही सभाजन करा निवाडा हवा तसा
तुरेवाल्याच्या उरी उठविते मी कलगीचा पाय ठसा

मर्यादेने बोल जराशी धर श्रोत्यांची भीड जरा
बडबडीने का पडले खाली विद्वत्तेचे चिन्ह तुरा

विद्वत्तेची उडवीन पगडी मी जातीने नार तरी
सवालास दे जबाब माझ्या मग विद्वत्ता तुझी खरी

गाडाभरुनी ग्रंथ वाचले तुरा लाविला म्हणुनी शिरी
तू मातीची जिती बाहुली कर मुजरा अन्‌ परत घरी

एकच पुसते सवाल त्याचे उत्तर दे मग बोल पुढे
आभाळाहून काय थोरले काय धाकटे तिळापुढे

मन मनुजाचे विशाल होते आभाळाहुन कधी कधी
कधी आकसुन होते हलके जाऊन बसते तिळामधी

प्रश्नावरुनी कळते अक्कल आम्ही मापतो उंची ग
विद्वत्तेची शाल आम्हाला तुला मुलाची कुंची ग

सवाल कसला व्यर्थ पुसावा एक उखाणा पुरा तुला
सोडविण्याला अतिशय सोपा सुचेल उत्तर सहज तुला

घड्याएवढा जाड भोपळा वेल तयाचा बोटभरी
पाच पुरुष वर वाढे कवठी फळे तिची का मुठभरी

दोन दिसांचा देतो अवधी उत्तर शोधुन आण इथे
नाही गावले तर मग ठरले मस्तक बाई तुझे रिते

मायेने ही केली रचना तुझ्याचसाठी सर्व नरा
वृक्षवल्लरी तुझ्याचसाठी, तुझ्याचसाठी सर्व धरा

विसाव्यास जरी जाईल माणूस दमुनी-शिणुनी तरुतळी
उंच तरुला फळे चिमुकली म्हणुनी लागती धरातळी

कवठी जर असती पिकली घड्याएवढी अशी फळे
अपघाताने मेली असती रोज अचानक मनुज फळे

No comments:

Post a Comment