साहेब म्हणतो चेपेन चेपेन
पोलिस म्हणतो चेपेन चेपेन
काळ मोठा वेळ खोटी
जन्मच म्हणतो चेपेन चेपेन
जगणे झाले अचके देता
नाकापाशी धरतो सूत
गचके खाऊन मेली स्वप्ने
त्या स्वप्नांचे झाले भूत
भूत म्हणाले झाडाला
अस्तित्वाच्या फांद्यांना
सुटका नाही दिवस-रात्र
घरात-दारात भेटेन भेटेन
दिवस रोजचा थापा मारत
दारावरती देतो थाप
'दोरी दोरी' म्हणता म्हणता
त्या इच्छांचे झाले साप
धरता हाती डसती रे
सोडून देता पळती रे
मन म्हणते पकडीन पकडीन
हात म्हणतो सोडेन सोडेन
मी बुद्धाला मारून डोळा
भरतो माझा पेला रे
प्याला तो ही गेला
जो ना प्याला, तोही गेला रे
या जगण्याला फुटता घाम
छलकत जातो माझा जाम
अर्थ म्हणतो 'दारू दारू'
शब्द म्हणतो 'शँपेन शँपेन'
पानावरती कितीक मजकूर
शब्द नव्हे ती किटकिट रे
या जगण्याचे झाले आहे
पत्त्यावाचून पाकीट रे
हसलो मी जरी रडलो मी
इथे येउनी पडलो मी
जन्म बोंबले 'सांगा सांगा'
मृत्य़ू म्हणतो 'सांगेन सांगेन'
No comments:
Post a Comment