Showing posts with label एक धागा सुखाचा (१९६०). Show all posts
Showing posts with label एक धागा सुखाचा (१९६०). Show all posts

मी लता तू कल्पतरू,Mi Lata Tu Kalpataru

मी लता, तू कल्पतरू
संसार अपुला सुखी करू

सोन्याचा हा असे उंबरा
भाग्यवती मी तुझी इंदिरा
आले नाथा तुझ्या मंदिरा
अमृतघट ते इथे भरू

सुवासिनीचे कुंकू ल्याले
भाग्यवती मी आज जाहले
शतजन्माचे सार्थक झाले
वेल प्रीतीची ती बहरू

स्वप्न उद्याचे आज पाहते
बाळ लोचनी या दुडदुडते
वात्सल्याचे येते भरते
या आनंदा कशी आवरू ?

चरण पूजिते पतिदेवाचे
मरणहि येवो सौभाग्याचे
हेच मागणे भाग्यवतीचे
कधी न आपण जगी अंतरू



मी तुला न पाहिले,Mi Tula Na Pahile

मी तुला न पाहिले, तू मला न पाहिले
का कसे कधी कुठे कुणी कुणास जिंकिले

शब्दही न बोलता साद घातली कुणी
आज अंतरातली तार छेडिली कुणी
सात रंग सात सूर एकसाथ रंगले

फूल फूल उमलले गंध दाटला मनी
हृदयी गूज बोलते तेच आज लोचनी
स्वप्न-मीलनातल्या कल्पनेत लाजले

नंदनातली फुले वर्षतात का शिरी
व्यापुनी मला उरे ही अबोल माधुरी
आज जीवनातली रम्यता का मला कळे



थंडगार ही हवा त्यात धुंद Thandagar Hi Hava Tyat

थंडगार ही हवा त्यात धुंद गारवा

अशा सुरेख संगमी जवळ तू मला हवा !




निळ्या नभात चालली दूर दूर पाखरे

दूर ना जरी तुझ्या जीव अंतरी झुरे

अंतरात बोलतो अबोल प्रीत पारवा

अशा सुरेख संगमी जवळ तू मला हवा !




संथ या जलाशयी गात गान कमलिनी

हळूच लाजता मनी फुलत राग रागिणी

गंध त्यात चंदनी स्वरात येई गोडवा

अशा सुरेख संगमी जवळ तू मला हवा !




फूल प्रीतिचे कुणा अनामिकास वाहते

मुग्धता परि मना नवेच काही सांगते

अशा सुरम्य संगमी भास आगळा नवा

अशा सुरेख संगमी जवळ तू मला हवा !

ठाऊक नाही मज काही Thauk Nahi Maj Kahi

ठाऊक नाही मज काही !

ठाऊक आहे का तुज काही,

कशी होती रे माझी आई ?




मऊ जशी ती साय दुधाची,

होती आई का तशी मायेची ?

बागेतील ते कमल मनोहर,

आई होती का तशीच सुंदर ?

देवाघरी का एकटी जाई ?

ठाऊक आहे का तुज काही,

कशी होती रे माझी आई ?




चिउकाऊची कथा चिमुकली,

सांगत होती का ती सगळी ?

अम्हांसारखे शुभंकरोती,

म्हणे रोज का देवापुढती ?

गात असे का ती अंगाई ?

ठाऊक आहे का तुज काही,

कशी होती रे माझी आई ?




मऊ साइहुन आई प्रेमळ !

गंगेहून ती आहे निर्मळ

अमृताचे घास भरविते

आभाळापरी माया करीते

आईवाचून मीही विरही

ठाऊक आहे का तुज काही,

कशी होती रे माझी आई ?