बसा मुलांनो बसा सांगतो,Basa Mulano Basa Sangato

बसा मुलांनो बसा, सांगतो कसा उपजला ससा

आई होती एक, तियेचा एक लाडका लेक
त्याने केली प्रीत, आगळी जगाहुनी विपरीत
कुणा मुलीचा ध्यास लागला त्याला रात्रंदिसा

त्या मुलगीचा बोल, तयाला पृथ्वीहुन अनमोल
तिने इच्छिले काय ? ..... मुलाने जिती चिरवी माय !
आणि तियेचे काळिज आणून तिचा भरावा पसा

आई म्हणाली, "बाळ, सखीचा शब्द आपुल्या पाळ.
तुला लाभते प्रीत, तियेस्तव मरेन मी निश्चिंत.
कट्यार घे अन्‌ चीर सुखाने उरोभाग तू कसा !"

काळिज असले थोर, तयाला कापून घेई पोर

लेकासाठी माय, सुखाने जिवंत मरुनी जाय
देवलोकी ते गेले काळिज, सांडित वत्सल रसा

देव म्हणाला, "यास धाडणे भाग नव्या जन्मास !
औक्ष राहिले अजुन, तरी हे आले आपणहून !"
ते आईचे काळिज घेऊन देवे घडिला ससा

हृदयासम कोवळा, सजीव हा आईचा कळवळा
आवडती या मुले, गोजिरी देवाघरची फुले

स्पर्शच याचा बघा आईच्या हातासम गोडसा

No comments:

Post a Comment