Showing posts with label S-संदीप खरे. Show all posts
Showing posts with label S-संदीप खरे. Show all posts

सरीवर सर,Sarivar Sar

दूरदूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळेनिळे गारगार पावसाचे घरदार
सरीवर सर .... सरीवर सर ....

तडातडा गार गारा गरागरा फिरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपिस मखमल ! उतू गेले मनभर !
सरीवर सर .... सरीवर सर ....

थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहाऱ्याचे रान आले एका एका पानावर
ओल्या ओल्या मातीतुन वीजवेडी मेघधून
फिटताना ओले उन्ह झाले पुन्हा नवथर
सरीवर सर .... सरीवर सर ....

उधळत गात गात पाय पुन्हा परसात
माती मऊ काळी साय, हुळहुळ पावलांत
असे नभ झरताना घरदार भरताना
आले जल .... गेले जल .... झाले जल आरपार
सरीवर सर .... सरीवर सर ....

अशा पावसात सये व्हावे तुझे येणे-जाणे
उमलते ओले रान, रान नव्हे मन तुझे
जशी ओली हुरहुर थरारते रानभर
तसे नाव तरारावे माझे - तुझ्या मनभर !
सरीवर सर .... सरीवर सर ....

मेघ नसता वीज नसता,Megh Nasata Veej Nasata

मेघ नसता वीज नसता मोर नाचू लागले
जाहले इतुकेच होते की तुला मी पाहिले !

गोरट्या गालांवरी का चोरटा हा रक्तिमा ?
तू मला चोरून बघताना तुला मी पाहिले !

एवढे नाजुक आहे वय तुझे माझ्या फुला
रंगदेखील पाकळ्यांवर भार वाटू लागले !

लाख नक्षत्रे उराशी, नभ तरीही हळहळे
हे तुझे नक्षत्रवैभव का धरेवर राहीले ?

पाहता तुज रंग उडूनी होई गजरा पांढरा
शल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले !

भर पहाटे मी फुलांनी दृष्ट काढून टाकली
पाहती स्वप्नी तुला जे भय तयांचे वाटले !



मी हजार चिंतांनी हे,Mi Hajar Chintani He

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो !

मी जुनाट दारापरी किरकिरा, बंदी
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी
मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो
तो लंघून चौकट पार निघाया बघतो !

डोळ्यांत माझिया सूर्याहूनी संताप
दिसतात त्वचेवर राप, उन्हाचे शाप !
तो त्याच उन्हाचे झगझगीत, लखलखते
घडवून दागिने सूर्यफुलांवर झुलतो !!

मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो
तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो !

मी आस्तिक ! मोजत पुण्याईची खोली
नवसांची ठेवून लाच, लावतो बोली !
तो मुळात येतो इच्छा अर्पून साऱ्या
अन्‌ 'धन्यवाद' देवाचे घेऊन जातो !!

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार
लपतो न परी चेहरा आत भेसूर !
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही
त्या शामनिळ्याच्या मोरपिसापरी दिसतो !!



मी मोर्चा नेला नाही,Mi Morcha Nela Nahi

मी मोर्चा नेला नाही ..... मी संपही केला नाही
मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना
कुणी पोटातून चिडताना कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होऊनि थिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे, मूळ-फांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने
पण पोटातून कुठलीही खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही

धुतलेला सात्विक सदरा, तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजून रुळते अदृश्य, लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो
मी मनातसुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही

मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही ! आंबाही झालो नाही !



मी पप्पाचा ढापून फोन,Mi Pappacha Dhapun

मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन !
’हॅलो, हॅलो’ बोलतंय्‌ कोण ?

"आमचे नाव खेलाशेठ, डोंगराएवढे आमचे पेट
विकत बसतो साजूक तूप, साला चापून खातो आम्हीच खूप
तुम्ही कोण ? काय तुमचे नाव ? बोला झटपट कुठलं गाव ?"

"कसले नाव नि कसला गाव, राँग नंबर लागला राव !"

मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन !
’हॅलो, हॅलो’ बोलतंय्‌ कोण ?

"लक्षुमबाई मी जोशांघरची, चोरून खाते अंडाभुर्जी
वरती कपभर दूध अन्‌ साय, घरात आत्ता कोनी नाय
तुम्ही कोण ? काय तुमचे नाव ? बोला झटपट कुठलं गाव
?"

"कसले नाव नि कसला गाव, राँग नंबर लागला राव !"

मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन !
’हॅलो, हॅलो’ बोलतंय्‌ कोण ?

"मी तर आहे अट्टल चोर, चंद्राची मी चोरून कोर
झालो अंधारात पसार, तारे उरले फक्त हजार
तुम्ही कोण ? काय तुमचे नाव ? बोला झटपट कुठलं गाव ?"

"कसले नाव नि कसला गाव, राँग नंबर लागला राव"

मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन !
’हॅलो, हॅलो’ बोलतंय्‌ कोण ?

"ढगामधून बोलतोय बाप्पा, चल मारू थोड्या गप्पा"

"बाप्पा बोलतोयस, मग जरा थांब
सगळ्यात आधी एवढं सांग
कालच सांगत होता पप्पा, तिकडे आलेत आमचे अप्पा
एकतर त्यांना धाडून दे, नाही तर फोन जोडून दे
तुला सांगतो अगदी स्पष्ट, अर्धीच राहिली आमची गोष्ट
त्यांना म्हणाव येऊन जा, गोष्ट पुरी करून जा
म्हणले होते जाऊ भूर्र, एकटेच गेले केवढे दूर !
Detail सगळा सांगतो पत्ता, तिकडे पाठव आमचे अप्पा
बाप्पा.. बाप्पा बोला राव, सांगतो माझं नाव न्‌ गाव"

कसले नाव नि कसले गाव, राँग नंबर लागला राव !



प्रत्येकाची रात्र थोडी,Pratyekachi Ratra Thodi

प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी
प्रत्येकाच्या पायामध्ये एक तरी बेडी !

प्रत्येकाच्या मनातून कुठला तरी राग
प्रत्येकाच्या चंद्रावर कसला तरी डाग
प्रत्येकाच्या मनातून काही तरी खोडी !

प्रत्येकाच्या मनामध्ये स्वप्नातला देश
प्रत्येकाच्या तळव्याला नशिबाची रेष
प्रत्येकाची छाती करे रोज तडजोडी !

फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी
प्रत्येकाच्या पानी कशी रोज खाडाखोडी ?

देवा मला रोज एक अपघात,Deva Mala Roj Ek Apaghat

देवा मला रोज एक अपघात कर
आणि तिच्या हातांनीच जखमा या भर !

कधीतरी कुठेतरी बसावी धडक
कळ मला यावी तिला कळावे तडक
घायाळाला मिळो एक घायाळ नजर !

अपघाती सोंग माझे वाटावे खरे
तिला येता प्रेम मला वाटावे बरे
दवा-दारूमध्ये कुठे असतो असर !

खरी व्यथा तेव्हा मग सांगेन तिला
विचारेल जेव्हा, "कुठे दुखते तुला ?"
जरा डावीकडे जरा पोटाच्या या वर !

टेकवता छातीवर डोके एकवार
ठोका घेई झोका उडे आभाळाच्या पार
व्यथांचाच काय ? पडे जगाचा विसर !

दमलेल्या बाबाची ही,Damalelya Babachi Hi



कोमेजून निजलेली एक परी राणी,
उतरलेले तोंड; डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही,

माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत,
निजेतच तरी पण येशील खुशीत

सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला..
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला !

आटपाट नगरात गर्दी होती भारी,
घामाघूम राजा करी लोकलची वारी
रोज सकाळीस राजा निघताना बोले,
गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी,
आज परी येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी,
खऱ्याखुऱ्या परी साठी गोष्टीतली परी
बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला..
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला !

ऑफिसात उशिरा मी असतो बसून,
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून,
एक-एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय काय वाटे,
आठवांसोबत पाणी डोळ्यांतून दाटे
वाटते की उठुनिया तुझ्या पास यावे,
तुझ्यासाठी मीही पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रुसावे नी भांडावे तुझ्याशी,
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी


जपत किनारा शीड सोडणे,Japat Kinara Sheed Sodane

जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर !
अन्‌ वाऱ्याची वाट पाहणे - नामंजूर !
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर !

मला ऋतूंची साथ नको अन्‌ कौल नको
मला कोठल्या शुभशकुनांची झूल नको
मुहूर्त माझा तोच ज्याक्षणी हो इच्छा !
वेळ पाहुनि खेळ मांडणे - नामंजूर !


माझ्या हाती विनाश माझा ! कारण मी !
मोहासाठी देह ठेवतो तारण मी !
सुंदरतेवर होवो जगणे चक्काचूर

मज अब्रुचे थिटे बहाणे - नामंजूर !

रुसवे-फुगवे ..... भांडणतंटे ..... लाख कळा
आपला-तुपला हिशेब आहे हा सगळा
रोख पावती इथेच द्यावी अन्‌ घ्यावी
गगनाशी नेणे गाऱ्हाणे - नामंजूर !

नीती, तत्वे..... फसवी गणिते ! दूर बरी !
रक्तातिल आदिम जिण्याची ओढ खरी !
जगण्यासाठी रक्त वहाणे मज समजे,
पण रक्ताचा गर्व वहाणे - नामंजूर !

चेपेन चेपेन,Chepen Chepen

साहेब म्हणतो चेपेन चेपेन
पोलिस म्हणतो चेपेन चेपेन
काळ मोठा वेळ खोटी
जन्मच म्हणतो चेपेन चेपेन


जगणे झाले अचके देता
नाकापाशी धरतो सूत
गचके खाऊन मेली स्वप्ने
त्या स्वप्नांचे झाले भूत

भूत म्हणाले झाडाला
अस्तित्वाच्या फांद्यांना
सुटका नाही दिवस-रात्र
घरात-दारात भेटेन भेटेन

दिवस रोजचा थापा मारत
दारावरती देतो थाप
'दोरी दोरी' म्हणता म्हणता
त्या इच्छांचे झाले साप
धरता हाती डसती रे
सोडून देता पळती रे
मन म्हणते पकडीन पकडीन
हात म्हणतो सोडेन सोडेन

मी बुद्धाला मारून डोळा
भरतो माझा पेला रे
प्याला तो ही गेला
जो ना प्याला, तोही गेला रे
या जगण्याला फुटता घाम
छलकत जातो माझा जाम
अर्थ म्हणतो 'दारू दारू'
शब्द म्हणतो 'शँपेन शँपेन'

पानावरती कितीक मजकूर
शब्द नव्हे ती किटकिट रे
या जगण्याचे झाले आहे
पत्त्यावाचून पाकीट रे
हसलो मी जरी रडलो मी
इथे येउनी पडलो मी
जन्म बोंबले 'सांगा सांगा'
मृत्य़ू म्हणतो 'सांगेन सांगेन'

कसे सरतील सये,Kase Sarateel Saye

कसे सरतील सये माझ्याविना दिसं तुझे ?
सरताना आणि सांग सलतील ना !
गुलाबाची फुलं दोन रोज राती डोळ्यांवर
मुसूमुसू पाणी सांग भरतील ना ! .....

पावसाच्या धारा धारा ..... मोजताना दिस सारा

रिते रिते मन तुझे उरे .....
ओठभर हसे हसे..... उरातून वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे ?

आता जरा अळिमिळी
तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावून हसशील ना ! .....

कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम
चिडीचूप ..... सुनसान दिवा !
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा !!
चांदण्याचे कोटी कण
आठवांचे ओले सण
रोज रोज नीजभर भरतील ना ! .....

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी
झडे सर ..... काचभर तडा !
तूच तूच ..... तुझ्या तुझ्या ..... तुझी तुझी ..... तुझे तुझे
सारा सारा तुझा तुझा सडा !! -
पडे माझ्या वाटेतून

आणि मग काट्यातून
- जातानाही पायभर मखमल ना ! .....

आता नाही बोलायाचे ..... जरा जरा जगायाचे
माळुनिया अबोलीची फुले !
देहभर हलू देत ..... विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले !!
जरा घन झुरू दे ना
वारा गुदमरू दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना ! .....



अग्गोबाई ढग्गोबाई, Aggobai Dhaggobai

अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ
थोडी न्‌ थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार

वारा वारा गरागरा सो सो सूम्‌
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम
वीजबाई अशी काही तोऱ्यामधे खडी
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी

खोलखोल जमिनीचे उघडून दार
बुडबुड बेडकाची बडबड फार
डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव

आयुष्यावर बोलू काही, Aayushawar Bolu Kahi

जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही !
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू
भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !

तुफान पाहुन तीरावर कुजबुजल्या होड्या
पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !

हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे
नकोनकोसे हळवे कातर बोलू काही
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !

उद्या-उद्याची किती काळजी बघ रांगेतुन -
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !

शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणुनी
वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !