सासुऱ्यास चालली लाडकी,Sasuryas Chalali Ladaki

सासुऱ्यास चालली, लाडकी शकुंतला
चालतो तिच्यासवे, तिच्यात जीव गुंतला !

ढाळतात आसवे मोर-हरीणशावके
मूक आज जाहले सर्व पक्षि बोलके
यापुढे सखी नुरे, माधवी-लते, तुला !

पान पान गाळुनी दुःख दाविती तरू
गर्भिणी मृगी कुणी वाट ये तिची धरू
दंति धरुनि पल्लवा, आडवी खुळी तिला !

भावमुक्त मी मुनी, मला न शोक आवरे
जन्मदास सोसणे, दुःख हे कसे बरे ?
कन्यका न कनककोष मी धन्यास अर्पिला !

No comments:

Post a Comment