लाकडाच्या वखारीत,Lakadachya Vakharit

लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना
खरं म्हणा, खोटं म्हणा, तिथं येती रोगी नाना
माकडाचा थाट, डोक्यावर हॅट
पायात विजार, तोंडात सिगार !

एक आली काळी बाई, तिचं नाव कोकिळाताई
तिचा बिघडला गळा, बारीक बारीक येती कळा
माकड म्हणालं, "धीर धरा, जरा थोडा ’आ’ करा."
कोकिळेनं केलं ’आ’, माकड म्हणालं, "वा!"
एक काजवा चिमटीत घेऊन
माकडानं चोच घेतली पाहून
"काय ?", म्हणाली कोकिळा
माकड म्हणालं, "गंडमाळा.
टॉनसिल्स बाई ! टॉनसिल्स !
चार महिने गाऊ नका,
उन्हातान्हात जाऊ नका.
अंब्याचा मोहोर खाऊ नका,
थोडा तरी विसावा घ्या, आणि बारा कैऱ्या आणून द्या"
भंभेरी भंभेरी भम्‌ !

मग आले भीत भीत, पिंपळावरचे दिवाभीत
माकड म्हणाले, "होतय्‌ काय ?"
"पोटी भूक जागत नाही, रात्री झोप लागत नाही."
माकड म्हणाले, "डोळे उघडा, जीभ थोडकी बाहेर काढा."
घुबड म्हणाले, "काय कारण ?" माकड म्हणाले, "जाग्रण, जाग्रण"
"दिवसा उगीच जागू नका, पावसा-पाण्यात भिजू नका,
अंधारातून हिंडू नका, फार विचार करू नका,
उगीचच्या उगीच मरू नका, अंड्याचे कवच घेऊन या
आपले औषध घेऊन जा."
भंभेरी भंभेरी भम्‌ !

बोक्याला झाला खोकला आणि तो चुलीपुढं ओकला
मनुताई भ्याल्या, दवाखान्यात आल्या.
माकड म्हणालं, "या ताई, बसा अशा शेजारी.
बोकोबा की पिल्लू टिल्लू, कोण आहे आजारी ?"
मनू म्हणाली, "वैद्यबुवा, यांच्यासाठी दवा हवा !"
"काय झालं बोकोबाला ?" मनु म्हणाली, "खोकला"
माकड म्हणालं ताईंना,
"सांगा तुमच्या यजमानांना, दूध दही पिऊ नका.
उंदीरबिंदीर खाऊ नका, अडगळीत जाऊ नका.
गोळ्या देतो, बडगा छाप,
तासातासांनी दोन घ्या."
भंभेरी, भंभेरी, भम्‌ !

मग आला मखाणवाला
त्या रोग्याला डॉक्टर भ्याला !
रोग्याने घेतली काठी, हाणली त्याच्या पाठी,
रोगी मारता राहीना, माकडाला उठता येइना
शेपटी बसली अडकून, मार खालला सडकून,
माकड झाले गप्प, तोंड सुजून भप्प,
आता औषध कुठलं, वैद्यालाच पिटलं
भंभेरी, भंभेरी, भम्‌ !

No comments:

Post a Comment