Showing posts with label सुवासिनी (१९६१). Show all posts
Showing posts with label सुवासिनी (१९६१). Show all posts

सासुऱ्यास चालली लाडकी,Sasuryas Chalali Ladaki

सासुऱ्यास चालली, लाडकी शकुंतला
चालतो तिच्यासवे, तिच्यात जीव गुंतला !

ढाळतात आसवे मोर-हरीणशावके
मूक आज जाहले सर्व पक्षि बोलके
यापुढे सखी नुरे, माधवी-लते, तुला !

पान पान गाळुनी दुःख दाविती तरू
गर्भिणी मृगी कुणी वाट ये तिची धरू
दंति धरुनि पल्लवा, आडवी खुळी तिला !

भावमुक्त मी मुनी, मला न शोक आवरे
जन्मदास सोसणे, दुःख हे कसे बरे ?
कन्यका न कनककोष मी धन्यास अर्पिला !

येणार नाथ आता,Yenar Nath Aata

ओठांत हाक येते सानंद गीत गाता
येणार नाथ आता !

मी पाउले पहाते दारात थांबलेली
ये अंगणात छाया आधीच लांबलेली
लग्नात लाभलेला हो स्पर्षभास हाता !

आली फुलून गात्रे, ये प्राण लोचनांत
सारे मुहूर्त आले एका खुळ्या मनात
धारेत अमृताच्या गेला भिजून माथा !

आता नका क्षणांनो, दोघांत भिंत घालू
स्वर्गासवे मला द्या भूमीवरून चालू
ते प्राणनाथ माझे, मी दैवदत्त कांता !



मी तर प्रेम दिवाणी,Mi Tar Prem Diwani

मी तर प्रेम दिवाणी
माझे दु:ख न जाणे कोणी !

आर्ताची गत आर्ता ठावी
कळ ज्या अंत:करणी
स्थिती सतीची सतीच जाणे
जिती चढे जी सरणी

माझे दुःख न जाणे कोणी,Majhe Dukha Na Jane Koni

मी तर प्रेम दिवाणी
माझे दुःख न जाणे कोणी !

आर्ताची गत आर्ता ठावी
कळ ज्या अंतःकरणी
स्थिती सतीची सतीच जाणे
जिती चढे जी सरणी !

शूलावरती शेज आमुची
कुठले मीलन सजणी ?
गगनमंडळी नाथ झोपती
अमुच्या दैवी धरणी !

दुखणाइत मी फिरते वणवण
वैद्य मिळेना कोणी
या मीरेचा धन्वंतरी हरि
शामल पंकजपाणी !

जिवलगा कधि रे येशील तू,Jivalaga Kadhi Re Yeshil

दिवसामागूनि दिवस चालले, ऋतू मागूनी ऋतू
जिवलगा, कधि रे येशील तू ?

धरेस भिजवुन गेल्या धारा
फुलून जाइचा सुके फुलवरा
नभ धरणीसी जोडुन गेले सप्तरंग सेतू !

शारदशोभा आली, गेली

रजनीगंधा फुलली, सुकली
चंद्रकलेसम वाढुन विरले अंतरीचे हेतू !

हेमंती तर नुरली हिरवळ
शिशीर करी या शरिरा दुर्बळ
पुन्हा वसंती डोलू लागे प्रेमांकित केतू !

पुनरपि ग्रीष्मी तीच काहीली
मेघावली नभि पुनरपि आली
पुनश्च वर्षा लागे अमृत विरहावर ओतू !

हृदयि प्रीत जागते Hridayi Preet Jagate

राजहंस सांगतो कीर्तिच्या तुझ्या कथा


हृदयि प्रीत जागते जाणता अजाणता



पाहिले तुला न मी तरीहि नित्य पाहते


लाजुनी मनोमनी उगिच धुंद राहते


ठाउका न मजसी जरी निषद देश कोणता

दिवसरात्र ओढणी या मनास लागते


तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते


मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता


निमंत्रणाविना पुन्हा हंस येइ तो वनी


नादचित्र रेखीतो तुझेच मंद कूजनी


वेड वाढवून तो उडून जाय मागुता

काल मी रघुनंदन पाहिले,Kaal Mi Raghunandan Pahile

काल मी रघुनंदन पाहिले
श्याममनोहर रूप पाहता, पाहतची राहिले !

विसरुन मंदिर, विसरुन पूजा
मने पूजिला तो युवराजा
अबोध कसले अश्रू माझ्या डोळ्यांतून वाहिले !

वीरवेष ते तरुण धनुर्धर
जिंकून गेले माझे अंतर
त्या नयनांचे चंद्रबाण मी हृदयी या साहिले !

रुपले शर ते अजुनी खुपती
एक दृष्य ते डोळे जपती
प्रिये मांडवी, जीवित माझे त्यांना मी वाहिले !